सहजगत्या तयार करता येणारा आणि आज घरोघरी खाल्ला जाणारा एक खाद्यप्रकार म्हणजे सँडविच. पावाच्या दोन तुकड्यांना लोणी फासले आणि मध्ये काकडी-टोमॅटो किंवा चीज असे काहीतरी घातले की झाले सँडविच तयार. रस्त्यावरच्या ठेल्यापासून पंचतारांकित हॉटेलापर्यंतही हा प्रकार सारखाच लोकप्रिय. तसा हा इंग्रजी शब्द असला तरी आता तो मराठी भाषेने आपल्यात सामावून घेतला आहे आणि त्याला कुठला प्रतिशब्दही मराठीत निर्माण केला गेल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही. ‘दोघांच्या मधोमध सापडून आपण अडचणीत येणे, म्हणजेच आपले सँडविच होणे’ या अर्थानेही तो कधी कधी वापरला जातो व इंग्रजी शब्दकोशात त्या अर्थानेही तो स्थिरावला आहे.
या शब्दाची व्युत्पत्ती मोठी मजेदार आहे. अठराव्या शतकात इंग्लंडमधील सँडविच नावाच्या गावी एक उमराव होऊन गेला. जॉन माँटेग्यू हे त्याचे नाव. त्याला पत्त्यांच्या जुगाराचा अतोनात नाद. असेच एकदा खेळत असताना त्याला खूप भूक लागली. पण जेवणासाठी खेळ थांबवून उठावे लागले असते. त्यामुळे त्याने आपल्या एका नोकराला बोलावले आणि ‘मला इथल्या इथे बसून खाता येईल असे काहीतरी ताबडतोब घेऊन ये’’ असे फर्मावले. लगेचच नोकर पावाच्या दोन तुकड्यांत बीफचा एक तुकडा घालून घेऊन आला. खेळातच दंग झालेल्या उमरावाने तो लगेच मट्ट केला. त्याचे बघून मग सोबत खेळणारे बाकीचे मित्रही तोच प्रकार खाऊ लागले. त्याकाळी उच्चभ्रू इंग्रज कुटुंबात काहीही खायचे म्हटले की प्लेट, काटे, चमचे, सुरी हे सारे लागायचे, पण हा प्रकार मात्र नुसताच हातात धरून खाता येत होता. त्याला तो आवडला व तो उमरावच असल्याने आजूबाजूच्या गावांतही तो पदार्थ सँडविच याच नावाने पसरला. एखादे सँडविच आणि सोबत कोक किंवा कॉफी हा मेन्यू आज जगभर लोकप्रिय आहे आणि मराठीप्रमाणेच इतरही भाषांनी सँडविच हा शब्द आपला म्हणून स्वीकारला आहे. – भानू काळे
bhanukale@gmail.com