‘‘मुद्रित .. ? आणि पुढे काय म्हणालीस तू?’’ माझी एक वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ मैत्रीण मला विचारत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिला ‘मुद्रितशोधन’ हा शब्द कळला नव्हता. अर्थात सध्या प्रकाशन क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांनासुद्धा कदाचित हा शब्द नवा असू शकतो. तिने मात्र हा शब्द कळल्यावर जाणीवपूर्वक वापरायला सुरुवात केली ही जमेची गोष्ट.

प्रूफं, कॉपी, प्रूफरीडिंग, पिंट्रिंग, प्रेस हे शब्द अनेक वर्ष प्रकाशन क्षेत्रात रुळले आहेत. त्याचबरोबर ‘मुद्रितं’ किंवा ‘छापील प्रत’, ‘मुद्रितशोधन’, ‘छपाई’, ‘छापखाना’ किंवा ‘मुद्रणालय’ हे शब्दही काही जण आजही वापरतात. पण त्यातल्या त्यात लिखाणात हे शब्द मोठय़ा प्रमाणात वापरले जातात आणि बोलण्यातून मात्र हे मराठी शब्द गायब झाल्याचं जाणवतं.

पुस्तकांसंदर्भात ‘मुखपृष्ठ’, ‘मलपृष्ठ’ किंवा ‘पाठपृष्ठ’ हे शब्द वापरले जातात. मुखपृष्ठाच्या आत लगेच येणाऱ्या टायटल पेजसाठी ‘शीर्षपान’, ‘शीर्षकपान’, इम्प्रिंटसाठी ‘प्रकाशनठसा’, ‘प्रकाशनमुद्रा’ असे शब्द सुचवता येतील, तर कॉपीराइटसाठी ‘प्रताधिकार’ हा शब्द वापरात आहे. पुस्तकाच्या पाठपृष्ठावर लिहिलेल्या ब्लर्बला ‘प्रशस्ती’ म्हणणं प्रशस्त वाटतं का? नाही तर ‘पुस्तकओळख’ असंही म्हणता येईल.

लेआऊटसाठी ‘रचना’, ‘मांडणी’, फॉन्टसाठी ‘टंक’, ‘मुद्राक्षरे’, टायिपगसाठी ‘टंकन’, ‘अक्षरजुळणी’ असे अर्थवाही शब्द आहेत. इंट्रोसाठी ‘परिचयओळी’, फोटोकॅप्शनला ‘चित्रओळ’ म्हणता येईल.

‘डेडलाइन’चा ताण सर्वानाच असतो. तो ‘कालमर्यादा’ या शब्दाने जाणवतोच, पण ‘डेड’मधली भीती आणायची असेल तर ‘काळ’मर्यादा म्हणावे का? फाइलसाठी ‘धारिका’ म्हटलं जातं.

पीडीएफसाठी ‘बंदिस्त धारिका’ वाचनात आलं आणि अगदी आवडलं. पुस्तक वाचताना ‘पुस्तकातली खूण’ आठवून देणारं ‘खूणपत्र’ किंवा ‘वाचनखूण’ हे बुकमार्कला पर्याय ठरू शकतात.

हे सदर सुरू झाल्यावर अनेकांनी हे पर्यायी मराठी शब्द पुढे आणण्याचं स्वागत केलं, तर काहींच्या मनात काही प्रश्न आले. पर्यायी मराठी शब्द उच्चारायला ‘जड’ आहेत’ असं काहींना वाटलं. पण खरं तर भाषेच्या किंवा भाषकांच्या दृष्टीने एखादा शब्द ‘जड’ नसतो. तुलना केलीच तर अनेक इंग्रजी शब्द उच्चारायला ‘जड’ असले तरी आपण ते बोलतो. त्यामुळे फक्त गरज आहे ती मराठी शब्द प्रतिष्ठापूर्वक स्वीकारून त्यांना दैनंदिन व्यवहारात वापरण्याच्या इच्छाशक्तीची.

– वैशाली पेंडसे-कार्लेकर

  vaishali.karlekar1@gmail.com