किरण गोखले kiigokhale@gmail.com
पुतिन यांनी छापेमारीऐवजी वेळखाऊ पद्धत वापरल्याने युद्ध तर लांबलेच पण रशियन लष्कराच्या व शस्त्रास्त्रांच्या दर्जाबद्दलही शंका निर्माण झाली; तर झेलेन्स्की यांनी वास्तव अपेक्षांसह वाटाघाटी सुरू करण्याचे तारतम्य दाखवले नाही..
आपण युक्रेनवर आक्रमण करणार नाही, असे वारंवार सांगणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अखेर २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये तीन दिशांनी रशियन सैन्य घुसवले त्याला आता दोन महिने होऊन गेले. रशियासारखी जागतिक महाशक्ती लष्करी ताकदीत दुर्बळ असलेल्या युक्रेनला चार-पाच दिवसांत शरण येण्यास भाग पाडेल, असाच सर्वाचा अंदाज होता. रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही व पुतिन यांनी तसा प्रयत्न केलाच तर अमेरिका व नाटो यांची लष्करी दले आपल्या मदतीला त्वरित धावून येतील व आपल्याला वाचवतील अशी भाबडी आशा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदेमार झेलेन्स्की बाळगून होते. पण हे दोन्ही अंदाज पूर्णपणे चुकले. ना युक्रेनमध्ये अमेरिका वा नाटोचे सैन्य उतरले ना रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हवर झटपट कब्जा करून युक्रेनला शरण आणणे शक्य झाले. आता तर या युद्धाने दोन सामान्य दर्जाच्या नवशिक्या गवयांमधल्या जुगलबंदीचे स्वरूप धारण केले आहे, जिथे कोणीच विजयी होत नसतो वा पराभूत. श्रोत्यांच्या माथी मात्र मारले जाते ते केवळ सादरीकरण, मग ते कितीही कंटाळवाणे का असेना!
सुमारे ३५-३६ लाख भयभीत युक्रेनी निर्वासितांचे शेजारी देशांत स्थलांतर, युक्रेनचे असंख्य नागरिक व दोन्ही देशांच्या हजारो सैनिकांचा मृत्यू, युक्रेनच्या अनेक शहरांतील उद्ध्वस्त इमारती, कारखाने व रस्ते, अमेरिका व तिच्या युरोपीय मित्रराष्ट्रांनी रशियावर लादलेले आर्थिक निर्बंध व व्यापारी बहिष्कार यामुळे ही जुगलबंदी खुद्द युक्रेन व रशिया यांच्यासाठीही कमालीची महागडी ठरली आहे. एवढेच नव्हे तर जगातील बहुसंख्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर व पर्यायाने तेथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर हे युद्ध अनिष्ट परिणाम करत आहे. पण जगासाठी महागडय़ा ठरणाऱ्या या जुगलबंदीत मग्न झालेल्या पुतिन व झेलेन्स्कींना मात्र हे युद्ध संपवण्याची कसलीही घाई दिसत नाही.
विलंबित ख्यालात सुरू असलेल्या या मंदगती युद्धाचे मुख्य कारण दिसते, ते म्हणजे या युद्धाच्या उद्दिष्टांबद्दल पुतिन व झेलेन्स्की या दोघांचाही प्रचंड संभ्रम. युक्रेन युद्धाचे रणिशग फुंकताना पुतिन यांच्यासमोर मोजकीच प्रमुख उद्दिष्टे होती:
(१) अमेरिका व नाटोला लष्करी आव्हान देणे व अमेरिका, रशिया आणि महाशक्ती होण्याची घाई झालेला चीन या तीन शक्तींमध्ये सध्या रशिया हाच सर्वाधिक शक्तिशाली असल्याचे सिद्ध करणे,
(२) क्रिमियाप्रमाणे उर्वरित युक्रेनवर कब्जा करून त्याचे रशियात विलीनीकरण करणे आणि
(३) युक्रेन युद्धापासून धडा घेऊन सोविएत रशियापासून स्वतंत्र झालेल्या इतर देशांनी मर्यादित स्वातंत्र्याच्या परिघात राहून रशियाची हुकमत मान्य करावी हा अप्रत्यक्ष इशारा देणे.
अमेरिकेला आव्हान देत युक्रेनवर आक्रमण करताना पुतिन यांनी, या ‘रशियन मोहिमे’मध्ये अमेरिका वा नाटोकडून लष्करी हस्तक्षेपाचा प्रयत्न झाला, तर अण्वस्त्रे वापरण्याची धमकी दिली. यातून पुतिन यांनी आपले पहिले उद्दिष्ट तर सहजरीत्या गाठले. आता हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात वापरलेले छापेमारी हल्लातंत्र (ब्लिट्झक्रीग) वापरून मोठय़ा संख्येत हवाईदल, रणगाडे व वाहनारूढ पायदळ वापरून कीव्हवर व गरज पडली तर युक्रेनच्या इतर काही मोठय़ा शहरांवर झटपट कब्जा करायचा, युक्रेनला शरण आणायचे व आपले दुसरे उद्दिष्ट साध्य करून युद्धही संपवायचे हा सोपा मार्ग पुतिन यांच्यापुढे होता.
युद्ध- गतीबाबत पुतिन यांचा संभ्रम
पण इथेच इतिहासातील अनेक लहरी हुकूमशहांप्रमाणे पुतिन यांची या युद्धाची आपली उद्दिष्टे व ती साध्य करण्याचे मार्ग याबद्दल चलबिचल व द्विधा मन:स्थिती झाली. भरधाव सुटलेल्या रशियाच्या गाडीची अवस्था टायर पंक्चर झालेल्या गाडीसारखी झाली. शक्य असूनही छापेमारी तंत्र वापरणे पुतिन यांनी टाळले. युद्ध संपवण्याची घाई न करता युद्धामुळे खनिज तेल व संलग्न उत्पादने, सोने व अमेरिकी डॉलर यांच्या प्रचंड वाढलेल्या किमतीत रशियाकडचे साठे विकून भरपूर फायदा कमवावा, असा मोह त्यांना पडला असावा. अमेरिकेने युक्रेनला एक सैनिक वाहून नेऊन स्वत:च वापरू शकेल अशी अत्यल्प वजनाची विमानवेधी व रणगाडावेधी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तसेच आक्रमक ड्रोन पुरवले आहेत, अशा बातम्या युद्धापूर्वीच येत होत्या. युद्ध सुरू झाल्यावर पहिल्या एक-दोन दिवसांत या शस्त्रांमुळे रशियाची काही विमाने व रणगाडे उद्ध्वस्तही झाले. हे बघितल्यावर कीव्हवर मोठय़ा संख्येने छापेमारी हल्ला केल्यास हवाईदल व रणगाडादलाचे मोठे नुकसान होईल व रशियन बनावटीची लढाऊ विमाने व रणगाडे यांच्या दर्जाबद्दल शंका निर्माण होईल, या भीतीपोटी संभ्रमित होऊन पुतिन यांनी आपल्या मूळ युद्ध उद्दिष्टात बदल केला असावा व हवाईदल व रणगाडादलावर लगाम लावला असावा. या बदलामुळे कीव्हवर झटपट कब्जा मिळवण्याऐवजी सगळय़ाच शहरांवर दुरून क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे भरपूर नुकसान करायचे व झेलेन्स्कींना शरण येण्यास भाग पाडायचे, हा मार्ग त्यांनी निवडला. या वेळखाऊ पद्धतीमुळे युद्ध तर लांबलेच पण रशियन लष्कराच्या व शस्त्रास्त्रांच्या दर्जाबद्दलही शंका निर्माण झाली, जी टाळण्याचा प्रयत्न पुतिन करत होते.
या युद्धातील आपली नक्की कोणती भूमिका असावी याबद्दलचा झेलेन्स्कींचा संभ्रम स्वाभाविक होता. अमेरिका वा नाटो युक्रेनच्या मदतीला सैन्यदले पाठवणार नाहीत, हे रशियन हल्ल्याच्या दुसऱ्या- तिसऱ्या दिवशीच स्पष्ट झाले. झेलेन्स्कींसाठी हा मोठाच धक्का होता. अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धापूर्वीच काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे युक्रेनला दिली होती, पण त्यांची संख्या मर्यादित होती आणि युक्रेनच्या सैनिकांना त्यांच्या सरावासाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे केवळ या शस्त्रास्त्रांच्या जिवावर युक्रेन आपले संरक्षण करू शकणार नाही, हेही उघड होते. जर रशियाशी लगेच तहाची बोलणी सुरू करावीत तर बायडन फारच नाराज झाले असते. गेली दोन-तीन वर्षे सातत्याने रशियाविरोधी भूमिका घेऊन अध्यक्षपदी निवडून आलेल्या झेलेन्स्कींना रशियाची विश्वासार्हता किती शंकास्पद आहे, हे माहीत असल्यामुळे पुतिन यांच्याशी वाटाघाटी करणे निर्थक ठरणार हे देखील ते जाणून होते. तेव्हा कदाचित एकमेव उपाय म्हणून त्यांनी लगेच शरणागती पत्करायची नाही, असे ठरवले असावे. या निर्णयामुळे रशियासारख्या दुष्ट शक्तींशी धैर्याने लढणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा उजळून निघाली असती व अमेरिका आणि नाटोला झेलेन्स्कींची हीच प्रतिमा रशियाविरोधी प्रचारासाठी उपयुक्त ठरणार होती. सुरुवातीच्या काही दिवसांसाठी झेलेन्स्कींचा हा निर्णय तर्कशुद्ध असला तरी पुढे त्यात बदल करून त्यांनी वास्तव अपेक्षांसह पुतिन यांच्याशी वाटाघाटी सुरू करणे आवश्यक होते. पण तसे तारतम्य संभ्रमित झेलेन्स्कींनी दाखवले नाही. त्यामुळे युक्रेनच्या विजयाची तीळमात्रही आशा नसलेले हे युद्ध लांबत गेले आहे. युक्रेनमधील जीवित व वित्तहानीत रोज प्रचंड भर पडत आहे, जी भरून काढायला युक्रेनला पुढची १५-२० वर्षे लागू शकतील.
हे दोन्ही राष्ट्रनेते आपापल्या देशातील सर्वोच्च नेते आहेत. पुतिन शक्तिशाली हुकूमशहा आहेत व झेलेन्स्कीही युक्रेनचे अत्यंत लोकप्रिय व आता तर आंतरराष्ट्रीय नेते झाले आहेत. त्यामुळे अकारण लांबवलेले हे युद्ध आतातरी थांबवावे, असा सल्ला देण्याची हिंमत दोघांच्याही सल्लागारांमध्ये दिसत नाही.
वास्तवाचे भान हरपलेल्या या दोन राष्ट्रनेत्यांमधली दिवसेंदिवस जास्त कर्कश, बेसूर, बेताल व अधिकच विघातक- परिणामी दिवसेंदिवस भेसूरच- होत असलेली ही जुगलबंदी सहन करणे जगात सगळय़ांना क्रमप्राप्त झाले आहे. ज्या क्षणी पुतिन व झेलेन्स्की यांपैकी एकाला या रटाळ व महागडय़ा जुगलबंदीची जाणीव होईल त्यानंतर एक-दोन दिवसांत युक्रेन-रशिया युद्ध संपेल! लेखक युद्धशास्त्राचे अभ्यासक आहेत.