गीता-गीताई, धर्म विचारांचे सखोल शोधन, सर्व प्रमुख धर्मांचा सारांश, भूदान आणि शेवटी प्रायोपवेशन, विनोबांचे नाव घेतले की असे बरेच काही आठवते. अगदी सहजपणे.
परंतु विनोबांचे नाम-स्मरणाशी असणारे नाते मात्र आवर्जून आठवावे लागते. हे नाते इतके सखोल आहे की विनोबांच्या समाधीवर गीताई-रामहरि हे शब्द आहेत. यातील राम-हरि हा विनोबांचा श्वासोच्छ्वास होता आणि यात जराही अतिशयोक्ती नाही.
स्वत: गांधीजींसाठी आणि त्यांच्या परिवारात ‘रामराज्य, रामनाम’ या संकल्पना फार महत्त्वाच्या होत्या. बापूंनी रामनामाविषयी आपले विचार लिहिले आणि त्यावर विनोबांची प्रतिक्रिया मागवली. विनोबांनी ती एवढी सविस्तर आणि सखोल दिली की तिचीच एक पुस्तिका झाली. ‘रामनाम एक चिंतन’ या नावाने.
‘राम’ म्हणता तेव्हा फक्त दशरथाचा पुत्र तुम्हाला अभिप्रेत असतो का? असे विनोबांना कुणीतरी विचारले. ‘माझा राम अगोदर विश्वनंदन आहे आणि नंतर तो दशरथनंदन.’ अशा आशयाचे उत्तर विनोबांनी दिले
रामनामाची महती सांगताना, विनोबांनी भारतीय धर्म चिंतनाचा शोध घेतला आहेच पण जगातील प्रमुख धर्र्मंचतन, नामस्मरणाला किती प्राधान्य महती कशी मान्य करते याचाही सविस्तर आढावा घेऊन त्यांनी उकल केली आहे.
नाम शब्दाचा धातू ‘नम्’ आहे. त्याचा अर्थ नम्रता. नमाज शब्दही याच धातूमधून साकारला आहे. ‘नम्रतेच्या उंचीला माप नाही’, असे त्यांनी ‘विचारपोथी’मध्ये म्हटले आहे. त्याची राम म्हणजे रमवणारा, कृष्ण म्हणजे आकर्षून घेणारा आणि हरी म्हणजे उरलेले सर्व अशी त्यांनी ‘राम-कृष्ण-हरी’ची उकल केली आहे.
त्यांचे नामदर्शन एकत्रितपणे ‘श्रीविष्णुसहस्रानामा’च्या सखोल अध्ययनात आढळते. त्यांनी विष्णुसहस्रानामाचे छोटेखानी संपादनही केले. ती प्रत आपल्यासमोर आहे. विनोबांचे सहस्रानामावरचे समग्र चिंतन पुस्तक रूपातही उपलब्ध आहे.
जानकीदेवी बजाज यांना रोज एक नाम शिकवताना त्यांनी ३६५ चित्रांची सहस्रानामाची प्रतही सिद्ध केली.
विष्णुसहस्रानाम म्हणजे सद्विचारांचा प्रसार ही त्यांची धारणा होती. हजारो वर्षे घोटल्याने ‘पोटेन्सी’ वाढलेले ते ‘होमिओपॅथीचे औषध’ आहे असेही ते म्हणत. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी कार्यकर्त्यांचे स्मरण असावे म्हणून त्यांचे सहस्रानाम केले होते. ज्याचे स्मरण करायचे त्याचे नाव घेतले तो समोर येतो, असे ते सांगत.
आचार्य शंकरांनी विष्णुसहस्रानामाने भाष्यग्रंथांना आरंभ केला तर आचार्य विनोबांनी समाप्ती. त्यांनी लेखनाला पूर्णविराम दिला तो विष्णुसहस्रानामापाशी आणि दिवस निवडला तो गांधीजयंतीचा.
धर्मांच्या समन्वयाप्रमाणेच विनोबांनी नामस्मरणाचाही समन्वय साधला. जगातील सर्व धर्म, नामस्मरणाच्या बिंदूवर एकत्र येऊ शकतात आणि तसे ते यावेत अशी त्यांची भूमिका होती. आपल्या धर्मात सांगितले आहे ते नाम घेताना त्याची व्यापकता लक्षात घ्यायची असते हे त्यांचे मत, नामस्मरणाकडे संकुचित दृष्टीने पाहणाऱ्यांना विचार करायला लावणारे आहे.
– अतुल सुलाखे
jayjagat24 @gmail.com