रॉक्सी स्वीआतो
रॉक्सलाना स्वीआतो ही कीवची नागरिक. तिशीतली रॉक्सी एक धगधगतं विचारकुंड आहे. भावना आणि बुद्धी यातलं संतुलन सांभाळणाऱ्या या तरूण लेखिकेने ‘काहीही झालं तरी मी हा देश सोडणार नाही,’ असं तिच्या जर्मन मित्राला ठामपणे सांगितलंय. तिचे वडील आणि भाऊ रशियन रणगाडय़ांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सध्या ती वयस्क आई आणि मावशीबरोबर शेल्टरमध्ये राहतेय. तिथून तिचा हा प्रत्यक्षानुभव..
आज ‘जबरं युद्ध’ सुरू झाल्याचा बारावा दिवस. युक्रेनच्या जनतेला मिळालेला एक नवा संदर्भ. आज कुठला तारीख- वार आहे हे नाही सांगू शकणार कदाचित, पण दोन दिवसांपूर्वी काय घडलं ते लक्षात आहे. आमच्यातल्या अनेकांची झोप हरपली आहे, त्याचे परिणाम शरीर आणि मनावर होतातच. आमच्यापैकी हजारो तर आता शेल्टर्समध्ये राहायला लागलेत. एक मात्र नक्की की, हा संघर्ष किती का लांबेना, आम्ही जगणार आणि लढत राहणार. या बारा दिवसांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, पण आमची देशभावना उद्ध्वस्त झालेली नाही, उलट आता आम्हाला आणखी बळ आलंय, निर्धार कडवा होतोय.
२४ फेब्रुवारीला रशियाने आमच्यावर आक्रमण केलं, याला रशियाच्या अध्यक्षांनी ‘स्पेशल ऑपरेशन’ असं गोंडस नाव दिलं. एवढा मोठा हल्ला का? तर त्यांना आमचा देश ‘डिमिलिटराइझ’ करायचा होता, इथला नाझीझम थांबवायचा होता. हे हिवाळय़ात भल्या पहाटे चार वाजता सुरू झालं तेव्हा वेगवेगळय़ा शहरांतले आमचे मित्र, नातेवाईक झोपेतून खडबडून जागे झाले ते कानठळय़ा बसवणाऱ्या आवाजांनी. हे आमच्या शहरांवर होणारे बॉम्बहल्ले होते. असल्या भ्याड आक्रमणासाठी अशीच वेळ निवडली जाते. नाझी जर्मनीने नाही का पोलंडवर १९३९ मध्ये असाच तर हल्ला केला होता; आणि त्याचा भडका उडून जग दुसऱ्या महायुद्धाकडे ढकललं गेलं होतं. खरं तर पुतिन आणि हिटलरमध्ये जी तुलना होते ती अस्थायी नाहीच.
गेल्या दोन आठवडय़ांत आमची अनेक शहरे बॉम्ब आणि अस्त्रांनी भग्न करून टाकली आहेत. युक्रेनच्या दहा लाख नागरिकांना युद्ध सुरू झाल्यापासून इच्छेविरुद्ध देश सोडावा लागला आहे. १९३९ नंतर नागरिक अशा प्रचंड संख्येने देशोधडीला लागणं हे मानवतेला पायदळी तुडवणारे संकट आहे. हजारोंहून अधिक निष्पाप मुलं या हल्ल्यात जखमी झाली आहेत. मुलांना सुरक्षित स्थळी नेऊ पाहणाऱ्या पालकांच्या गाडय़ांवर गोळय़ा झाडल्या आहेत. काही त्यांच्या घरांच्या समोर मरून पडली आहेत. राजधानी कीव्हवरच्या हल्ल्यात हॉस्पिटलवर बॉम्ब पडल्याने रुग्ण मुलं मृत्युमुखी पडली. ती खूप आजारी असल्याने डॉक्टरांनी पालकांना त्यांना घरी नेऊ दिलं नव्हतं.
वृद्ध माणसं कीव्ह, मारिओपूल, खारकीव्ह, सुमी, चेर्नीयिव, खेरसानसारख्या बडय़ा शहरांच्या ध्वस्त झालेल्या घरांत हजारोंच्या संख्येने अडकून पडली आहेत किंवा तगून राहिली आहेत. छोटय़ा होस्तोमेल, इरपीन, बूखा, वोलनोवाखा, इझिअमसारख्या शहरांतही तेच चित्र. काय धोका होता रशियाला यांच्यापासून? मार्च म्हणजे युक्रेनमध्ये हिवाळय़ाचाच महिना आणि त्यांच्याकडे ना हीटिंग चालू आहे, ना वीजपुरवठा. आता अनेकांकडचे अन्नपाणीदेखील संपणार आहे. अनेक ठिकाणांहून लूट आणि बलात्कारांच्या बातम्या येत आहेत. रशियानं सगळेच नियम धाब्यावर बसवलेत आणि नि:शस्त्र लोकांच्या सोडवणुकीसाठी बनवलेल्या ‘ग्रीन कॉरिडॉर्स’वर बॉम्बज् टाकले गेले आहेत. रेडक्रॉसच्या नियमांनुसार स्त्रिया आणि मुले सुरक्षित स्थळी हलवली जाऊ शकलेली नाहीत, कारण यासंबंधी झालेला कुठलाही करार हल्लेखोर पाळायला तयार नाहीत. जीनेव्हा कन्व्हेंशनने नाकारलेली शस्त्रास्त्रे रशिया दामटून वापरतोय. हे कमी होतं की काय म्हणून रशियन सेनेने झापोरीझाझिया अणुशक्ती केंद्रावर चढवलेला हल्ला हा युरोपातील सर्वात भयानक म्हणायला हवा. त्याचा भडका उडाला तर विश्वव्यापी स्फोट होऊ शकतो, १९८६ च्या चेर्नोबिलपेक्षा किती तरी पटीने अधिक!
सगळं जग आणि इंटरनेट या आक्रमणाने झालेल्या विध्वंसाच्या कहाण्या आणि छायाचित्रांनी भरलेलं आहे. या आधी कधी कोणा राष्ट्रावर लावले गेले नव्हते असे अभूतपूर्व निर्बंध वेगवेगळय़ा दिशांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेवर घालण्यात आले आहेत. जेणेकरून या विध्वंसक वेडेपणाला लगाम लागावा; पण याचा रशियावर काही परिणाम झालेला दिसत नाही. ते प्रसारमाध्यमांत रेटून सांगत आहेत की, युक्रेनमध्ये नागरिकांना काहीही धोका नाही, उलट ते सत्तेतवरील ‘नाझींपासून’ नागरिकांच्या ‘स्वातंत्र्या’च्या रक्षणासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देताहेत. ‘युक्रेनिअन जनता ही रशियन जनतेचाच भाग आहे’, असं म्हणून त्यांनी आमचं स्वतंत्र नागरिकत्वच नाकारलं आहे. हे जे कथ्य (नॅरेटिव्ह) आहे ते त्यांनी क्रीमिया बळकावून २०१४ पासून डोंबासमध्ये सुरू केलेल्या प्रचाराचीच कहाणी पुढे चालू ठेवणारं आहे- की इथल्या नाझींनी अमेरिकेच्या मदतीने सत्ता बळकावली असून कीव्हच्या बंडानंतर डोंबासमधल्या रशियन भाषिक जनतेचा छळ मांडण्यात आला आहे.
अशा कुटिल विधानांतून अनेक अर्थ ध्वनित होतात. सर्वात प्रथम म्हणजे ज्यांना नाझी म्हटलं जातंय ते आमचे पंतप्रधान वोलोदिमीर झेलेन्स्की यांचं कुटुंब रशियन भाषी, मूळचे ज्यू! अगदी महिन्यापूर्वी झेलेन्स्कींनी आशा व्यक्त केली होती की, पुतिनचे मन वळवून त्यांना युक्रेनमध्ये शांतता राहावी असं धोरण बनवता येईल, पण त्यावर रशियन प्रचारावर भरोसा ठेवणाऱ्यांखेरीज कोणी विश्वास ठेवलेला नव्हता; पण ती आशा पोकळ निघाली, कारण तेव्हा पुतिन आक्रमणाचे नियोजन पक्के शिजवून बसलेले होते. दुसरं म्हणजे, ज्या डोंबासवासीयांची सुटका करण्याची ते ग्वाही देत होते तेच क्रूर विरोधाभासाने त्यांच्या आक्रमणाचे पहिले बळी ठरले आहेत. डोंबासची औद्योगिक शहरे इतक्या प्रखर हल्ल्याखाली आली, की वोलनोवाखा किंवा शास्तीया (याचा अर्थ ‘आनंद’ असा होतो) मध्ये एक दगडसुद्धा अखंड राहिलेला नाही. तिसरं- अमेरिकेच्या साहाय्याने जी ‘युक्रेनियन रेव्होल्यूशन ऑफ डिग्निटी’ उभी राहिली यात काही तथ्यच नाही आहे. या क्रांतीमुळे भ्रष्टाचारी राष्ट्राध्यक्ष यानुकोविचना पळून रशियात आश्रय घ्यावा लागला ते काही बाहेरून आलेल्या विचारामुळे नव्हे, तो लाखो युक्रेनियन नागरिकांनी भर हिवाळय़ात देशाच्या राजधानीच्या प्रमुख चौकात एकत्र होऊन केलेला प्रतिकार होता. त्यांना युरोपच्या बाजूला राहायचं होतं, रशियाच्या नव्हे. आमच्या शंभरेक जणांना त्या दिवशी गोळय़ा घातल्या गेल्या.
आणि आता कळीचा मुद्दा. या चढाईसाठी कारण काय? युक्रेनियनांनी धैर्यपूर्वक हे आव्हान स्वीकारलं आणि दहा हजार रशियन सैनिकांची आहुती दिली. (हा आकडा कमी दाखवून रशिया त्यांच्या जनतेबद्दल किती जागरूक आहे हे त्यांनी दाखवून दिलेच आहे.) सहा महिन्यांपूर्वी पुतिन यांनी लिहिलेल्या अशाच दिशाभूल करणाऱ्या लेखातून युक्रेन अयशस्वी का झालं याची त्यांच्या दृष्टीने कारणं मांडली होती. त्यांनी पुढे हेही म्हटलं आहे की, युक्रेन हा स्वतंत्र देश असू शकत नाही. ती एक ‘ऐतिहासिक चूक’ होती आणि लेनिनच्या कृपेने हा नवा शोध लागला होता. हे सर्व या पार्श्वभूमीवर, की १९९१ मध्ये एक देश म्हणून मान्यता देणाऱ्या १७१ देशांपैकी एक रशियाही होता. इतकेच नव्हे तर तो अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनसारखा आमचा गॅरेंटरही होता. १९४च्या बुडापेस्ट करारानुसार युक्रेनला या तिघांकडून संरक्षण मिळणार होतं आणि त्या बदल्यात युक्रेननं अण्वस्त्रे बाळगायची नव्हती.
आता विघटित झालेल्या रशियाला परत एक संयुक्त महासत्ता बनवण्याची स्वप्नं पुतिनना पडायला लागली आहेत. ते स्वत:ला त्यांचा सम्राटच मानतात. सगळी रशियन भूमी एकत्र यावी असं त्यांच्या मनात आहे. या आंधळय़ा इच्छेपोटी ते ऐतिहासिक सत्ये तोडफोड करून वापरतात, यथार्थाशी संबंध तोडून नवा इतिहास रचू पाहतात- जो सतत रशियन दूरदर्शन वाहिन्यांवरून प्रसारित होत असतो. या इतिहासात युक्रेनचं काही स्थान अर्थातच नाही. महाकाय साम्राज्य फक्त रशियाचंच असणार, नाही का?
इथे १९३२-३३ मध्ये स्टालिनच्या क्रूर राजवटीत ‘कृत्रिम भुकेमुळे’ (‘हॉलोमोडोर’ म्हणे!) युक्रेनमध्ये ४० लाख भूकबळी झाले, ते विसरूनच जायचं. लोकांनी बलिदान देऊन अमाप त्याग करून लढून झगडून बनवलेला प्रजासत्ताक युक्रेन यांच्या लेखी देशच नाही. इथल्या जनतेचा १९१७-२१ चा लोकशाहीसाठी उभारलेला लढा बोल्शेव्हिकांनी चिरडून टाकला. जनतेने निवडून दिलेले तगडे प्रतिनिधी उचलून तुरुंगात टाकले आणि १९३८ मध्ये संदार्मुख (कारेलिया) यांना मारून टाकलं, कोणताही आरोप नसताना. गुलाग आणि सायबेरियात मेलेले हजारो देशबांधव, काहींना देश सोडून, घाबरून दुसऱ्या देशात शरणार्थी म्हणून राहावं लागतंय. आपली ओळख, पाळेमुळे लपवावी किंवा विसरून जावी लागताहेत त्यांचं काय? त्या लाखोंचं काय, ज्यांना आपला जीव वाचवायला आपली संस्कृती, भाषा आणि लागेबांधे तोडून टाकून ‘युएसएसआर’चे ‘चांगले’ नागरिक बनून राहावं लागतंय? अशा स्वत्व गमावलेल्या, स्वाभिमान विकलेल्यांना हाती धरून पुतिन त्यांच्या कल्पनेतल्या रशियन साम्राज्याची मोट बांधू पाहताहेत.
पण या ३० वर्षांच्या स्वातंत्र्यात विशेषत: रेव्होल्यूशन ऑफ डिग्निटीनंतर युक्रेनची जनता खूप बदललीय. सामाजिक सुधारणा सुरू झाल्या आहेत. आमच्या संस्कृतीत सर्जनातून माणूसपण अधोरेखित करणारे पुनरुज्जीवनाचे झरे परत मनांमधून झुळझुळु लागलेत, त्यातले सगळेच जगासमोर येत नाहीत; पण ते आकार घेत आहेत. आम्ही एक लोकशाही बांधू पाहतोय. आमचे काही अंदाज चुकलेही आहेत, काही ठिकाणी अपेक्षित यश मिळालेलं नाही; पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही, आता माघार नाही.
आजच्या युक्रेनच्या तरुणाईने रशियापासून वैचारिक, सांस्कृतिक फारकत घेतलेली आहे, अगदी समकालीन रशियाशीसुद्धा त्यांना देणं-घेणं नकोय. ही पिढी चारचौघा युरोपियन तरुणांसारखी, त्यांना कमीत कमी दोन व तीन युरोपिअन भाषा येताहेत, ज्यांना शिक्षणानंतर चाकोरीत बांधलं जाण्याआधी जगप्रवास करत वेगवेगळय़ा संस्कृतींबद्दल जाणून घ्यायचंय, पोलादी पडद्याआड पिढयान् पिढय़ा निमूटपणे राहावं लागलेल्या आजीआजोबांना शक्य नव्हतं. केवळ शस्त्रास्त्रांना घाबरून ‘रशियन दुनिये’चा भाग बनण्याची, आजवरची वाटचाल विसरून जायची कल्पना आम्हाला हास्यास्पद वाटते आणि आम्ही ती कदापि स्वीकारणार नाही. या दहशतपूर्ण रशियन आक्रमणाने कितीही बळी जावोत, आम्ही तयार आहोत, राहू.. असा आजवर सहनशील पवित्रा घेणारेसुद्धा ताठ मानेने म्हणत आहेत. ज्या रशियनभाषी गावांची ते भलावण करताहेत. तिथले नागरिक त्यांना रोखण्यासाठी आम्ही रशियन रणगाडय़ांसमोर जाऊन पडू, असं निर्धाराने म्हणताहेत आणि ते त्यांनी करूनही दाखवलंय. आमची घरं, आमची शहरं, आमची माणसं, प्रियजन सगळय़ांचाच घास घेत आहेत ते. आता आणखी गमावण्यासारखं काय राहिलंय? ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है..’, ‘जिंकू किंवा मरू’ यासाठी जनता तयार आहे. लढण्याखेरीज काही पर्याय नाही. आमचं स्वातंत्र्य पणाला लागलंय. त्यासाठी कोणताही धोका, कोणतीही किंमत मोठी वाटत नाही. स्वातंत्र्य ही कल्पना, हे तत्त्व आम्ही जिवंत ठेवणार, पायदळी जाऊ देणार नाही. आमचं भविष्य आमच्या हातात हवंय. कुठल्या देशाच्या हवेत श्वास घ्यायचा आणि कुठला देश घडवायचा हे आमचं आम्हीच ठरवणार. थोडक्यात सांगायचं, तर जे आम्ही जे आहोत ते टिकवून ठेवण्यासाठी प्राणपणाने झगडणार आहोत. ही लढाई जिंकणं हाच एक पर्याय आमच्यासाठी उरला आहे.
rofiesta@gmail.com
अनुवाद : अरुंधती देवस्थळे