|| प्रदीप आपटे

शब्दकोशच नव्हे तर महसूल-न्यायदान व्यवहाराचे, व्यापारी वस्तूंचे कोशसुद्धा विसावे शतक उजाडण्यापूर्वीच तयार होते! त्या काही कोशकांचे हे धावते स्मरण…

no alt text set
पावसाचे अंदाज आणि शेती
no alt text set
जिरेनियम शेती
chavadi
काँग्रेसचे हुश..
no alt text set
राखीव मार्गिकांचे खात्रीशीर गणित
no alt text set
इतिहासाचा अभ्यास आणि ‘स्मृती’..
no alt text set
भारतामुळे अन्नधान्य महागाईवर नियंत्रण!
no alt text set
अमेरिकेला तैवानमध्ये ‘संधी’ मिळेल?
no alt text set
‘ज्ञानवापी’कडून ज्ञान-सागराकडे!
no alt text set
‘बंदी’मय बेडी हवी की मूल्यसाखळी?

ग्रंथोपजीवींमध्ये एक विशेष पंथ आहे. तो स्वयंप्रज्ञेपेक्षा इतरांच्या प्रज्ञेच्या बिया पाने फुले गोळा करून निराळा नेटका वृक्षसंभार उभा करतो. कोश म्हटले की प्रथम डोळ्यासमोर येतात ते शब्दकोश! विशेषत: अनोळखी भाषा शिकताना त्याचा टेकू पावलोपावली लागतो. परंतु कोशकारांते वाट पुसत जाण वाढविणे हे फक्त भाषेपुरते सीमित नाही. सगळ्याच विषयांना आसरा देणारे ज्ञानकोश असतात. विशिष्ट विषयांपुरते पण त्यात खोल बुडी घेऊ देणारे कोशदेखील असतात. नव्या धर्तीच्या ज्ञानाच्या वाटा फुटल्या की कालांतराने त्याचा शब्दसंभार फोफावतो आणि कोश होण्याची वाट बघू लागतो.

युरोपातून आलेल्या परकीय राज्यकर्त्यांना अपरिचित भाषा, अनोख्या वनस्पती, उपयोगी कारखानदारी -कारागिरी वस्तू, स्थानिक प्रशासन आणि न्यायव्यवस्थेतले रूढ संकेतार्थी शब्द या सगळ्यामुळे भ्रांत पडायची. दुसरीकडे धर्मप्रचार आणि परिवर्तनाच्या आशेपोटी भारावलेले आणि झपाटलेले ख्रिस्तजीवी होते. देशी भाषा अवगत झाल्याखेरीज ना प्रचलित धर्म उमगणार ना त्याचा प्रतिवाद करता येणार! या दोन्ही उलघाली हाताळायला अवतरले आणि कामी आले ते कोशकार! राजहट्ट आणि धर्महट्ट या दोन्हीपोटी कोशकारांना पाठबळ मिळाले खरे; पण त्यांच्या कामाची ठेवण मोठी जिकिरीची होती. शब्द गोळा करायचे. ते त्या त्या लिपीमध्ये लिहायचे. त्याचे उच्चारण रोमनलिपीत इंग्रजी किंवा फ्रेंच/ पोर्तुगीज/ जर्मन भाषेनुरूप लिहायचे. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. कधी वापराची धाटणी आणि संदर्भानुसार त्याची अर्थच्छटा निराळी असते. दुसऱ्या भाषेतून आयात झालेले शब्द कधी मूळ अर्थाशी चिकटून असतात तर कधी भलत्याच वाटेने भरकटतात. या सगळ्याची बूज ठेवत त्यांना अकार-आकार विल्हे रांगेत उभे करायचे ही एक निराळी योगविद्या आहे. कोशयोग साधलेले बरेच जण आहेत. विल्यम कॅरीने बंगाली भाषेचा शब्दकोश केला. केशीराज कृत शब्दमणिदर्पण (कन्नडचे व्याकरण) भाषांतरित करणारा फर्डिनान्ड किट्टेल याने सत्तर हजार शब्दांचा कानडी-इंग्रजी शब्दकोश तयार केला. (या कन्नडसेवेपोटी बंगळुरात याच्या नावाने उपनगर आहे). थोहान हॉक्सलेडेनने मल्याळम्- पोर्तुगीज शब्दकोश बनविला तर हेरमान गुंडर्ट याने इंग्लिश- मल्याळम् शब्दकोश तयार केला. तोपर्यंत मल्याळी लिखाणात पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम अशी विरामचिन्हे नसायची; तीदेखील गुंडर्टनेच आरंभली. (मराठीत विरामचिन्हे कँडीने आणली.)

मराठीमध्ये असाच मोठा कोशयोग अवतरला मेजर मोल्सवर्थच्या कर्तबगारीमुळे. वयाच्या सोळाव्या वर्षी तो ईस्ट इंडिया कंपनीचा साधा सैनिक म्हणून दाखल झाला. त्याच्या मराठी आणि हिंदी भाषेच्या ज्ञानामुळे त्याला थोडा ‘भाव’ आणि बढती मिळाली. त्याची प्रकृती फार धडधाकट नव्हती. त्याचा उत्साह आणि जिद्द दुर्दम्य होती. त्याचा भाषांतर सहायक थॉमस कँडी. या दोघांनी १८१८ सालीच सोलापुरात असताना मराठी इंग्रजी शब्दसंग्रहाला प्रारंभ केला. सुरुवातीला कंपनी सरकारचे म्हणावे तेवढे प्रोत्साहन आणि पाठबळ नव्हते. आरंभी हा कोश मराठी- मराठी असा होता! १८२५ साली मंजुरी मिळाली. त्याला मुंबईत कॅप्टनपदापर्यंत बढती लाभत होती. यापुढील काळात मराठी मराठी आणि मराठी इंग्रजी अशा रूपाने कोश बनवणे सुरू झाले! थॉमस आणि जॉर्ज कँडी हे जुळी भावंडे हे त्याचे सहकारी होते. मराठी इंग्रजीच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये हा कोश कसा तयार केला याचे वर्णन केलेले आहे.

‘‘आम्ही मराठी भाषिक प्रदेशातले अनेक भागांमधले ब्राह्मण या कामी नेमले. त्यांचे काम शब्द वाक्प्रचार म्हणी गोळा करून त्याचे अर्थ आणि पर्यायी शब्द नोंदवण्याचे. मग त्यात त्या पुनरावृत्ती वगळून टाकल्या भ्रष्ट शब्द, अपभ्रंश, अपरूपे, अनुचितपणा त्याच जोडीने जे फार विद्वज्जड, आपसुखे येणारे शब्दार्थ यासाठी जमाशब्दांची गाळणी केली. असे सुमारे २५ हजार शब्द जमले. मग त्यांचे व्याकरणरूप (नाम/ लिंग/ विशेषण/ क्रियापद/ उच्चारी स्वरूप/ मूळव्युत्पत्तीकारी शब्द इ.) नोंदले. त्याचा प्रचलित लोकप्रिय वापर विशिष्ट भूभागातला वापर वापरात किती प्रचलित आहे याचा धांडोळा आणि मागोवा घेतला गेला. दुसऱ्या विभागात न्यायालयीन कचेरी आणि प्रशासनामधील वापर याबद्दल पडताळणी केली जायची. प्रत्येक उपयुक्त शब्द, नवीन शब्द, नवीन वापर याबद्दल योग्य त्या ‘अधिकारी मंजुरी’ घेतली जायची. ती नसेल तर नोंद गाळली जायची. मग पुढच्या टप्प्यात विद्वान जाणकार ब्राह्मणांबरोबर त्याचे अवलोकन, परीक्षण केले जायचे. मग त्याची सफाई करून त्याचे मोल तोलूनमापून धरले जायचे. त्यानंतर त्यांचा संक्षेप, नवीन वापर, नवा वाक्प्रचार आणि अखेरीस क्रमवारीसाठी त्याची छाननी आणि पुढची यथोचित व्यवस्था लावली जात असे.’’

 कोश तयार झाला तरी तो छापणे सुलभ नव्हते. कोलकोता सेरामपुराहून त्याचे खिळे आणावे आणि पाडून घ्यावे लागत. १८२८ साली कोशाचा पहिला मसुदा तयार झाला. प्रथम २५००० शब्दांचा महाराष्ट्रभाषेचा कोश तयार झाला. तो बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीने छापून प्रसिद्ध केला. मराठी- इंग्रजी कोशाला विलंब लागत होता. त्याचा फायदा उठवीत मोल्सवर्थने संग्रहाची शब्दसंख्या ४० हजार पर्यंत वाढविली. मोल्सवर्थचे मराठीवर मोठे दांडगे प्रभुत्व होते. त्याला त्याचे मराठी सहकारी तर आपुलकीने मोलेश्वर किंवा मोरेश्वर शास्त्री म्हणून संबोधायचे! १८५७ सालच्या आवृत्तीची १९७५ साली त्यातील मुद्रणदोष इत्यादी वगळून नव्याने आवृत्ती निघाली. त्याच्या प्रस्तावनेमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिहितात, ‘मोल्सवर्थचे मराठी भाषेवर आणि महाराष्ट्रावर इतके उदंड उपकार आहेत की त्याचा कधीच विसर पडणार नाही, पडू शकणार नाही.’

 अशी उदाहरणे प्रत्येक भारतीय भाषेनुसार सांगता येतील! पण आणखी काही कोशांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. संस्कृतचा शब्दकोश करणाऱ्या एच. एच. विल्सनवर एक भलती जबाबदारी आली. प्रशासन कायदा न्यायदान यांमध्ये अनेक खास त्या त्या भूभागात रूढावलेले पारंपरिक शब्द असतात. कंपनी कारभारामधल्या अनेक अधिकाऱ्यांच्या ते कानी पडत. बिचारे तोडके- मोडके बोबडे स्पेलिंग करून ते लिहीत. शब्दाचा नेमका उच्चार, अर्थ, प्रशासकीय अन्वयार्थ नीटसा उमगत नसे. म्हणून विल्सनला कंपनीने अशा सगळ्या प्रशासकीय आणि कायदाविषयक शब्दांचा व्याख्यार्थ सांगणारा, मूळ रूप आणि उच्चार प्रमाण रीतीने लिहिलेला कोश बनवायला सांगितले. ‘विल्सनशास्त्री’ने सगळ्या कंपनी सुभ्यांच्या प्रशासनाकडे प्रश्नावली धाडली. पण खास नोकरशाही खाक्याने त्याच्या वाट्याला निष्फळ प्रतिसाद आला. मग त्याने अदालती आणि अन्य न्यायासनांसमोर आलेले कज्जेखटले त्यातून प्रतीत होणारे वास्तवरूप यांचा शब्दकोश बनविला. निरनिराळया हिन्दुस्तानी भाषांमधले (आणि त्या त्या लिपीत छापलेले) प्रचलित शब्द, त्यांची व्युत्पत्ती आणि पोटभेदांसह व्यावहारिक अर्थ देणारा हा कोश आहे. ज्या अभ्यासकांना पारंपरिक जमीन धारणा वापर, त्याबद्दलच्या रूढी, त्याचे प्रशासकीय ऐतिहासिक रूप जाणायचे असेल तर हा ऑक्सफर्डमधील विल्सनशास्त्रींचा ‘ग्लोसरी

ऑफ ज्युडिशिअल अँड रेव्हेन्यू टम्र्स’ हा कोश आवर्जून वाचावा!  

कोशकारी ध्यासाचा वेगळा नमुना बघू. या कोशाचे नाव आहे ‘ए डिक्शनरी ऑफ दि इकॉनॉमिक प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया’ (१८८९)! व्यापारी वृत्तीने आलेल्या राज्यकर्त्यांनी असा ध्यास घेणे अगदीच स्वाभाविक! परंतु खरे नजरेत भरते ते त्यामधील नोंदींची श्रीमंती. एकेका वस्तूबद्दल लाभेल ती तथ्यशील माहिती ध्यायची. तिची विश्वसनीयता पारखायची. त्याच्या व्यापारी उलाढालींचीदेखील ‘खबर’ मिळवायची असा शिरस्ता राखून लिहिलेल्या या नोंदी आहेत. उदा. हिंग फार वर्षे इराण अफगाणिस्तानकडून आयात होतो. त्याचा व्यापार कुठून कसा चालतो? त्याचा गंध सांभाळणारे, आद्र हवेपासून रक्षण करणारे कातडी वेष्टण कसे असायचे? ते सध्या कसे असते? यांसारख्या तपशिलांची नोंद ठेवणारे हे महाभाग! आमच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत त्याचे सहा खंड आहेत- प्रत्येक खंड सुमारे ९०० पानांचा! व्यापारी भूगोल कसा न्याहाळला जातो याचा तो वस्तुपाठ आहे. यासारख्या कोशांच्या प्रेरणेमुळे अनेक भारतीय कोशकार झटून कामाला लागले.

  कोश-योगातला आणखी एक मोठा रंजक नमुना जरूर पाहा! भलतीच निराळी माहिती आणि भरपूर आश्चर्यकारक कथा, आख्यायिका, व्युत्पत्ती त्यामध्ये आढळतील! त्या कोशाचे नाव ‘हॉबसन-जॉबसन’! इंग्रजांना भारतीय उच्चार कधी सहज आणि नीट उमगायचे नाहीत. प्राण गमावलेल्या हसन-हुसेन यांचा शोक मोहरमच्या मिरवणुकीत दरवर्षी होतो; त्या हसन-हुसेनचा उच्चार इंग्रजी कानाला हबसन जाबसन असा ऐकू येई! तसेच ते शब्द लिहिले जात. इतके की कालांतराने हे अर्धवट किवंडे आणि बोबडे शब्द इंग्रजीत रूढावले गेले. अशा शब्दांचा एक थोराड कोश म्हणजे हबसन-जॉबसन. जगन्नाथचे जगरनॉट कसे झाले? कुप्रसिद्ध फोरासरोड या भागाचे नाव तसेच का पडले? अशा कितीतरी रंजक कथा आणि चुटक्यांनी भरलेला हा कोश! यातले शब्द इंग्रजीत रूढावलेले, पण त्यांचा रंजक उगम वा व्युत्पत्ती या कोशामध्ये पुरेसा आहे. जमेल ते ऐकायचे, नोंदवून ठेवायचे, पडताळणी करून त्याचे कोश बनवायचे- असे करणाऱ्यांचा हा चौकस पंथ! मृतवत् कल्पना किंवा शब्दापासून बदलत्या नवशब्दांमागे सतत धावत राहणारा हा चिवट पंथ!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com