मिलिंद मुरुगकर milind.murugkar@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिंदू संस्कृती नास्तिकतेलाही कवेत घेणारी, व्यक्तिस्वातंत्र्य मानणारी आहे ; हे लक्षात न घेणारे राजकारण या संस्कृतीसाठी धोक्याचेच..
मुद्दा राज ठाकरे हा नाही. किंवा शरद पवार हाही नाही. गेल्या अर्ध्या शतकाहून जास्त काळ शरद पवार राजकारणात आहेत. पण या काळात पवार यांचे नास्तिक असणे किंवा देवळात क्वचितच जाणे हे मुद्दे राजकीय व्यासपीठावरून कधीच मांडले गेले नाहीत. ते काम राज ठाकरेंनी ‘उत्तरसभा’ म्हणून ठाण्यात मंगळवारी झालेल्या सभेत पहिल्यांदा केले. ते त्यांनी केले कारण त्याचा आपल्याला राजकीय फायदा मिळेल असा स्वाभाविकच त्यांचा होरा असणार. आणि हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. असल्या प्रकारचे राजकीय हिशेब कुणी करणे, ही महाराष्ट्रासाठीच नाही तर हिंदू धर्मासाठीदेखील दुर्दैवाची गोष्ट आहे.
नास्तिकतासुद्धा मान्य असणे आणि त्या नास्तिक परंपरेबद्दल आदर असणे हे फक्त हिंदू धर्मातच आहे. आणि हे या धर्माचे अनोखेपण आहे. पण अलीकडच्या काळात हिंदू धर्माचे हे अनोखेपण संपुष्टात येत चालले आहे . इस्लाममधील कट्टरता हिंदू धर्मात आणण्याचा प्रयत्न होतो आहे. राज ठाकरेंना शरद पवारांच्या नास्तिकतेचा मुद्दा उपस्थित करावासा वाटणे हे बरेच काही सांगते. शरद पवारांच्या नास्तिकतेबद्दल मी फक्त जाता जाता बोललो, ते फक्त सहज केलेले विधान होते- हे युक्तिवाद तकलादू आहेत. आणि ज्या मुद्दय़ांच्या संदर्भात हे विधान केले गेले त्यात राज ठाकरेंचे राजकारण स्पष्ट दिसते.
एखाद्या मुस्लीम बहुसंख्य असलेल्या देशातील, उदाहरणार्थ तुर्कस्तानातील सेक्युलर माणसाला धार्मिक अस्मितेचे तेथील राजकारण (म्हणजे इस्लामी मूलतत्त्ववादी राजकारण) जितके धोकादायक वाटत असते तितके हिंदूत्ववादी राजकारण आपल्याला धोकादायक न वाटण्याचे कारण हिंदू धर्म आणि इस्लाम यांच्यातील गुणात्मक वेगळेपणात आहे. हिंदू धर्म हा इस्लामसारखा धर्मग्रंथावर आधारित संघटित धर्म नसल्यामुळे हिंदू धर्मात लोकशाहीला आणि व्यक्तिस्वातंत्र्याला बळ देणारी जशी मूल्ये आहेत तशी इस्लाममध्ये नाहीत. त्यामुळे ‘व्यक्तिस्वातंत्र्य आणि इस्लाम यांच्यात जसा विरोधाभास आणि तीव्र संघर्ष आपल्याला दिसतो, तसा संघर्ष हिंदू अस्मितेचे राजकारण आणि व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही यात असणार नाही’ हा आपला समज खोटा होता हे आता कळू लागले आहे. हिंदू धर्मपरंपरेतील हे वैशिष्टय़े टिकून राहतीलच असे आपण गृहीत धरून चालणे हे चुकीचे आहे हेदेखील अलीकडील काळात स्पष्ट झाले आहे. राज ठाकरेंचे राजकारण या बदलाचेच एक उदाहरण आहे. अगदी सश्रद्ध हिंदूंनीदेखील खडबडून जागे होऊन हे राजकारण ओळखण्याची गरज आहे.
धर्मात कट्टरता आणण्यासाठी धर्म एखाद्या ग्रंथाशी किंवा चर्चसारख्या संस्थेशी बद्ध असण्याची गरज नाही. त्या धर्मातील लोकांना तुमच्यावर इतिहासात खूप अन्याय झालाय आणि तुम्ही बहुसंख्य असूनदेखील खूप अन्याय होतोय असे सतत वर्षांनुवर्षे, दशकानुदशके सांगत राहिले की लोकांमध्ये अन्यायग्रस्ततेची जाणीव तयार होते आणि ती जाणीव वाढवत नेली, पेटवत ठेवली की समाजात कट्टरता येण्यास सुरुवात होते. आज अशी परिस्थिती आहे की हिंदूंना आपल्या समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि खुल्या परंपरेचा विसर पडला आहे.
‘वारीतील सामर्थ्य समता संगराला लाभावे’ या शीर्षकाच्या आपल्या एका लेखात डॉ. नरेंद्र दाभोलकर लिहितात : ‘वारीच्या काळात वारकरी रोज वीस-वीस किलोमीटर चालतात. मिळेल ती भोजन -निवास व्यवस्था स्वीकारतात. पावसाचे झोडपणे, चिखल तुडवणे आनंदाने स्वीकारतात. वारकरी माळ धारण करतात. एका अर्थाने व्रतस्थ होतात. वारीच्या सोहळय़ाचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांतीची प्रस्थापना आणि मानवतेची समानता हा असतो.’ नरेंद्र दाभोलकरांना वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम वाटणे हे स्वाभाविक होते. जो संघर्ष तुकाराम आणि इतर संतांनी सनातन्यांविरुद्ध केला तसाच संघर्ष दाभोलकरांना करावा लागला आणि त्यासाठी त्यांना बलिदानही करावे लागले. अनेक हिंदूत्ववादी लोकांचादेखील सनातनवादी विचारांना विरोध असतो. पण एकदा का लोकांचे धार्मिक अस्मितेच्या मुद्दय़ांवर राजकीय ऐक्य साधायचे ध्येय बाळगले की सनातनवादी प्रवृत्तीबद्दलदेखील मौन बाळगावे लागते.
आज जेव्हा आपले पंतप्रधान दिवसभरात भगव्या रंगाच्या अनेक छटांचे अनेक पोशाख दिवसभरात घालून गंगापूजन करतात आणि नंतर समोर बसलेल्या दाढी आणि जटा वाढवलेल्या साधूं(?)च्या जमावाला अत्यंत आदराने ‘संत समुदाय’ असे म्हणतात तेव्हा हिंदू संस्कृतीचे अध:पतन किती मोठे झाले आहे हेच आपल्यासमोर येते. कारण ‘संत’ हा शब्द तुकारामासाठी आहे, ज्ञानदेवासाठी आहे, चोखोबासाठी आहे, कबीर, मीरा यांच्यासाठी आहे. आणि आपले पंतप्रधान संत कोणाला म्हणताहेत तर शेकडो जमिनींची मालकी असणाऱ्या मठाधिपतींना- ज्यांचा अहंकार, क्षुद्रपणा कुंभमेळय़ात उघड दिसतो. त्यांचे क्षुद्र राजकारणदेखील. पण हा मुद्दा उघडपणे विचारणे हे कोणताही स्वत:ला सनातनी न मानणारा पण हिंदूत्ववादाचा समर्थक असलेला माणूस करत नाही. हा ढोंगीपणा आज समाजमान्य आहे.
या तथाकथित संतांची राजकीय ताकद इतकी मोठी आहे की करोनाची लाट अगदी भरात असतानादेखील अत्यंत बलवान असलेल्या केंद्र सरकारला कुंभमेळय़ावर बंदी नाही घालता आली. किती लोकांना यामुळे प्राण गमवावे लागले असतील. पण आज ही चर्चादेखील मोकळेपणाने करण्याची कोणाची हिम्मत नाही.
एका अभंगात तुकाराम म्हणतात, ‘मांडीना स्वतंत्र फड, म्हणे अंगा येईल अहंता वाड। नाही शिष्यशाखा, सांगो अयाचित लोका’ अशी अहंकार वाढवणारी स्वतंत्र फड आणि शिष्यशाखा जमवणारी ‘आसाराम’ प्रवृती ही आज साधुसंत म्हणून मान्यता पावली आहे हा तुकारामाचा मोठा पराभव आहे. पण याची फारशी खंत हिंदू धर्मीयांना वाटते आहे असे दिसत नाही. हिंदूत्वाच्या राजकारणात तुकारामाचा पराभव अपरिहार्य आहे. कारण हिंदूत्वाचे राजकारण व्यक्तीला ‘हिंदू’ नावाच्या समूहवादी अस्मितेत कोंडण्याचे आहे, तर तुकारामाचे ध्येय व्यक्तीला अहंभावापासून मुक्त करण्याचे असल्याने तुकारामाची मांडणी अस्मितावादाला मुळातून छेद देणारी आहे.
इस्लाम आणि सुफी परंपरा यात जे विळय़ाभोपळय़ाचे नाते आहे तेच नाते वैदिक परंपरा आणि संतांची भागवत परंपरा यांच्यात आहे. आणि आज हिंदूत्ववादी राजकारणाला जवळचे वाटणारे सर्व संत (?) हे कोणत्याही जातीतून आलेले असले तरीही ते वैदिक परंपरेशी नाते सांगतात यात आश्चर्य नाही. मध्ययुगीन कालखंडात जेव्हा इस्लामी राजांची आक्रमणे होत होती तेव्हा हिंदू अस्मितेखाली हिंदूंचे राजकीय संघटन करणे हे समजण्यासारखे होते. पण आज ८० टक्क्यांहूनही जास्त हिंदू समाज असलेल्या देशात हिंदूंमध्ये असुरक्षितता आणि त्यातून आक्रमकता निर्माण करण्याचे राजकारण म्हणजे हिंदूंमध्ये इस्लाममधील कट्टरता आणण्याचा प्रयत्न आहे. पण दुर्दैवाने हिंदू समाजाला याचे भान नाही.
राज ठाकरे त्यांच्या भाषणात त्यांच्या आजोबांचा म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचा उल्लेख नेहमी करतात. पण प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराचा मात्र अजिबात करत नाहीत. त्यांच्या एखाद्या शब्दाचा, वाक्याचा उल्लेख करतात. पण प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा राज ठाकरेंनी कधीच झुगारून दिला आहे. प्रबोधनकार ठाकरे. हिंदू धर्मातील कर्मकांड, ब्राह्मणशाही यावर कोरडे ओढणारे मोठे समाजसुधारक होते. आज परिस्थिती अशी आहे की प्रबोधनकारांचे विचार लोकांना सांगणेदेखील धोक्याचे ठरू शकते. राज ठाकरे याच राजकारणाला पाठबळ देत आहेत.
शरद पवारांच्या सर्व राजकीय विरोधकांनादेखील एक गोष्ट मान्य करावी लागेल की राजकीय फायद्यासाठी त्यांनी विश्वास नसताना हातात गंडेदोरे बांधले. नाहीत शक्यतो देवळात जाण्याचे टाळले. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी तसे केले असते तर त्याचा त्यांना राजकीय फायदाच झाला असता. पण त्यांनी तसे केले नाही म्हणून ते आजच्या काळात वेगळे ठरतात आणि या कारणासाठी आदरणीय ठरतात. नेमकी तीच गोष्ट राज ठाकरे त्यांच्या विरुद्ध वापरत आहेत. पण इतकेच नाही. आजच्या महाराष्ट्राला माहीत नसलेली एक गोष्ट इथे नमूद करणे गरजेचे आहे. मुस्लीम धर्मातील कट्टरतेविरुद्ध लढा देणारे समाजसुधारक हमीद दलवाई यांचे शरद पवार हे जवळचे स्नेही. हमीद दलवाईंचे अकाली जाणे ही देशासाठी दुर्दैवाची गोष्ट. अखेरच्या दिवसांत दलवाईंचा मुक्काम शरद पवारांच्या घरी असायचा. हमीद दलवाई मुस्लीम धर्ममरतडांना शत्रूच वाटत, पण शरद पवारांनी त्यामुळे आपली मुस्लीम मते जातील याची तमा नाही बाळगली. त्यांची मैत्री उघड होती. आजच्या काळात जेव्हा धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे राजकारण कमालीचे यशस्वी होते आहे, त्या काळात हा इतिहास खूप मोलाचा आहे.
राज ठाकरेंना खरेच हिंदू धर्मीयांसाठी, हिंदू धर्मासाठी काही तरी विधायक करायचे असेल तर त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाचा वापर आपल्या आजोबांचे म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी करावा. हिंदू धर्माचा ऱ्हास थांबवण्याचा तो एक मोठा मार्ग आहे. पण राज ठाकरे तसे करणार नाहीत. ते वेगळय़ा प्रवासाला निघाले आहेत. लेखक सामाजिक चिंतन वज्र्य न मानणारे, कृषी-अर्थकारणाचे अभ्यासक आहेत.