– अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
जगासमोर महाराष्ट्राची बाजू कोण मांडेल? किंवा महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून कुणाची निवड करावी? विनोबांनी या प्रश्नांची उत्तरे अत्यंत नि:शंक होऊन दिल्याचे दिसते. ते प्रतिनिधी म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबा. माउलींना ते धर्म संस्थापक आणि प्रेषित म्हणत तर तुकोबा म्हणजे महाराष्ट्राची आई. त्यांनी स्वत:च्या आयुष्यातही तुकोबांना मातृवत् मानले.
ज्ञानदेवांनी जे धर्म संस्थापनेचे कार्य केले ते नंतरच्या सर्व संत सज्जनांनी शिरोधार्य मानले. जनसामान्यांनी देखील ‘ग्यानबा-तुकाराम’ हा घोष निवडून पसंतीची मोहोर उमटवली. ‘ग्यानबा-तुकाराम’ म्हटले की त्यात सारी मराठी संस्कृती आली.
ग्यानबा-तुकाराम म्हणजे महाराष्ट्राचा ‘मध्यम पदलोपी समास.’ दोन पदांच्यामधे अनेक शब्द सामावल्यावर तयार होणारा समास म्हणजे मध्यम पदलोपी समास. उदा. पर्णकुटी. पानांनी निर्माण केलेली झोपडी. ग्यानबा-तुकाराममधे हा अर्थ आहे. ही दोन नावे उच्चारली की सर्व संत येतात. विनोबांनी अशा आशयाची मांडणी केल्याचे दिसते.
या दोन्ही संतांच्या भजनांचे विनोबांनी संपादन केले. त्यावर भाष्य केले. ज्ञानेश्वरीतील महत्त्वाच्या ओव्या निवडल्या. चांगदेव पासष्टीचेही संपादन केले. तसेच तुकोबांच्या भजनांचीही निवड केली. तर काही अभंगांवर भाष्यही केले. ‘संतांचा प्रसाद’ या नावाने ते पुस्तिका रूपातही उपलब्ध आहे.
या दोन्ही संतांवर ते इतके लिहित आणि बोलत होते की त्याचीच दोन पुस्तके झाली. ‘ज्ञानोबा माउली’ आणि ‘तुका आकाशा एवढा.’
आता माउली आणि तुकोबा हे विनोबांचा इतका अभिन्न हिस्सा असतील तर त्यांनी केलेला गीतेचा साम्ययोगपर अर्थ त्यापासून अलिप्त कसा असेल? म्हणूनच विनोबांच्या साम्ययोगावर या दोन्ही संतांचा प्रभाव दिसतो.
‘संतांचा प्रसाद’ या पुस्तिकेत दुसरा अभंग असा –
अवघी भूतें साम्या आलीं।
देखिलीं म्या कैं होती॥१॥
विश्वास तो खरा मग ।
पांडुरंग-कृपेचा ॥
माझी कोणी न धरो शंका ।
ऐसे हो का निर्द्वद्व ॥२॥
तुका म्हणे जें जें भेटे ।
तें तें वाटे मी ऐसे ॥३॥
सर्व भूते एकरूप आहेत असे माझ्या डोळय़ाला केव्हा दिसेल? जेव्हा दिसेल तेव्हाच माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाल्याचे मी निश्चित समजेन. माझी अशी द्वंद्वरहित स्थिती झाली पाहिजे, की ज्या योगाने माझ्याविषयी कोणाला जरासुद्धा भय किंवा शंका वाटू नये. तुकाराम महाराज म्हणतात जी जी वस्तू दिसेल ती ती माझेच रूप आहे असे वाटले पाहिजे.
या अभंगावरचे विनोबांचे निरूपण म्हणजे साम्ययोगाचे छोटेखानी पण समग्र दर्शन आहे. ‘महाराष्ट्र धर्म’ या नियतकालिकात हे निरूपण प्रसिद्ध होत असताना विनोबांचे गीतेवरील चिंतन सुरू होते, मात्र गीताई, गीता प्रवचने आणि गीताई चिंतनिका हे साहित्य अद्याप जगासमोर यायचे होते. तरीही विनोबांचा गीतेचा साम्ययोगपर अर्थ निश्चित झाला होता. एरवी त्यांना तुकोबांच्या अभंगातील आणि गीतेतील ‘साम्य’ तुळावे वाटले नसते. या अभंगाची विनोबांनी केलेली उकल पुढील लेखात.