तुलसी रामायणाची विशेषता सांगताना विनोबांनी म्हटले होते, ‘तुलसीदासांनी कथा अध्यात्म रामायणातून घेतली. सरणी नाटकांची उचलली आणि भाषा सामान्यांची वापरली.’ गीताईकडेही असे पाहता येते. खरे तर गीताईचे असंख्य विशेष आहेत. ते बरेचदा लक्षातही येतात. तथापि गीताईतील काव्य आवर्जून लक्षात घ्यावे लागते. सारी सुंदरता साध्या रूपात ठेवायची आणि तिच्यातील सौंदर्याच्या शक्यता अबाधित राखायच्या याचा अद्भूत आविष्कार गीताईच्या रूपाने आपल्या समोर आहे. गीताईत छंदशास्त्र, व्याकरण, गणित आदींचा खुबीने विनोबांनी वापर केला आहे.
शिवाजीराव भावे यांनी ‘गीताई छंदोमंजिरी’ छोटेखानी पुस्तकात गीताईमध्ये सारे छंदशास्त्र कसे एकवटले आहे ते सोदाहरण सांगितले आहे. अगदी लावणी, गजम्ल या काव्य प्रकारांची दखल विनोबांनी गीताईसाठी कशी घेतली याची या पुस्तकामुळे जाणीव होते. गीतेतील अवघड भासणारी रचना गीताईमध्ये किती सहज सोपी आणि अर्थगांभीर्य कायम ठेवते याचे उदाहरण –
कार्पण्यदोषोपहतस्वभाव:
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता: x
यच्छेय: स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् xx २-७ x x
दैन्यानें ती मारिली वृत्ति माझी
धर्माचे तों नाशिलें ज्ञान मोहें
कैसें माझें श्रेय होईल सांगा
पायांपाशीं पातलों शिष्य-भावें
वृत्तबद्ध काव्य मराठीतही तसेच ठेवले तर ते म्हणताना सामान्यांना अडचण येते आणि ओबडधोबड अनुवाद करावा तर गेयता हरवते. विनोबांनी या दोन्हींचा विचार करून रचना केली आहे. वर दिलेला श्लोक याचे उत्तम उदाहरण आहे. या संदर्भात अकराव्या अध्यायातील विश्वरूप दर्शनाचे मराठी रूप हे मराठीतील गेयता आणि मुक्तता यांना पकडून ठेवणारे अजोड काव्य आहे.
अर्जुन उवाच
पश्यामि देवांस्तव देव देहे
सर्वास्तथा भूतविशेषसंघान् x
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ-
मृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् xx १५ x x
अर्जुन म्हणाला
देखें प्रभो देव तुझ्या शरीरीं
कोंदाटले सर्व चि भूत-संघ
पद्मासनीं ध्यान धरी विधाता
ऋषींसवें खेळत दिव्य सर्प
या श्लोकात सुलभता आहे. काव्य आहे आणि साम्ययोगही आला आहे. त्या परमात्म्याच्या ठायी ब्रह्मादि देव, भूतसंघ, ऋषी आणि सर्प सारे वसले आहेत. साम्यावस्थेची ही कमाल झाली.
यासाठीची पूर्वतयारी विनोबांना लहान वयातच करता आली. त्यांच्यावर व्याकरण, काव्य आणि गणित या शास्त्रांचे संस्कार झाले. आजोबा, वडील आणि काका या तिघांनी त्यांचा या शास्त्रांशी परिचय घडवला. आईने संस्कृतचा अभ्यास करण्याची आज्ञा केली आणि पूर्वतयारी म्हणून ते मोरोपंतांच्या साहित्याकडे वळले. विनोबांची आर्या वृत्तावर इतकी हुकमत होती की अगदी लहानपणी त्यांनी आर्या वृत्तामध्ये पत्र लिहिले होते. आपला असा व्यासंग विनोबांनी गीताईच्या सेवेत लावला.
रामचरित मानसाचे वर्णन करताना विनोबांनी एकदा ‘बायबल + शेक्सपियर’ असे सूत्र मांडले होते. गीताईचा असा विचार केला तर गीताई म्हणजे शंकराचार्य, माउली आणि तुकोबा यांचा संगम आहे. विवरणातील शिस्त, काव्य, सुलभता, आणि उत्कटता यांचा आढळ एकटय़ा गीताईत होतो.
– अतुल सुलाखे
jayjagat24@gmail.com