|| शशिकांत पित्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागालँडमधील ४ डिसेंबरच्या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत आणि येत्या सोमवारी, २० डिसेंबर रोजी या भागातील मुख्यमंत्र्यांची ‘अफ्स्पा’विरोधात बैठकही ठरली आहे. लष्कराकडून जे झाले, त्याची चौकशी होत आहेच; पण अशा चौकशांची निष्पत्ती राजकीय असू नये ती का, हे सांगण्यासाठी लष्कराच्या बाजूने केलेला हा युक्तिवाद…

सैन्याच्या गुप्तचर विभागाला नागालँडमधील एनएससीएन (क्या) या विप्लववादी (इन्सर्जंट) गटाचे काही दहशतवादी ४ डिसेंबरला संध्याकाळी मॉन जिल्ह्याच्या तिझीत परगण्यातील तिरू नावाच्या खेड्याजवळ काही कामासाठी येणार आहेत असे समजले होते. ही माहिती तातडीने २१ पॅरा स्पेशल फोर्स या कमांडो बटालियनला (२१ एसएफ) देण्यात आली. त्यानुसार दहशतवाद्यांच्या येण्याच्या मार्गावर सापळा (अँबुश) लावून त्यांना पकडण्याची योजना २१ एसएफने आखली. लष्करी शिकवणीनुसार सावज ज्या दिशेने अपेक्षित आहे त्या बाजूस पाच-सहाशे मीटरवर आधी बातमी देण्यासाठी टेहाळे (स्काऊट्स) ठेवायचे,  नियोजित जागी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दबा धरून बसायचे, सावज होऱ्यात आले की कमांडरच्या इशाऱ्यावर अचानक तिच्यावर बंदुकीच्या फैरी झाडायच्या, दहशतवाद्यांना जायबंदी करायचे आणि मग त्यांना पकडायचे असा रिवाज असतो.

देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या माहितीचा मथितार्थ असा की, ४ डिसेंबरला संध्याकाळी २१ एसएफच्या  एका तुकडीने दोन जागी सापळा लावला. नियोजित वेळी टेहाळ्यांनी समोरून एक गाडी येत असल्याचे सांगितले. कमांडरला त्याच्या गाडीच्या ‘स्पॉटर स्कोप’वर गाडीत आठ जण बसलेले दिसले. एकाच्या हातात बंदुकीसारखे हत्यार असल्याचे दुरून वाटले. तरीही ऐन वेळी कमांडरने जवानांना गोळीबार न करण्याचे आदेश दिले. त्याऐवजी एका जवानाला गाडीच्या ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा देण्यास सांगितले. परंतु त्या इशाऱ्याला न जुमानता ड्रायव्हरने गाडी पुढे दामटली. आता त्यात दहशतवादी असल्याबद्दल संशय बळावला. त्यानंतर जवानांनी गाडीवर गोळीबाराच्या फैरी झाडल्या. काही सूत्रांनुसार त्या गाडीतील प्रवाशांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला, परंतु याला दुजोरा मिळालेला नाही. त्यात आतल्या आठ प्रवाशांपैकी सहा प्रवासी ठार झाले आणि दोन जखमी झाले. त्या दोघांना काही जवान जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बाकीचे  पोलीस येण्यासाठी तिथे थांबले. ते प्रवासी दहशतवादी नसून तिरू खेड्यातील खाणकामगार रहिवासी होते आणि ते खाणीतील कामावरून परतत होते. दुर्दैवाने त्यांची ओळख पटण्यात जवानांची गल्लत झाली होती.

आपले गावकरी मारले गेल्याची बातमी लागल्यावर खेड्यातील क्षुब्ध गावकरी आपापल्या कुऱ्हाडी, कोयते व दाह घेऊन एकत्र झाले आणि त्यांनी कमांडोंच्या तुकडीला घेरले. कमांडरने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी दोन वाहने जाळली आणि ते तुकडीच्या दिशेने चाल करू लागले. त्यातील एका गावकऱ्याने पुढे येऊन एका कमांडो जवानावर आपल्या कोयत्याने हल्ला केला. इतर काही जवानांनाही जखमा झाल्या. बाकी गावकरी हल्ला करण्यासाठी तुकडीच्या दिशेने घातकपणे पुढे येऊ लागले. त्यांना वारंवार ताकीद देऊनही ते मागे हटण्याची काही चिन्हे दिसेनात. तेव्हा कमांडरने तुकडीला स्वसंरक्षणार्थ प्रथम हवेत आणि नंतर समोर गोळी चालवण्याचा इशारा दिला. त्यात आणखी सात गावकरी मारले गेले आणि काही जखमी झाले. दुसऱ्या दिवशी मॉन शहरातील आसाम रायफल्सच्या ठाण्यापाशी २५० गावकऱ्यांचा जमाव आला. त्यांना पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात आणखी एक निदर्शक ठार झाला. असे एकूण १४ नागरिक आणि एक जवान बळी पडल्याची माहिती वृत्तमाध्यमे व समाजमाध्यमांत आहेच.

जवानांची बाजू… 

२१ एसएफ ही स्पेशल फोर्सेसची पलटण गेली १६ वर्षे मणिपूर व नागालँड क्षेत्रांत कार्यरत आहे. त्यातील ६५ टक्के जवान ईशान्य भारतातील आहेत. भारतीय लष्कराच्या चार कमांडो बटालियन्सपैकी ती एकच पूर्व विभागात तैनात आहे. बाकीच्या तीन- १ एसएफ, ९ एसएफ आणि १० एसएफ या- जम्मू व काश्मीरमध्ये आहेत. या चारही पलटणींनी गेली तीस वर्षे दहशतवाद्यांविरुद्ध उत्तम कामगिरी बजावली आहे. २१ एसएफने जून २०१५ मध्ये म्यानमारमधील ‘हॉट परस्यूट’ या मोहिमेत नागा बंडखोरांच्या शिबिरावर हल्ला चढवून ३२ राष्ट्रविरोधी घटकांना ठार केले होते. त्या वेळचा त्यांचा हा धाडसी हल्ला सर्व भारतात कौतुकाचा विषय झाला होता. आजतागायत २१ एसएफने जवळपास २०० दहशतवाद्यांना मारले आहे आणि सुमारे १५० बंडखोर त्यांना शरण आले आहेत. त्यात एकाही निष्पाप नागरिकाच्या मृत्यूची तक्रार नाही. या पलटणीला अद्यापपर्यंत सुमारे ७५ वीरपदकांनी गौरवण्यात आले आहे. त्यात तीन कीर्तिचक्र आणि १६ शौर्यचक्रांचा समावेश आहे.     

ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे. त्याची चौकशी मुलकी आणि लष्करी बाजूने उच्च स्तरावर करण्यात येत आहे.  परंतु घटनेचे काही महत्त्वाचे पैलू अधोरेखित झाले पाहिजेत. पहिला, कमांडोंचे काम अचानक येणाऱ्या आणि अनोळखी दहशतवाद्यांवर आधी मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणे हे असते. त्यांना मिळणारी संधी पुढे केस आणि मागे टक्कल असलेल्या व्यक्तीसारखी असते. पुढून तिचे केस धरून पकडली नाही तर ती हातातून सुटून जाते. दुसरा, काही दहशतवादी येणार असल्याचे त्यांची वेळ आणि जागेसह विश्वसनीय स्राोतांतून माहिती मिळाली होती.  तिसरा, दहशतवादी जाळ्यातून सुटून जाऊ न देण्यासाठी त्यांच्यावर वेळीच प्रहार चढवणे हे आवश्यक असल्याचे ठाऊक असूनही ऐन वेळी कमांडरने त्यांना थांबवून ओळख पटवण्याचे आदेश दिले. चौथा, ‘गाडी थांबवण्याचा इशारा न देता आमच्यावर अचानक गोळीबार झाला,’ हे त्यांच्यातील एका जखमी व्यक्तीचे विधान पडताळून पाहाणे आवश्यक आहे. ते खरोखरच दहशतवादी असते आणि पुढे जाऊन त्यांनी काही दहशती कृत्ये केली असती तर त्याचा पूर्ण दोष कमांडरच्या वाट्याला आला असता. पाचवा, चुकीच्या लोकांवर गोळीबार केला गेला आहे याची जाणीव झाल्यावर कमांडरने पोलीस येण्यापर्यंत थांबण्याची आर्जवे गावकऱ्यांना केली होती, परंतु गावकऱ्यांनी जवानांवर हल्ला चढवला. सहावा, दोन्ही जखमी गावकऱ्यांना जवानांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सातवा, २१ एसएफचे अर्ध्याहून अधिक जवान ईशान्य भारतातील आहेत. आपल्याच लोकांवर विनाकारण हल्ल्याचा अविचार ते करणार नाहीत.

मतपेटीच्या वेदीवर बळी?

नागालँड-मणिपूरच्या हिंसाग्रस्त भागात प्रस्तुत लेखकलाही सुमारे ३० वर्षांपूर्वी एक माऊंटन ब्रिगेडचे नेतृत्व करण्याची संधी लाभली आहे. तिथे किंवा काश्मीरमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि जवान यांच्या द्विधा मन:स्थितीची कल्पना सामान्य नागरिकाला येणे कठीण आहे, तर मतपेटीसाठी काही राजकारणी नेते ते कळूनही न कळल्यासारखे करणे साहजिकच आहे. या प्रकरणात ज्यांची चूक आहे त्यांना अवश्य शिक्षा मिळाली पाहिजे, परंतु मतपेटीच्या वेदीवर लष्कराचा बळी देणे हा लोकशाहीचा विरोधाभास ठरेल.

या दुर्दैवी प्रसंगाचे दूरगामी परिणाम होणार यात तसूभरही संशय नाही. नागालँडमधील फुटीरवादावरील तोडगा काही पूर्णत्वाला येण्याच्या सध्याच्या आशेला तडे जाणार आहेत. सैनिकदलांना दहशतवादग्रस्त भागात विशेष अधिकार देण्याबद्दल कायदा (अफ्स्पा) मागे घ्यावा या मागणीला पुनश्च उठाव मिळणार आहे आणि त्यावर निवडणुकांच्या या हंगामात मोठ्या प्रमाणावर राजकारण होणार आहे. हे दोन वेगवेगळ्या चर्चेचे मुद्दे आहेत. परंतु याबाबतीत ‘शृंगापत्ती’ नावाची गोष्ट आठवते. काळवीट त्याच्या शिंगांमुळे वारंवार झुडपात अडकून पडे आणि त्यामुळे आपली शिकार होईल अशी त्याला भीती वाटत असे. मग त्याने देवाकडे आपली शिंगे काढून घेण्याचा वर मागितला. त्याची शिंगे गायब झाल्यावर शिंगाच्या भीतीने त्याला वचकून राहणारे प्राणी त्याला घाबरेनासे झाले. अफ्स्पा रद्द केल्यावर लष्कराची अशीच गत होणार नाही ना? 

लेखक भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी (मेजर जनरल) आहेत.  

shashipitre@gmail.com