वाक्प्रचारांमध्ये आशयाइतकीच अभिव्यक्तीही महत्त्वाची असते. नाद हा भाषेचा गुण प्रभावीपणे वापरल्यामुळे काही वाक्प्रचारांमध्ये बोलण्याचा ठसका कसा येतो, याची उदाहरणे पाहू या!
‘दाणादाण उडणे’ या वाक्प्रचारात ‘दाणा’ हा शब्द मुख्य आहे. दाणे टाकून कोंबडी झुंजवण्याचा खेळ खेळला जातो. त्या वेळी दाणे टिपण्यासाठी कोंबडय़ांची धावपळ होते, त्यांची अस्वस्थता वाढते. त्यातून प्रचारात आलेला हा वाक्प्रचार आहे. त्यातून ‘पांगापांग, वाताहत, गोंधळाची स्थिती’ असा अर्थ व्यक्त होतो. विशेषत: लढाईत सेनापती पडल्यानंतर सैनिक सैरावैरा पळू लागतात, तेव्हा ‘सैन्याची दाणादाण उडली’; असे म्हणतात. हा वाक्प्रचार आपण रोजच्या व्यवहारात होणाऱ्या धावपळीसाठीही वापरत असतो. उदा. एका बालकवितेत भित्री खारुताई दिवाळीच्या रात्री एकटी निघाली, तेव्हा ‘तिकडून आला बाण, खारुताईची उडली दाणादाण’ अशी ओळ येते. ती ओळ ऐकली की लहान मुले खारुताईच्या पळापळीच्या कल्पनेने जशी हसतात, तशीच ‘दाणादाण’ या शब्दातल्या अनुप्रासाला दाद देऊनही हसतात!
‘अकांडतांडव करणे’ या वाक्प्रचारात ‘अकांड’ आणि ‘तांडव’ हे दोन शब्द नादातून जणू ओवले गेले आहेत! अकांड म्हणजे अकाली आणि तांडव हे आपल्याकडच्या प्राचीन नृत्य प्रकाराचे नाव आहे. शंकराच्या नृत्याला तांडव असे म्हणतात. हे नृत्य मोठे जोशपूर्ण, क्रोधपूर्ण असते, प्रलयंकारी असते! त्यामुळे अकांडतांडव करणे म्हणजे अकारण आरडाओरडा करणे, उगाचच मोठा गहजब करणे होय! उदाहरणार्थ, ‘भाजीत जरा मीठ जास्त झाले की मामंजी अकांडतांडव करीत असत;’ असे वाक्य जुन्या काळच्या स्त्रियांच्या लेखनात आढळणे शक्य आहे! यातल्या नादवलयामुळे वाक्प्रचाराच्या अर्थाला वजन येते आणि बोलण्यालाही धार येते !
असे नादयुक्त वाक्प्रचार आणखीही आठवतील! उदा. हपापाचा माल गपापा (अन्यायाने मिळवलेली वस्तू टिकत नाही), हमरीतुमरीवर येणे (एकेरीवर येणे, जोराने भांडण सुरू करणे), अद्वातद्वा करणे (असंबद्ध बोलणे), अळंटळं करणे (कामचुकारपणा करणे) इत्यादी. असे इतर वाक्प्रचारही त्यातील द्विरुक्तीमुळे ठसठशीत वाटतात. अशा वेळी वाक्प्रचार हे ‘भाषेचे अलंकार’ असतात, याची खात्रीच पटते!
– डॉ. नीलिमा गुंडी
nmgundi@gmail.com