वाक्प्रचारांमध्ये कधी कधी गणिती भाषेचा मार्मिकपणे उपयोग केलेला आढळतो. अशा वाक्प्रचारांमध्ये योजलेल्या विशिष्ट संख्यांमागचे संकेत, श्रीधर हणमंते यांच्या संकेतकोशामधून उलगडले की त्यांची अर्थपूर्णता लक्षात येते. याची ही उदाहरणे आहेत.
बत्तीसलक्षणी पुतळे : एकोणिसाव्या शतकातील लेखिका ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी एके ठिकाणी पुरुषांना उद्देशून म्हटले आहे, ‘तुम्ही मोठे कलमबहादर.. बत्तीसलक्षणी पुतळे आहात!’ यातील ‘बत्तीसलक्षणी पुतळे’ हा वाक्प्रचार त्यातील संख्येमुळे वाचकांना कोडय़ात टाकतो. त्यात पुरुषाच्या शरीराची ३२ शुभलक्षणे गृहीत धरली आहेत. शरीरातील विशिष्ट अवयवांची स्थिती कशी असावी, हे त्या ३२ शुभलक्षणांमध्ये अभिप्रेत आहे. उदा. सात ठिकाणे आरक्त असावी, जसे की हाताचे तळवे, पायाचे तळवे, अधरोष्ठ, नेत्र, तालु, जीभ आणि नखे. अशी वेगवगळी ३२ शुभलक्षणे एका श्लोकात वर्णन केली आहेत. त्यामुळे बत्तीसलक्षणी म्हणजे शब्दश: अर्थ सर्वगुणसंपन्न! मात्र वाक्प्रचारात त्याचा वापर उपरोधाने केला जातो.
नाकीनऊ येणे : हा वाक्प्रचार आजही आपण वापरतो. प्रकाश संत यांच्या कथेतल्या छोटय़ा लंपनचे एक वाक्य लक्षात आहे. ते असे : ‘माझ्या नाकीनऊच काय, नऊशे नव्याण्णव येतात !’ तेव्हा त्यातील विनोद कळण्यासाठी मूळ वाक्प्रचारातील नऊ या संख्येमागचे संकेत माहीत असावे लागतात. मानवी शरीराला नऊ द्वारे आहेत. ती अशी : दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुडय़ा, एक तोंड, एक गुदद्वार, एक मूत्रद्वार. या नऊ द्वारांशी असणारे प्राण नाकात आले की अंतकाळ समीप येतो. त्यामुळे ‘नाकीनऊ येणे’ या वाक्प्रचाराचा लाक्षणिक अर्थ ‘अतिशय कष्ट पडणे’, असा होतो. ‘नऊ’ याऐवजी ‘नव’, ‘नळ’ असेही पाठभेद आढळतात. महात्मा फुले यांनी ‘कुणब्यांची वास्तविक स्थिती’ या लेखात ‘नाकी नळ येणे’ असा वाक्प्रचार योजला आहे. या वाक्प्रचारातून मुख्यत: नाकाचे – श्वसनेंद्रियाचे – महत्त्व लक्षात येते. संत तुकाराम म्हणतातच, ‘तुका म्हणे काय करावी ती बत्तीस लक्षणे, नाक नाही तेणे वाया गेली!’
– डॉ. नीलिमा गुंडी
nmgundi@gmail.com