|| सचिन सावंत
‘पहिली बाजू’ या सदरात १४ डिसेंबर रोजी ‘मोदींमुळे पुनरुत्थान’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्यातील मुद्दे पक्षीय प्रचारासारखे असून त्यांची दुसरी बाजूही अन्य पक्षांना दिसू शकते, हे लक्षात आणून देणारा प्रतिलेख…
‘मोदींमुळे पुनरुत्थान’ (१४ डिसेंबर) हा ‘पहिली बाजू’ या सदरातील आध्यात्मिक गुरू श्री. एम. यांचा लेख वाचला. एक तर त्यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे अथवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून हा लेख लिहून घेतलेला असावा असे त्यातून वाटते. ११ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मोहम्मद गजनीबरोबर भारतात आलेल्या अल्बिरूनी या अभ्यासकाने तत्कालीन भारतभूमी व हिंदू धर्माच्या स्थितीबाबत केलेल्या भाष्याशी मिळतेजुळते मत १९ व्या शतकात स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, मूठभर लोकांच्या हातातील शिक्षण आणि बुद्धिमत्तेची मक्तेदारी हेच भारताच्या विध्वंसाचे मुख्य कारण आहे! लेखक सदर लेखात भारत ही ज्ञानाची आणि विज्ञानाची भूमी आहे, हे सांगताना ते ज्ञान कायमच समाजातील विशिष्ट वर्गाच्या हातातच राहिले होते हे सांगत नाही. देश स्वतंत्र झाला तेव्हा ८५ टक्के जनता अशिक्षित होती. त्यामुळे वैदिक काळापासूनच्या परकीय आक्रमणांचा लेखक उल्लेख करत असतील तर समाज एकसंध नसणे, मागासलेपण आणि समाजातील मोठ्या वर्गाची समाजाच्या उत्थानात योगदान देण्यातील असमर्थता ही त्यामागची कारणे आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात खऱ्या अर्थाने विज्ञानाचे युग सुरू झाले आणि त्यात जवाहरलाल नेहरू यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
निवडणुकीसाठी देखावा
लेखकाची ओळख आध्यात्मिक गुरू अशी आहे. आध्यात्मिक शक्तीच्या शोधात फिरताना काशी विश्वनाथ मंदिराच्या दाराशी आध्यात्मिक ऊर्जेचे आयाम उमगले असेही ते म्हणतात. पण अध्यात्म हा व्यक्तिगत प्रवास आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा मार्ग म्हणजे अध्यात्म! तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. भामनाथावर केलेल्या चिंतनातून नव्या तुकाराम महाराजांचा जन्म झाला. त्यामुळे काशी विश्वेश्वराला जाऊन कोणाला आध्यात्मिक शक्तीचा परिचय होत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. पण मंदिरे हीच केवळ आध्यात्मिक केंद्रे आहेत असे म्हणणे योग्य नव्हे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीताज्ञान व आपल्या विराट रूपाचे दर्शन भरयुद्धात कुरुक्षेत्रावर दिले होते. जगद्गुरू तुकाराम महाराज आत्म्यात परमेश्वर शोधण्यास सांगतात. भक्त प्रल्हादाकरिता खांबातूनही ईश्वर प्रकट झाले. त्यामुळे चराचरात ईश्वर आहे हे भगवद्गीतेचे सार एम. यांना मान्य नाही का?
हिंदू धर्माच्या महान केंद्रांचा ऱ्हास होऊ लागला या भावनेने लेखक क्षोभित होत असे आणि विश्वेश्वर धाम मंदिराचे बांधकाम झाल्याने आत्म्याला शांती मिळाली असे लेखक म्हणतात. मला लेखकांना विनम्रपणे आठवण करून द्यायची आहे की क्रोध हा षड्रिपूंपैकी एक आहे. या रिपूंवर विजय मिळवणे हा अध्यात्माचा मार्ग आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतील सांख्ययोगात स्पष्ट केले आहे. आध्यात्मिक शक्तीच्या शोधकार्यामध्ये लेखकांना न मिळालेली शांती केवळ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याने मिळाली असल्यास त्याचा आनंद आहे. परंतु उत्तर प्रदेशची निवडणूक हातून जाईल असे भाजपला वाटले नसते तर लेखकाला मंदिराच्या बांधकामासाठी व आत्म्याच्या शांतीसाठी अजून वाट पाहावी लागली असती.
यापूर्वीही जीर्णोद्धार झालेत
मंदिर जीर्णोद्धार, प्राचीन केंद्राचे संरक्षण आणि जतन या कामी देवी अहिल्याबाईंनंतर केवळ नरेंद्र मोदींनीच लक्ष घातले असे लेखकाला वाटते याचे आश्चर्य वाटले. मधल्या सव्वादोनशे वर्षांत मंदिर जीर्णोद्धाराचे काम झालेच नाही असे ते सांगू पाहतात. नरेंद्र मोदी यांचे काम शतकोत्तर व ऐतिहासिक म्हणवून त्यांना अवतारी पुरुष ठरवण्याचा अतिशयोक्त प्रयत्न हल्ली देशभर सुरू आहे. त्या प्रचाराचाच हा स्वाभाविक भाग आहे. तसे नसेल तर यातून आध्यात्मिक गुरूंचे इतिहासाबद्दलचे मर्यादित ज्ञान स्पष्ट होते. नजीकच्या इतिहासाकडे नजर टाकली तरी मंदिरांचा जीर्णोद्धार, दुरुस्ती आणि व्यवस्थापन यांची कामे गेलेली दिसून येतात. २०व्या शतकात म्हैसूर आणि त्रावणकोर राजवटींनी अनेक मंदिरांना भरघोस मदत केली आहे. जुनागढ स्थित सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या पुढाकारानेच झाला. जुनागडच्या सामीलीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान १२ नोव्हेंबर १९४७ रोजी जनसभेला संबोधित करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पवित्र कार्यात सगळ्यांनी हातभार लावावा’ असे आवाहनही केले होते. महात्मा गांधी यांनीही ‘हा जीर्णोद्धार जनसहभागातून व्हावा’ या पटेल यांच्या मताशी सहमती दर्शवली होती. यातून मंदिरांवर भाविकांचा हक्क आहे आणि निवडणुकीच्या राजकारणाकरिता मंदिरांचा उपयोग होऊ नये ही काँग्रेसची भूमिकाही स्पष्ट होते. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमात म्हणाले की धार्मिक असहिष्णुता केवळ द्वेष आणि दुर्भावना पसरवते हे इतिहासाने आपल्याला शिकवले आहे. आपण जात, संस्कृती, धर्म आणि आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांसंदर्भात सहिष्णू असले पाहिजे आणि प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. सर्व धर्मांचा आदर, सामाजिक सलोखा आणि सर्वांची भागीदारी असलेल्या देशाची निर्मिती या मूल्यांबाबत नेहरू, प्रसाद आणि इतर नेत्यांमध्ये सहमतीबरोबरच बांधिलकीही होती.
स्वप्रचारासाठी सारे काही…
स्वातंत्र्यानंतर जवळपास सर्वच राज्य सरकारांनी तीर्थक्षेत्र व्यवस्थापन आणि सुधारासाठी कायदे मंजूर केलेले आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील तीर्थक्षेत्रांना मदत केली, पण फोटो काढून स्वप्रचार केला नाही. काशी विश्वेश्वर मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात काशी विश्वेश्वरापेक्षा विविध पेहरावातील मोदींचे दर्शन घेताना ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवत होती. श्री. एम यांना आठवण करून देण्यास हरकत नाही की महाराष्ट्राचा प्रत्येक मुख्यमंत्री गेली अनेक वर्षे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पाडत असतो.
योग जगात पोहोचवण्याचे कार्य केवळ मोदींनीच केले. संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता द्यावी यासाठी त्यांनीच पाठपुरावा केले अशी मल्लिनाथी लेखकाने केली आहे. पण मोदींच्या जन्माच्याही आधी योग विश्वात पोहोचलेला होता. अनेकांनी योगाच्या प्रसारासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. असे असताना केवळ मोदींना श्रेय देणे यापेक्षा प्रचार वेगळा तो काय?
मोदी विश्वशांतीचा संदेश देत आहेत असे लेखक म्हणतात. मोदी सरकार आल्यापासून समाजामध्ये द्वेष पसरविला जात आहे, आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या शेतकरी -कामगारांना देशद्रोही म्हटले जाते, गाडीखाली चिरडले जाते. मुस्लीम समाजाला दुय्यम दर्जा देण्याचे काम केले जात आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री ‘गोली मारो सालों को’ अशी चिथावणीखोर भाषा करतात. यातून जगाला कोणता शांतीचा संदेश मोदींच्या कार्यकाळात गेला हे केवळ लेखकच जाणोत. असो!
ऱ्हासपर्वाचा इतिहास
नरेंद्र मोदी हे भारताच्या आध्यात्मिक आणि भौतिक उद्दिष्टांची पूर्ती करत आहेत असा जावईशोध लेखकाने लावलेला आहे. आम्हाला एवढेच माहीत आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्धारित केलेले हिंदू राष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोदींचे सरकार संविधान आणि लोकशाही उद्ध्वस्त करत आहे. लेखकांच्या म्हणण्यानुसार काशी विश्वेश्वर धामातून गंगेच्या दर्शनाने त्यांना परम आनंद प्राप्त होईल. करोनाकाळात त्याच गंगेमध्ये हजारो मृतदेह वाहत होते, ते पाहून काय वाटले हेही त्यांनी सांगितले असते तर बरे झाले असते. मोदींच्या राज्यामध्ये भगवान श्रीरामाचे मंदिर झाले याचा आनंद ते वर्तवतात. परंतु जे श्रीराम अत्याचारग्रस्तांची शक्ती बनले, त्यांच्याच नावाचा वापर धार्मिक असहिष्णुतेचे हत्यार म्हणून केला जात आहे. ‘जय श्रीराम’चे नारे मुस्लीम समाजाला प्रार्थना करण्यापासून रोखतात, हेच देशाचे आध्यात्मिक पुनरुत्थान का, याचे उत्तरही लेखकांनी द्यावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्यावर सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम केलेला आहे व तो इतिहासात सदैव कोरलेला राहील या मताशी आम्ही सहमत आहोत. परंतु तो दुष्परिणाम आहे आणि इतिहास वाईटाचाही असतो. २०१३ साली जागतिक भूक निर्देशांकात ६३ व्या क्रमांकावर असलेला भारत आता पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशच्याही मागे १०१ व्या क्रमांकावर गेला आहे. देशातील २५ टक्के जनता अत्यंत गरीब आहे हे निती आयोगाचा अहवाल सांगतो. ४६ वर्षांतील सर्वात उच्चांकी बेरोजगारी सध्या भारतात आहे. जागतिक असमानता अहवालानुसार मोदींच्या काळात देशात गरिबी, विषमता वाढली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या माहितीनुसार जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात २०१६ साली १३३व्या क्रमांकावर असलेला भारत आज १४२व्या क्रमांकावर गेला आहे. जागतिक लोकशाही निर्देशांकात सध्या भारत १३ वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर आहे.
त्यामुळे मोदींच्या राज्यात भारतीय नागरिकांचे पुनरुत्थान नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच राजकीय व आर्थिक अध:पतन झाले आहे हेच सत्य आहे!
लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आहेत.
sachinmsawant@gmail.com