रवींद्र पाथरे ravindra.pathare@expressindia.com
माणसाचा भवताल आणि त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात येणारे व्यामिश्र अनुभव त्याला घडवीत असतात असे म्हटले जाते. याच्याच जोडीला भोवतालचे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक पर्यावरण आणि त्या व्यक्तीची कमी-अधिक संवेदनशीलता हे घटकही कळत-नकळत तिच्यावर संस्कार करीत असतात. व्यक्तीची ही जी काही जडणघडण होत असते, त्यातूनच तिचे जगण्याबद्दलचे आकलन आणि भान आकार घेत असते आणि तेच तिच्या कोणत्याही कृतींतून व्यक्त होत असते. नाटककार, लेखक, समीक्षक आणि पत्रकार अशा विविध अंगांनी वर्तमानाला नित्य सामोरे जाणाऱ्या जयंत पवार यांच्याबाबतीत तर हे नेहमीच तीव्रतेने जाणवायचे.
त्यांचा जन्म व जडणघडण गिरणगावात झाली. चाळसंस्कृतीचे निम्न मध्यमवर्गीय म्हणा, कनिष्ठस्तरीय म्हणा, जग भोवताली अस्ताव्यस्त पसरलेले. साहजिकपणेच त्या जगण्यातून आलेली मूलद्रव्ये हीच त्यांच्या अभिव्यक्तीची सामुग्री न होती तरच नवल. या सगळ्या जगाकडे अत्यंत सहृदयतेने आणि त्याचवेळी काहीशा तटस्थतेने पाहण्याची लेखकीय वृत्ती त्यांच्या वैविध्यपूर्ण लेखनात प्रकर्षांने झिरपलेली दिसून येते. कामगार, शोषित, वंचित वर्गाबद्दल त्यांना सख्ख्या आतडय़ाची आस्था होती. या वर्गाचे जगणे, अकटोविकटीचा जीवनसंघर्ष, त्यांचे छोटे छोटे आनंदक्षण, पराभव, नियतीशरणता, प्राप्त परिस्थितीशी झगडण्याची विजिगीषु वृत्ती या सगळ्या सगळ्याचे कुतूहलपूर्ण आकर्षण लेखक म्हणून जयंत पवार यांना नेहमीच वाटत आले होते.
भाऊ पाध्ये, विजय तेंडुलकर यांच्या लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव असला तरी त्यांचे अनुकरण करण्याच्या भानगडीत मात्र ते कधी पडले नाहीत. त्यांनी आपली अशी लेखनशैली घडवली. अनेकदा तिचीही मोडतोड करत आशय-विषयानुरूप त्यांनी तिला नवी वळणेही दिली. लेखनातील त्यांच्या या ‘प्रयोगा’चा वानवळा ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ या त्यांच्या बाबुराव अर्नाळकरी शैलीतील रहस्यकथेतून मिळतो. ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ या कथसंग्रहातही त्यांनी लघुकथेचे अनेक प्रयोग केले आहेत. १९८२ च्या गिरणी संपात गिरणगावचे उद्ध्वस्त होणे त्यांनी ज्या दाहकतेने ‘अधांतर’ या नाटकातून मांडले, तिथून त्यांच्या लेखणीची नाळ इथल्या महानगरीय अधोविश्वाशी जुळली. तत्पूर्वीच्या त्यांच्या ‘वाळवी’, ‘होडय़ा’, ‘जळिताचा हंगाम’, ‘घुशी’ यांसारख्या अनेक एकांकिकांमधून महानगरीय जगण्याचे दाहक संदर्भ वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यांतून अभिव्यक्त झालेले पाहायला मिळतात. मुंबईसारख्या महानगरात आयुष्य गेलेल्या पवार यांच्या लेखनाच्या गाभ्यात ही महानगरीय संवेदना प्रामुख्याने प्रतिबिंबित झालेली दिसत असली तरी तिला ग्रामीण, वंचित, शोषितांचे जगणे अस्पर्शित मात्र नव्हते. किंबहुना, पददलित वर्गाचे कष्ट, घाम, अश्रू आणि अविश्रांत जीवनसंघर्ष यातूनच या महानगरीचा चेहरामोहरा आमूलाग्र बदलत गेला, आणि त्या पायाभरणीत अगणित कष्टकरी आयुष्ये पिचत गेली, संपली, या साध्या माणसांची ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ ही वृत्ती दिसत राहिली, या वास्तवाची जयंत पवार यांच्या लेखणीने साक्षीभावाने दखल घेतलेली जाणवते. किंबहुना, त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ आणि ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथासंग्रहांतून याची ठोस प्रचीती येते. पण त्यांनी या वंचित-शोषितांचा साहित्यातून बाजार मांडला नाही. या माणसांबद्दलची त्यांची कळकळ प्रत्यक्ष व्यक्तिगत जीवनातही प्रतिबिंबित होत असे. सामान्य माणसाला कुणीही वाली नसतो, ज्याचा क्रूस त्यालाच वाहावा लागतो, याची प्रकर्षांने जाणीव असलेले जयंत पवार या सामान्यजनांच्या लढय़ांतही वेळोवेळी सक्रियपणे उतरले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रत्येक लढय़ात ते अग्रभागी असत. प्रस्थापित राजकीय दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासही ते कधीच कचरले नाहीत. नयनतारा सहगल यांना ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक या नात्याने आपली मते मांडण्यास मज्जाव करण्यात आला तेव्हा त्यांना मुंबईत पाचारण करून त्यांची मुलाखत आयोजित करण्यासाठी अन्य समविचारी व्यक्तींबरोबर जयंत पवार यांनी पुढाकार घेतला होता. समाजात घडणाऱ्या अनिष्ट घटनांबद्दल कोठल्याही लाभ-हानीची पर्वा नमस्कार करता तातडीने आणि स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास ते कधीही कचरले नाहीत. आचार आणि विचारांतील नैतिकता त्यांनी कायम जपली. परंतु त्याचा गंड त्यांनी बाळगला नाही.
जात, धर्म, गट, पंथ यांची दुकाने उघडून स्वत:ला त्यांचा ‘आवाज’ म्हणवणारे- खरे तर या गटा-तटांना बाजारात उभे करून सत्तास्वार्थासाठी त्यांना विकणारे आपण बरेच पाहातो; पण ते काही या समाजांचे नेते नव्हेत. त्यांचा ‘आवाज’तर नव्हेच नव्हेत. समाजाची स्पंदने टिपून, लोकांच्या जिण्याला आपल्या चिंतनाची जोड देऊन आजचा काळ साहित्यात आणणारे लेखक हेच समाजाचा आवाज असतात. जयंत पवार हे या अर्थाने शोषित, वंचित, अभावग्रस्तांचा ‘आवाज’ होते. त्यांचे नसणे आता विशेषत्वाने जाणवत राहील.