(१) केव्हा केव्हा आपण शब्दाचा अर्थ लक्षात न घेताच त्याचा वाक्यात उपयोग करतो. योग्य शब्द उपलब्ध असूनही आपण चुकीच्या शब्दाची योजना करतो, त्यामुळे वाक्याच्या अर्थात चूक होते.
हे वाक्य वाचा- ‘माझ्या वाटय़ाला जाऊ नकोस. तसं केलंस तर गाठ माझ्याशी आहे.’ या वाक्यातील वाटय़ाला या विभक्तियुक्त शब्दाचे मूळ रूप आहे वाटा- (सामान्य नाम, पुल्लिंगी, एकवचन). या शब्दाचा अर्थ आहे- वाटा- हिस्सा, भाग, एखाद्या गोष्टीतील मिळणारा भाग. या शब्दाचे अनेकवचन- वाटे (पु.अ.व.). वाटा या शब्दाचा योग्य वापर पुढील वाक्यात पाहा- ‘माझ्या वडिलांच्या संपत्तीतील माझा वाटा (हिस्सा) मला मिळायला हवा.’
एखाद्याच्या वाटेला (वाटेस) जाणे हा मराठीतील एक वाक्प्रचार आहे. वाट- (नाम, स्त्रीलिंगी, एकवचन)- अर्थ लहान मार्ग, रस्ता. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे- एखादा ज्या पद्धतीने काम करीत असेल, त्यात त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या कामात अडथळा आणणे किंवा अडचणी निर्माण करणे. ‘वाटेस जाणे’ याचा ‘कुरापत काढणे’ असाही अर्थ आहे. वाट या शब्दाचे अनेकवचन वाटा (स्त्रीलिंगी) असे आहे. विभक्तिप्रत्यय लागल्यास वाट- वाटेला, वाटा- वाटांना असे होईल. हे वाक्य असे हवे- माझ्या वाटेला जाऊ नकोस, तसं केलंस तर गाठ माझ्याशी आहे.
वरील वाक्यात ‘एखाद्याच्या वाटय़ास जाणे’ हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, हे आपल्या लक्षात येईल.
(२) काही शब्द आपण बरोबर उच्चारतो, बोलताना चूक होत नाही, पण लेखनात त्या शब्दाचे चुकीचे रूप अनेकदा आढळते. विशेषत: काही शब्दांचे एकवचनी रूप बरोबर लिहिलेले असते, पण त्या शब्दांत विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यास लेखनात चूक होते. उदा. मुद्दा, गुद्दा हे शब्द. या शब्दांचे उच्चार आणि लेखनही बिनचूक होते. पण मुद्दा-मुद्याचा, गुद्दा-गुद्यामुळे अशी चुकीची रूपे लेखनात आढळतात. मुद्दा (द् द् आ), मुद्याचा (द् य आ), तसेच गुद्दा- (द् द् आ), गुद्यामुळे (द् य् आ). खरे पाहता, या शब्दांचे लेखन असे हवे- मुद्दय़ाचा, गुद्दय़ामुळे- द् द् या= द्दय़ा. – यास्मिन शेख