राज ठाकरे यांच्या ‘भोंगे’-भाषणांमधील वक्तृत्व आणि राजकारण नीट पाहिल्यास काय आठवते आणि ते कुठे नेणारे आहे?   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुहास सरदेशमुख

साध्वी ऋतंबरा, उमा भारती, विनय कटियार, प्रवीण तोगडिया, प्रज्ञा सिंग.. याच यादीतील पण पार दुसऱ्या टोकावर असणारे बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी.. या आक्रमक भाषण करणाऱ्या नेत्यांच्या पंगतीत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव का टाकू नये? औरंगाबादसह राज्यात झालेल्या मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्या सभा, त्यातील गर्दी, भाषणातील मुद्दे याची चर्चा व चिकित्सा व्हायला हवी ती वक्तृत्व आणि राजकारण या दोन्ही निकषांवर, हे खरेच. पण या साऱ्या निकषांवरही वरील यादीतील नेत्यांशी राज ठाकरे यांचे साम्य का दिसू लागले आहे?

वरील सर्व आक्रमक नेत्यांच्या सभांना गर्दी होतेच होते. ते त्यांच्या चाहत्यांसाठी प्रचंड लोकप्रिय. तरीही या नेत्यांना राजकारणातील मोठय़ा पदावर पोहोचता आले नाही. किंबहुना त्यांच्या राजकारणाचे यशही व्यापक नव्हते. तुलनेने भारदस्त आवाज नसताना, शब्दफेक, शाब्दिक कसरती न करता, फारसे हावभावही न करता अत्यंत सौम्य भाषेत आपले मत ठामपणे सांगणारे नेते देशात अनेक काळ सर्वोच्च पदी राहिले किंवा सर्वमान्य झाले. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, अशी दोन-तीन नावे लक्षात घेऊ. यातील महात्मा गांधींचा आवाज मृदू होता. भाषणाच्या पातळीवर तर क्षीण म्हणता येईल असा; पण ‘उपोषण करा’ असे त्यांनी सांगितल्यावर देशभर ते होत असे. लालबहादूर शास्त्री यांच्या भाषणात फापटपसारा नसे. नेहरूंची भाषणे ही तशी सर्वसामान्य माणसाला कळायला जड जातील अशी. पण त्यांचा चाहतावर्ग व त्यांचे मत ऐकून लोक त्याचा विचार करायचे. मग प्रश्न निर्माण होतो सौम्यपणे मत मांडणाऱ्यांकडे काय असते, आणि आक्रमक वक्त्याकडे काय नसते? – भाषणातील शब्दांमागे नैतिक बळ असावे लागते. नैतिक अशक्तपणा कितीही आक्रमक झाला तरी त्याचे पुढे काय होणार? तरीही गर्दी का होते, आक्रमक नेत्यांच्या भाषणाला?

‘नकारात्मक नैतिकता’ हे त्याचे कारण. दुसऱ्याचा दुस्वास केल्याने आनंदून जाणारे समूहमन तयार करण्यातून हे सारे घडते. अशी नकारात्मक गर्दी गोळा करून तिला चुकीच्या मार्गाने नेणे, ही समस्या आहे असे वाटण्याचा काळही आता मागे पडला आहे. उलट द्वेषनिर्मिती हीच जणू सर्जनशीलता आहे, असे वातावरण पद्धतशीरपणे विकसित केले जाते. त्याला समाजमाध्यमांची जोड असतेच असते. परिणामी शिवराळ, लागट, बोचरी भाषा आवडणाऱ्या व्यक्ती व त्यांचा समूह आक्रमक नेत्यांच्या भाषणाला गर्दी करू लागतो. या नकारात्मक नैतिकतेचा वापर संपला की तो नेता व्यवस्थेच्या बाहेर फेकला जातो. साध्वी ऋतंबरा, उमा भारती, विनय कटियार ही माणसे आता काय करतात? विश्व हिंदु परिषदेतील ज्या नेत्यांचा वापर संपला ते नेते, त्या व्यक्ती संदेश देण्याच्या प्रक्रियेतून बाहेर काढले गेले. परिवारातील अशा वापरून झालेल्या माणसांचे नाव पुढे कोणी उच्चारतही नाही.

हिंदुत्वाच्या व्यापक परिघात राज ठाकरे यांचे असे होणार नाही असे आपण मानून चालू. कारण ते काही विश्व हिंदु परिषद किंवा परिवारातील संघटनांशी संबंधित नाहीत. त्यामुळे त्यांना सहजासहजी बाजूला सारता येणार नाही, अर्थात त्यांनी स्वतंत्र अस्तित्व ठेवले तर.

बहुसंख्याक समाजापेक्षा अल्पसंख्याक शिरजोर होऊ लागले आहेत याचा बभ्रा करण्याची प्रक्रिया सर्वत्र चालू आहे. ती मुस्लिमांविरोधात अधिक व्यापकतेने सुरू आहे. करोनाकाळातील पहिल्या लाटेतील चलचित्रे आठवून पाहा. फक्त आपल्याच देशात ही प्रक्रिया आहे असे नाही. रोहिंग्यांच्या समस्यांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते म्यानमारमध्ये ९-६-९ या अंकाच्या आधारे बहुसंख्याक बौद्ध समाजाचे नेतृत्व करणारे भिक्खू आशिन विरथु यांची भाषणेही अशीच आक्रमक. त्यांना लष्कराचाही पाठिंबा होता. या विरथु यांच्या भाषणांतील मुद्दे अगदी साध्वी ऋतंबरा यांच्या भाषणांच्या जवळपास जाणारे. ‘त्यांची लोकसंख्या वाढते आहे,’ अशी भीती बहुसंख्याकांमध्ये निर्माण करणे तसे अवघड काम. पण ते केले जाते. जी बाब रोहिंग्या समस्यांच्या जडणघडणीत होती. तसेच भीतीचे वातावरण बहुसंख्याकांमध्ये ‘मंदिर वही बनाएंगे’च्या काळात भगव्या कपडय़ातील व्यक्तीकडून आवर्जून निर्माण केले जात होते. आता त्याची पुनरावृती होत आहे. ‘जय श्रीराम’ असा नारा देऊन मुख्यमंत्र्यांना हिणवले जाते किंवा तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणू द्या असा आग्रह धरला जातो. त्यामागे बभ्रा असतो अल्पसंख्याक शिरजोर असल्याचा. घरोघरी श्रीरामाचा जप करणाऱ्या किंवा ‘भीमरूपी महारुद्रा’ हे मारुतीस्तोत्र म्हणून मुलांवर संस्कार करत धर्मश्रद्धा जपणाऱ्यांना धर्म हा असा आक्रमक असतो याची कल्पना येण्यापूर्वीच तेही अडकतात ‘नकारात्मक नैतिकते’त. निर्माण झालेली द्वेषमूलक भावना नैसर्गिक आहे, तोच धर्माच्या नैतिकतेचाही भाग आहे, असा भ्रम निर्माण होतो.

गर्दीमध्ये नकारात्मक भावनांची सह-अनुभूती वाढवून समूहमन तसे घडविले जाते. क्रिकेटच्या सामन्यातील जय- पराजय साजरे करताना निर्माण केलेल्या राष्ट्रीय भावना हे त्याचे एक जुने उदाहरण. पाकिस्तानधार्जिणे ठरविताना राष्ट्रीयत्व धूसर केले की, बहुसंख्याकांना होणारा आनंद टिकून राहतो. आपल्याच शहरातील एका भागाला ठरावीक नावाने हिणवायचे, या हिणवण्याच्या आनंदाचा भाग आणि भोंगे प्रकरण याला एका तराजूत मोजायचे की राज ठाकरे सांगतात तसे हा मुद्दा केवळ ‘सामाजिक’ आहे यावर विश्वास ठेवायचा?

करोनानंतर निर्माण झालेल्या असंख्य समस्यांनी, चिंतांनी समाज ग्रासलेला असताना ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याचा का करायचा, याही प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे अशी अपेक्षा धरायला काय हरकत आहे? महाराष्ट्रात विचारवंतांची व समाज सुधारकांची मोठी परंपरा असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले. त्यात नरहर कुरुंदकरांचेही त्यांनी नाव घेतले. त्यामुळे त्या वैचारिकतेच्या आधारे प्राधान्यक्रम कोणता असावा हे न कळण्याइतपत त्यांचे नेतृत्व नक्कीच खुजे नाही. ज्यांना जातीयवादाची बीजे कशी रुजवली गेली याची संगतवार मांडणी करता येते किंबहुना ज्यांनी उपस्थित केलेल्या जातीय विषवल्लीच्या आरोपाचे उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची तारांबळ उडत आहे, ते राज ठाकरे हे धर्मविद्वेषाची बीजे आपल्याही वर्तणुकीचा भाग बनली आहेत हे न कळणाऱ्यांपैकी आहेत हे कसे मान्य करावे? त्यामुळे साध्वी ऋतंबरा, उमा भारती, विनय कटियार यांच्या रांगेत ते स्वत:हूनच बसायला निघाले आहेत असे म्हणावे लागते.

 भोंगे काढले नाहीत तर ‘हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावा’ असा पर्याय दिल्याचा त्यांचा दावा. धर्माच्या आधारे सकारात्मक पर्याय देता येतात का? भारतीय राजकीय व्यवस्थेत नास्तिकतेचा पर्याय चालणार नाही हे मान्य केले तरी, एका मुस्लीम नेत्याने दिलेला असा पर्याय आजही मार्गदर्शक असू शकतो. ज्या खैबरिखडीतून आक्रमक यायचे, त्या भागातील खान- आफ्रिदी जमाती या कमालीच्या आक्रमक होत्या. त्यांच्या क्रौर्याचे वर्णन राजमोहन गांधी लिखित ‘सरहद्द गांधी’ -खान अब्दुल गफ्फारखान – यांच्या चरित्र पुस्तकात करण्यात आलेले आहे. ते  भीतीने अंगावर काटा आणणारे. दिसायला धिप्पाड, आक्रमक असणाऱ्या या जमातीला धर्मातील व्याख्यांचा अर्थ सांगूनच खान अब्दुल गफ्फारखान म्हणजे सरहद्द गांधींनी बदलविले. ‘शोषणाविरुद्धचा लढा म्हणजे जिहाद,’ ही त्यांची व्याख्या. ब्रिटिश शोषण करत असतील तर त्यांच्या विरुद्धच्या लढय़ात अिहसेच्या मार्गाने पाय रोवून उभे ठाका असे सांगणारे महात्मा गांधी व त्यांचे अिहसेचे तत्त्वज्ञान हेच ‘सरहद्द गांधीं’च्या  लढय़ाचे हत्यार बनले. त्यातून सहा-साडेसहा फुटांचा खान- आफ्रिदी जमातीचा माणूसही अिहसक बनला. पर्याय हे असे द्यायचे असतात. त्यात द्रष्टेपण असते, तेव्हा नैतिक बळ वाढते. मग संघटना उभ्या राहतात. नुसते गळय़ात गमछा घालून बटबटीतपणे बाइट देणाऱ्या नेतृत्वाच्या भाऊगर्दीत सहभागी व्हायचे असेल तर फक्त भाषा पुरेशी असते.

  ‘नकारात्मक नैतिकता’ निर्माण करण्यासाठी भाषा जेवढी संस्कृतप्रचुर किंवा उर्दू मिश्रित तेवढी गर्दीवरची पकड अधिक. राज ठाकरे यांना बोलण्याची- हातवाऱ्यांची ढब किंवा ओवेसींसारख्या वक्त्याला तर हैदराबादी लहजाही पुरतो, गर्दीला हवे तसे वळवायला. प्रश्न फक्त भोंगे काढण्यापुरत्या आक्रमक भाषणाचा नाही तर त्याचे धर्माशी असणारे  बेमालूम मिश्रण असेच चालू ठेवायचे का, हादेखील आहे. न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी हवी, तर ती सर्वच ध्वनिवर्धकांपर्यंत जाईल. भोंग्यावरील आक्रमक भाषणाने थोडय़ा कालावधीसाठी राजकीय लाभ मिळतीलही. पण भविष्यात वापरा आणि मग बाजूला करा, हे सूत्र कोणालाही लागू पडू शकते. त्याला राज ठाकरे अपवाद असण्याचे काहीएक कारण दिसत नाही.

suhas.sardeshmukh@expressindia.com 