उदगीर येथे सुरू झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या भाषणाचे हे संपादित अंश.. लेखकीय अस्वस्थतेचा सामान्यजनांशी संबंध काय, हे शोधू पाहणारे..

मित्रहो, काळ तर मोठा कठीण आला असं विषादपूर्व विधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात ‘काळ’ ही भव्य संकल्पना आपल्या चिंतनपरंपरेमध्ये आपण स्वीकारलेली आहे. भर्तृहरीने असं म्हटलं आहे की, दिवस-रात्रीच्या एका आड एक असलेल्या काळय़ा-पांढऱ्या चौकटींवर, स्त्री-पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्धविषयक खेळ ‘काळ’ स्वत:च पाहात रमत बसलेला असतो. मला स्वत:ला भर्तृहरीची ही कल्पना भव्य आणि थरारक वाटलेली आहे. स्वत: काळच कर्ता आणि भोक्ता असेल तर सामान्य माणूस कोण आहे असा प्रश्न यातून निर्माण होतो. साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं-द्यावं लागणार असतं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

तत्पूर्वी, लेखक का लिहितो याची थोडी चर्चा करूया. निर्मिती प्रक्रियेचा ‘आंतरिक अस्वस्थते’शी संबंध असल्यामुळे ‘आपण अस्वस्थ आहोत’ असं विधान प्रतिभावान कलावंत करताना दिसतात, मात्र आपण अस्वस्थ का आहोत या   प्रश्नाचं उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने, मलादेखील हा प्रश्न विचारला गेला आहे आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे.  प्रतिभावंत-कलावंत-स्वत:ला साक्षीदाराच्या वेदनामयी भूमिकेतून पाहतात. म्हणजे, ‘पाहणारा’ आणि ‘पाहणाऱ्यालाही पाहणारा’ अशी ही दुहेरी भूमिका असते. ही भूमिका मोठी वेदनामयी असते. हे साक्षित्व अज्ञेयाकडे अंगुलिनिर्देश करतं. निर्मिती प्रक्रियेचा आत्मीय असा एक घटक या नात्याने प्रतिभावंत-कलावंत स्वत:ला अस्वस्थ होताना पाहतात. स्वस्थतेत निर्मितीच्या शक्यता नसतात, म्हणून त्याला, त्यामुळे स्वस्थतेची भीती आणि अस्वस्थतेचं आकर्षण वाटत राहतं.

आत्मोद्गार अपरिहार्य होऊन प्रकटू लागतो तेव्हा चांगल्या किंवा श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो. बहुधा असा आत्मोद्गार सहकंपातून निर्माण होतो. भोवताली, अनेक पातळय़ांवरून, अनेक पद्धतीने, अनेक प्रकारे संघर्ष करीत जगत राहणाऱ्या जीवांकडे पाहून जी काही एक वैश्विक करुणा निर्माण होत असेल त्या करुणेतून काहीएक प्रेरणा घेऊन लेखक लिहायला लागतो व अनेकांच्या वेदना स्वीकारून आणि सहकंपित होऊन जीवनदर्शी लेखन करतो. चिंतनशील व प्रामाणिक अशा लेखकाचं हे असं भागधेय असतं. मनोरंजन किंवा बुद्धिरंजन हा लेखनाचा मग हेतू उरत नाही, तर सर्वसामान्य माणसाचा शोध हा हेतू लेखनामागे शिल्लक राहतो. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अशा माणसाचा शोध घेणं माझ्या लेखनाचं प्रयोजन आहे.

 तुमचं लेखन वास्तववादी असलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह लेखकाच्या भोवती धरला जातो. वास्तववाद म्हणजे काय याबाबतच्या व्याख्या मात्र वेगवेगळय़ा असू शकतात. आपल्या साधनाकाळातच लेखकाने वास्तवाचा हा गुंता सोडवणं हितकारक असतं. एकच एक वास्तव कधीच अस्तित्वात नसतं. एकाचं वास्तव दुसऱ्याचं स्वप्न असू शकतं. त्यामुळे वास्तव व्यक्तिसापेक्ष असतं याची जाणीव लेखकाने ठेवणं गरजेचं असतं. वास्तव बदलत राहतं आणि मुळातून ते बदलतसुद्धा नाही. उदाहरणार्थ चिरंतन मूल्यं किंवा ईश्वरी सत्ता बदलत नाही. समाज बदलतो, मान्यता बदलतात, गरिबी आणि श्रीमंती येते आणि जाते, बेकारी वाढते आणि कमी होते. या बदलत्या वास्तवाची साहित्याने दखल घ्यायची असते.

सामान्य माणसाचं दु:ख प्रतिबिंबित करण्याची साहित्याची प्रतिज्ञा असेल तर सामान्य माणूस लेखनप्रेरणेचा केंद्रबिंदू मानावा लागतो हे तथ्य साधनाकाळातच लेखकाने स्वीकृत केलेलं बरं. लेखकासाठी सर्वसामान्य माणूस हा नेहमीच आस्थेचा आणि कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. लेखकाला सर्वसामान्य माणसाच्या शोधाबाबत आस्था असावी लागते. त्याच्या जगण्याबद्दल, त्याच्या छोटय़ा छोटय़ा लढायांबद्दल आस्था बाळगावी लागते. सर्वसामान्य माणसाच्या संभ्रमावस्थेबाबत कुतूहल लेखकाला चिंतनशील बनवतं. सामान्य माणसाच्या दु:खाचा परिहार कसा होऊ शकेल याबाबत काहीएक चिंतन लेखकाला उपकारक ठरून श्रेष्ठत्वाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी साहाय्यभूत ठरतं.

सर्वसामान्य माणसांच्या जीवनव्यवस्थेतील छोटय़ा छोटय़ा लढायांबाबत लेखक आस्था बाळगतो तेव्हा तो थोडा स्थिर झालेला असतो. साहित्यक्षेत्रात परिचितही झालेला असतो. येथून पुढे मग ‘व्यवस्था’ तुम्हाला ‘कमिट’ होण्याचा आग्रह धरू लागते. तुम्हाला कथित ‘सामाजिक बांधिलकी’ आहे वा नाही याबाबतची एक झाडाझडती एव्हाना होऊन गेलेली असते. त्यानंतर लेखकावर दबाव वाढू लागतो. कोण आहात तुम्ही? तुम्ही व्यवस्थाविरोधी आहात काय? की व्यवस्थेचे समर्थक आहात? तुम्ही कोणत्या ग्रुपचे आहात? तुम्ही कोणत्या कळपामध्ये जाऊन पोहोचला आहात? प्रश्नांचा हा असा गलबला असला तरी लेखकाला स्वत:च्या अंत:प्रकाशात आपली स्वत:ची वाट स्वत:च शोधावी लागते, आणि त्याची किंमतही मोजावी लागते.

कलाकृती ही ‘कलाकृती’ असल्यास त्याकडे कलाकृती म्हणून पाहिलं पाहिजे असं कोण्या जाणकार समीक्षकाने म्हटलं आहे. आपल्या अपेक्षांचं ओझं लेखकावर आणि कलाकृतीवरही लादणं योग्य नसतं, याचा विचार सहसा कोणी करताना दिसत नाही. लेखकाला हे ‘अडाणी ओझं’ संत्रस्त करू शकतं. आपल्या निर्मितीच्या प्रक्रियेत अशा अपेक्षा अडकाठी ठरणार नाहीत याची काळजी त्याला घ्यावी लागते. पण मग लेखकाची बांधिलकी कोणती, हा प्रश्न शिल्लक राहतोच. मी स्वत:, सामान्य माणसाला लेखनाचा केंद्रबिंदू मानतो. ज्या मातीशी त्याची नाळ जुळलेली असते आणि ज्या नाळेतून त्याला जीवनरस प्राप्त होतो त्या नाळेशी माझी बांधिलकी आहे.

एकूणच उत्तराधुनिक व्यामिश्र जीवनपद्धतीला स्वत:त सामावून घेण्याची व समकालीन परिस्थितीबद्दल काहीएक समर्थपणे सांगण्याची शक्ती दीर्घकथेमध्येच असल्यामुळे येथून पुढे दीर्घकथेकडे आपण आशेने पाहू शकू असं चित्र दिसतं. दीर्घकथेची काहीएक परिभाषा तयार करणं, दीर्घकथेचे तंत्र काही प्रमाणात स्पष्ट करणं असं काही काम मराठी समीक्षेच्या क्षेत्रामध्ये होणं  आता गरजेचं आहे. मराठीतल्या दीर्घकथेच्या रूपाने मराठी भाषेने अन्य भाषांना देणगी दिली आहे अशी चर्चा मी नुकतीच वाचली. मी या विधानाचं स्वागत करतो.

आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता. आता मात्र, हा चेहरा धूसर होतो आहे, हरवतो आहे. मनोरंजनपर ,बुद्धिरंजनपर साहित्य अलीकडे मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा होतो आहे.

जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो आहे हे पाहिलं पाहिजे. त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करावं लागेल. मुख्य म्हणजे ‘सामान्य माणसा’बाबतचं कोणतं आकलन आपल्या लेखकाला झालं आहे हा प्रश्न तपासून घेण्यासारखा आहे. आपला लेखक अजूनही ‘प्रेयस आणि श्रेयस’ यात अडकला आहे. तो सत्य म्हणजे काय, याचा शोध घेत नाही, नैतिकतेचा आग्रह धरीत नाही आणि व्यापक अशा जीवनाचा अभ्यास करीत नाही असं निरीक्षण आहे. सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे. शोषणमुक्त समाज त्याला हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दु:खाचा परिहार कसा होणार हे मात्र त्याला समजलेलं नाही. कोणी तरी मसीहा येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असं त्याला वाटतं आहे. पण असा कोणी मसीहा येत नाही आणि त्याचं वाट पाहणं थांबत नाही. द्रष्टय़ा कवींनी ती उद्याची पहाट उजाडेल असा दिलासा जरी दिला असला तरी त्याचबरोबर तीव्र उपहास देखील नोंदवलेला आहे, कारण उद्याचा दिवस उजाडणारच नसतो. वाट पाहणं केवळ या सर्वसामान्य माणसाच्या नशिबी आहे. तो भयभीत आहे. त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरून केली जाईल याची आपण वाट पाहतो आहोत. या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी कथा अस्तित्वात येण्याची आवश्यकता आहे.

साहित्याच्या परिघामध्ये एक विचित्र असा तुच्छतावाद निर्माण झालेला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे. परप्रकाशित, परभृत, इतरांच्या प्रभावळीतील सामान्य अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथित तुच्छतावाद आणि प्रदूषण पसरवीत राहिलेले असतात ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरुचीचा अपमान होतो आणि मेहनती साहित्यिकांचा अवमानदेखील होतो, याची दखल सहसा घेतली जात नाही. अशा बेजबाबदार टिंगलीतून मराठी साहित्याचं आपण काही नुकसान करतो आहोत याची त्या अनुयायांना जाणीव नसते कारण, काहीएक बौद्धिक विकृती त्यांच्या ठायी निर्माण झालेली असते. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी या संदर्भात उघडपणे नाराजी प्रकट केलेली आहे. पण हा अपवाद वगळता या तुच्छतावादाबाबत बोलणं टाळलं जातं हा चिंतेचा विषय.

मराठी बालसाहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केलेला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोडय़ांनी भरलेलं, नीरस असं झाल्याचं  दिसतं आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या इत्यादींना आपण कुलूपबंद तळघरात ढकलून दिलं. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे. विशिष्ट वयात अद्भुतरसाचं सेवन ज्या मुलांना करता येतं ती मुलं बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तीची देणगी असलेली आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात असं बालमानसशास्त्र सांगत आलेलं आहे. त्याउलट, अद्भुतरसाचा संपर्क ज्या मुलांच्या मनाशी घडला नाही ती मुलं पोटार्थी, शुष्क, अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी, अरसिक निपजतात.

मित्रहो, काही टीकाकारांनी असं दाखवून दिलं आहे की, मराठी साहित्याचं विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारं असं राहिलं आहे. टीका अशी आहे की, स्वातंत्र्यसंग्रामाबाबत मराठी साहित्यविश्वात विशेष असं काही लिहिलं गेलं नाही. महात्मा गांधींच्या खुनाच्या घटनेचे पडसाददेखील मराठी साहित्यात विशेष उमटलेले नाहीत. महात्मा गांधींचं योग्य ते आकलनच मराठी साहित्याला व साहित्यिकांना नीटसं झालेलं नाही अशी टीका केली गेली आहे. मोठय़ा अशा समूहाने धर्मातर करणं, बहात्तरचा मोठा दुष्काळ व त्यानिमित्ताने शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणं या घटनादेखील मराठी साहित्यात आल्या नाहीत. वर्तमानाचं भान नसणं हा मराठी साहित्याचा दोष लक्षात घेता जगात, भारतात व महाराष्ट्रात ज्या महत्त्वाच्या घटना अलीकडे घडल्या त्यांचं प्रतिबिंब साहित्यात पडण्याची कितपत शक्यता आहे असा थोडासा टोकदार सवाल आहे.

आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करुणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमधल्या ‘सआदत हसन मंटो’ने अनेक वर्षांपूर्वीच उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवी चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोअरकीपर्स, टांगेवाले, रस्त्यावर अंगमेहनतीची कामं करून जगणारे, अशांच्या जीवनव्यवहाराबाबत विलक्षण करुणा व आस्था मंटोंच्या कथांमधून प्रकट झाली. मराठी कथेला अद्यापही एखादा मंटो मिळालेला नाही.

साहित्यांतर्गत काही भाषेचे प्रश्न आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. कपडय़ावरून माणसं ओळखण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून चर्चा केली जात असली तरी भाषेवरून माणसांची ओळख पटवण्याचा खेळ जुन्या संहितेमध्ये आढळतो. अभिजन कोण तर अभिजात भाषा बोलतात ते, आणि अभिजात भाषा कोणती तर अभिजन बोलतात ती, असा उपहास पाणिनीच्या सूत्रपाठात नोंदविला आहेच. विद्वानांनी निवाडा दिला नसला तरी  ‘संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे’ असा निवाडा राजकीय पक्षाचे पदाधिकारी देतात तेव्हा साहित्याला चिंता वाटली पाहिजे. भाषेवरून माणसांची ओळख कशी करणार? पाली इत्यादी प्राचीन भाषांचं काय करणार? उर्दू ही मुसलमानांची भाषा नसून ती भारतीय भाषा आहे हे कोण सांगणार?

संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे किंवा नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. मराठी साहित्यांतर्गत या घटनेचे पडसाद बहुधा पडलेले नाहीत.

खरं आणि खोटं

लेखकाला ‘आंदोलन-जीवी बुद्धिवाद्यां’कडून एक गुप्त वार्ता समजली आहे आणि त्याची छाती धडधडायला लागली आहे. त्याने ऐकलं आहे की, ‘ Through the looking glass’ या पुस्तकाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देण्याचं चाललं आहे. लेखक बुचकळय़ात पडतो आहे आणि या मागचं कारण बुद्धिवाद्याला विचारतो आहे. बुद्धिवादी दबल्या आवाजात सांगतो की, चार्ल्स लुटविज् याने ‘लेविज् कॅरॉल’ या नावाने सन १८७१ मध्ये ही कादंबरी लिहिली. लेखकाला ते थोडं माहीत असतं. तो म्हणतो की, ही तर बालांसाठी लिहिलेली कादंबरी आहे. दबल्या आवाजात पुन्हा उत्तर मिळतं की, नाहीतरी सध्या समाज बालबुद्धी होत चाललेला आहे. या कादंबरीतली अ‍ॅलिस नावाची बालनायिका आरशाच्या आतमध्ये प्रवेश करते. आरशाचं जग उलटं असतं. जे डावे ते उजवे दिसतात, जे उजवे ते डावे दिसतात. आंदोलनकारी राष्ट्रद्रोही दिसतात. सत्याचं असत्य होतं.

असत्याचं सत्य होतं. भ्रमाला वास्तव मानलं जातं. वास्तवाला स्वप्न मानलं जातं. जे काही दाखवलं जातं आहे ते खरं, असं मानणाऱ्या आणि संमोहित झालेल्या जनतेसाठी हाच ग्रंथ ‘राष्ट्रीय ग्रंथ’! बुद्धिवादी असं सांगतो की, या कादंबरीचं सार ‘Play with the relationship between something and nothing’ तसंच ‘Unreal world of illogical behaviour’ असं आहे. म्हणजेच फॅन्टसीच्या जागी वास्तव आणि वास्तवाच्या जागी फॅन्टसी. त्यातून सामान्य जनतेच्या मनाशी केलेला, जनतेच्या बुद्धीशी केलेला हा खेळच. ते ऐकून लेखक आणखीनच खचून जातो आहे. हताश होतो आहे. स्वत:शीच, कुजबुजत्या स्वरात म्हणतो आहे, ‘म्हणजे ही भ्रमयुगाची सुरुवात तर नाही?’

लेखक पाहतो

लेखक बघतो आहे. पाहतो आहे. समजून घेतो आहे. त्याला जाणवतं आहे. तो सहकंपित होतो आहे. भोवताल त्याला अस्वस्थ करतं आहे. लेखक चिंता वाहतो. तो सामान्य माणसाच्या एकूण फसवणुकीकडे पाहतो. बुद्धिवाद्यांची आणि बुद्धिजीवींची आणि परिणामत: बुद्धिवादाची होणारी टिंगल लेखक पाहतो आहे. ‘हार्वर्ड युनिव्हर्सिटी’ आणि ‘हार्डवर्क’ यावर केलेली निर्बुद्ध कोटीदेखील त्यांनी ऐकली-पाहिली आहे. सरस्वतीचा अपमान आणि लक्ष्मीचं पूजन तो पाहतो आहे. पैसे मोजून मोजून हाताला घट्टे पडतात आणि त्यामुळे हळुवार स्पर्श समजेनासा होतो, तसं काहीसं तुमचं, माझं, समाजाचं आणि राज्यकर्त्यांचं झालं आहे का, असं लेखक स्वत:ला विचारतो आहे. हताश बुद्धिवाद्यांची स्थलांतरं आणि त्यांचं मौनात जाणं तो पाहतो आहे.

एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती असं काहीसं कोणीतरी म्हणतं आहे. लेखकाला यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाहीए. विचारपूर्वक केलेलं चिथावणीखोर विधानदेखील आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वात नाही, ते धर्मही नाहीत, असलेच तर ‘पंथ’ आहेत असंही हा कोणीतरी म्हणतो आहे. ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीची व्याख्या वगैरे शोधू लागले आहेत.

लेखक व्याख्या इत्यादीच्या घोटाळय़ात पडत नाही. त्याला बगलेमधली लपवलेली सुरी नेमकी दिसते आहे.

लेखक बुचकळय़ात पडून समाजाकडे पाहतो आहे. समाजात विभाजनवादी निर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. आता, त्या पाठोपाठ कुठल्याशा सिनेमाचं समर्थनसुद्धा करण्यात येतं आहे. आता त्यामुळे, सिनेमाही ‘तुमचा’ आणि ‘आमचा’ झाला. कला विभाजित झाली. उपद्रव आणि उपद्रव. उन्माद आणि उन्माद.

जनतेच्या भोळय़ा मनाशी चालवलेला हा खेळ लेखक पाहतो आहे. माणसांचं विभाजन होताना पाहतो आहे आणि विद्वेषाचं गणितही मांडलेलं पाहतो आहे. कोणीतरी म्हणतं आहे की, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय. भिकेत मिळालं? म्हणजे स्वातंत्र्यसेनानी काय भीक मागत होते? पण निर्बुद्ध लोकांकडून स्वातंत्र्याचा अपमान होतो आहे हे आपण उघडय़ा डोळय़ाने पाहतो आहोत. काही कथित साधू मुसलमानांचं शिरकाण करायचं म्हणतायत. ते असंही म्हणतायत की भारतीय संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आणि त्यांच्या मुलांचाही मृत्यू होणार आहे. असा हास्यास्पद शाप देणारे हे साधू आहेत?

लेखक एकदा गावी गेला होता. एका बडय़ा घराच्या अंगणात बांधलेली कुत्री त्याच्यावर अकारण भुंकू लागली. लेखकाने घरमालकाकडे तक्रार केली. त्याला म्हटलं की, तुमचे कुत्रे आमच्यावर भुंकत आहेत. घराचा मालक म्हणाला, आम्ही काही त्या कुत्र्यांना भुंकायला सांगितलेलं नाही. लेखक म्हणाला, पण तुम्ही त्यांना भुंकू नका असंदेखील सांगितलेलं नाही.

लेखक पाहतो की, सरस्वतीचे उपासक दु:खी होतायत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चाललीय. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे. सर्वत्र दडे बसवणारी शांतता. कोणीच बोलत नाही. कोणीच हरकत घेत नाही. सर्वत्र आणि सर्वत्र ‘चतुर मौन’ पसरलेलं आहे. या मौनात स्वार्थदेखील आहे. तुच्छतादेखील आहे. हिशेब आणि व्यवहारदेखील आहे. सामान्य जनतेच्या दु:खाला चिरडणंदेखील आहे. भीती आणि दहशतदेखील आहे. प्रलोभनंदेखील आहेत. विनाशदेखील आहे.

लेखकाने असं ऐकलं आहे की, कवी शंकर वैद्यांच्या कवितेतल्या पुस्तकांनी कपाटामध्येच आत्महत्या केल्या आहेत. उरलेल्या पुस्तकांना दिनांक २३ एप्रिलच्या जागतिक पुस्तकदिनाच्या दिवशी आत्महत्या करायच्यात म्हणे! त्याने असंही ऐकलं आहे की, याच कपाटात भारतीय संविधानानेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. लेखक ऐकतो, लेखक पाहतो, लेखक चिंतित होतो. क्वचित कोणी बोलतं आहे, नाही असं नाही.

काही कवी बोलतायत. अशोक बागवे नावाचा कवी ‘मौनाचा नि:शब्द कोलाहल’ ऐकतो आहे. तो म्हणतो,‘‘मौनाचा नि:शब्द कोलाहल नंग्या तलवारी परजत निघून गेलेला थेट रक्ताच्या पल्याड’’ आणि पुढे हा कवी सद्य परिस्थितीबद्दल बोलताना लिहितो,‘‘आकाश ठणकतंय धरती सुन्न भरवसा उडून गेलाय एकमेकांवरचा.. ’’

भरवसा उडून गेलाय? माणसाचा माणसांवरचा? राज्यांचा केंद्रावरचा? केंद्राचा राज्यांवरचा? मित्राचा मित्रांवरचा? समाजाचा समाजांवरचा? म्हणजे मग जगण्याचा आधार तरी काय आहे, लेखकाचा प्रश्न स्वत:ला.

तिकडे, परकीय नसलेला पण परकीय प्रदेशात राहिलेला एक कवी आश्वासनपूर्ततेची वाट पाहतो आहे. तो म्हणतो की, नियतीशी करार करून स्वातंत्र्य मिळालं. मग विधिच्या विधानात लिहिल्याप्रमाणे आश्वासनपूर्ती तर झालीच पाहिजे ना? जगण्याचे अधिकार तुम्हालाही आहेत मलाही आहेत. एक दिवस या दु:स्वप्नाचा अंत होईल आणि जनताजनार्दनाचं राज्य येईल-‘और राज करेगी ख़ुल्क-ए-ख़ुदा’ असं स्वप्नं तो कवी पाहतो आहे. ख़ुल्क-ए-ख़ुदा म्हणजे जनताजनार्दन-आम जनता. लेखक त्यामुळे आशावादी आहे. 

समाजदेखील आशावादी असतो. ‘इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असा उद्घोष समाजाने पूर्वीच केलेला आहे. कालपर्यंत लेखक ऐकत होता. आज लेखक हे सगळे पाहतो आहे. उद्या कदाचित तो बोलेल. पण मग त्याने बोललं पाहिजे. त्याने बोललंच पाहिजे. तो न बोलला तर प्रमाद होईल. तो न बोलला तर तो ‘चतुर मौनाचा’ बळी ठरेल. लेखक आशावादी आहे. लेखक सत्याग्राही आहे, तो सत्यान्वेषी आहे. तो सत्याभिलाषी आहे.

सत्याचा उच्चार करणं, उच्चरवाने सत्याचा उद्घोष करणं ही लेखकाची भूमिका असते, धर्मही असतो, कर्तव्यदेखील असतं. तो बोलेल, कदाचित उद्या.

 आणि सत्य बोलण्याचा धर्म स्वीकारणारे आरसेदेखील तडजोड न करता सत्यच सांगत आहेत. आणि म्हणून इथे लेखकाला जोतिबा फुले यांची कविता आठवते आहे. जोतिबांनी सत्याचा उद्घोष केला आहे. सत्य सर्व धर्माचे माहेर आहे, सत्य सुखाचा आधार आहे, त्याव्यतिरिक्त सर्वत्र अंधकार आहे आणि सत्याचं बळ पाहून बहुरूपी भयभीत होत आहेत, असं जोतिराव फुले म्हणतायत. राहूचे छद्मरूपी उपासक सत्याच्या प्रकाशामुळे भयभीत होतील अशी आशा त्यामुळे लेखकाला वाटते. लेखक असं बरंच काही आठवतो आहे.

आणि हो.. करोनाने आपल्याला सोशल डिस्टिन्सग शिकवलं. म्हणजे माणसाने माणसापासून दूर जाणं. ते आपण करीत राहिलो. करोनाने आपल्याला हात धुवायला शिकवलं. पण ज्यांच्या हाताला रक्त लागलं आहे, किंवा पापाचा स्पर्श झाला आहे ती मंडळी शेक्सपिअरच्या त्या नाटकातल्याप्रमाणे ‘वॉश माय हँड्स’ असं म्हणतदेखील नाहीएत. – लेखक हे सगळं पाहतो आहे. सगळं आठवतो आहे. पण हे आठवलेलं त्याने सांगितलं मात्र पाहिजे. सत्यवदन हा लेखकाचा धर्म. निर्भयता हा त्याचा धर्म. त्या धर्माला तो जागला पाहिजे. सर्जनबळाचं विस्मरण त्याला, आणि समाजाला परवडणार नाही.

तेव्हा, लेखकाची भूमिका काय असते, तुमची भूमिका काय आहे असे प्रश्न तुम्ही मला विचारता म्हणून तुम्हाला मी हे विस्ताराने सांगितलं. तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिवस’ येतील, असा मला विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणं त्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याला दुसरा कोणता तरणोपायदेखील नाही. आशावादी असणं ही त्याची अपरिहार्यतादेखील आहे. आशावादी असणं याव्यतिरिक्त तो दुसरं काय करू शकतो?

धन्यवाद!

भ्रमयुग

आपण आत्यंतिक अशा भ्रमयुगामध्ये आता प्रवेश केला आहे. या भ्रमयुगाबाबत, या फसव्या अशा छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्ययुगाबाबत मला आपणाशी थोडं सविस्तर बोलायचं आहे. आपण थाळी वाजवली आणि ती वाजवताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. थाळी वाजवण्याचे भीषण संदर्भ खरंतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहीत नाहीत. नोंद अशी मिळते की दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये बारा वर्षे पाऊस पडला नव्हता आणि समाज भुकेकंगाल होऊन ‘त्राहिमाम्’ म्हणत सैरावैरा झाला होता. भुकेकंगालांच्या जरत्कारू टोळय़ा अन्नाच्या शोधात बाहेर पडून थाळय़ा वाजवत गल्लोगल्ली फिरत होत्या आणि समोरून येणाऱ्या माणसांवर तुटून पडत होत्या. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापट अशी थाळीनादाशी जोडली गेलेली आहे.

काही विचारवंत आता दबल्या आवाजात असं सांगत आहेत की, सध्या विषमता वाढू लागली आहे. गरीब लोक आता दरिद्री होतायत. श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत. मध्यमवर्ग वेगाने विभाजित होतो आहे. तो कनिष्ठ मध्यमवर्गात ढकलला जातो आहे. दरी वाढते आहे. कदाचित पुढे चालून आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्टय़ा बरी परिस्थिती असलेल्या समाजवर्गावर आक्रमण सुरू करेल. त्यातून हळूहळू गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. विचारवंत दक्षिण आफ्रिकेतील घटनांकडे अंगुलिदर्शन करीत आहेत. आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल असा इशारा विश्लेषक विचारवंत देत आहेत. लेखक हे ऐकून चिंतित होतो आहे. थाळीवादनाचे ध्वनी त्याने ऐकले आणि येऊ घातलेल्या परिस्थितीकडेही तो पाहतो आहे.

 लेखकाने सत्य बोललं पाहिजे आणि निर्भयतेने बोललं पाहिजे, असंही साहित्य सांगतं. सत्य आपलं कथन उच्चारत राहात असतं. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. कोलाहलात हा आवाज उच्चरवानेदेखील उच्चारला जावा लागतो, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असं सांगत राहतो. आपण पाहिलं, ऐकलं पाहिजे हे मात्र खरं. माझी एक आरसा नावाची अप्रकाशित कादंबरी आहे. कथानक असं की, लेखकाच्या घरातला आरसा फुटलेला आहे. लेखक अवचितपणे असं बोलून जातो की, बरं  झालं, आरसा फुटला, नाहीतरी आरसे जरा जास्तच सत्य बोलायला लागले आहेत. आरसे मंडळी हे उद्गार ऐकतात आणि नाराज होतात. त्यांचा प्रतिनिधी लेखकाला भेटायला आलेला आहे. तो लेखकासारखाच दिसतो. पण उलटा आहे. म्हणजे, लेखकाची उजवी बाजू तर याची डावी बाजू इत्यादी.

आरशांचा प्रतिनिधी निषेध करून असं म्हणतो की सत्यकथन करणं हे आरशाचं कामच आहे, कारण आरसा सत्यव्रती असतो. लांगुलचालन करणे हा काही त्याचा धर्म नव्हे. पण आरसा असंही सांगतो की, बाजारामध्ये काही बाजारबसवे आरसे आलेले आहेत, जे दिसायला सुंदर दिसतात आणि तुम्हाला जे पाहिजे तेच दाखवतात. उदाहरणार्थ, तुम्ही लठ्ठ असाल तर आरसा तुम्हाला सौष्ठवपूर्ण असं दाखवतो आणि तुमचे पांढरे केस या आरशात पांढरे दिसतच नाहीत. तुम्ही मोठे रुबाबदार, यशस्वी, धोरणी आणि अवतारी पुरुष दिसू शकता. असं दाखवणाऱ्या आरशांची बिलकूल कमतरता नाही. त्याउलट, एक आरशांची गुप्त संघटना भूमिगत राहून काम करते आहे, सत्यघोष करते आहे. ‘सांग दर्पणा मी कशी दिसते?’ या प्रश्नावर ‘तू सुंदर नाहीस’ असं स्पष्ट सांगणारा आणि म्हणून फुटलेपणाची शिक्षा भोगणारा आरसादेखील प्राचीन काळापासून या संघटनेचा सदस्य आहे. ‘दीने इलाही’ची स्थापना झाली तेव्हा प्रतीकरूपाने ठेवलेला आरसा या संघटनेत सामील आहे. बाळशात्री जांभेकरांचा ‘दर्पण’सुद्धा या संघटनेत सदस्य आहे. हे आरसे जुने आहेत, आकर्षक नाहीत. पण खरं बोलणारे आहेत. अशा गुप्त संघटनेला भेट देण्याची लेखकाला ‘प्रातिनिधिक भीती’ वाटू लागते. सुदैवाने माझी ही कादंबरी अजून प्रकाशित झाली नाही. पण या भीतीचं कारण तर आहेच. ते कारण सर्वाना माहीतदेखील असतं. परंतु, या कारणामागचं कारणसुद्धा शोधता येतं.

अमृतकाळ

मित्रहो! अमृतकाळ सुरू झाला आहे असं सांगितलं जात आहे. लेखकाने अमृतकाळाबद्दल ऐकलं आणि तो थोडा चकित झाला. थोडं आठवू लागला. त्याने स्वत:ला विचारलं, ‘‘काय असावं हे? अमृतकाळ कसला?’’ तेवढय़ात त्याने काही चाहूल ऐकली. कार्टूनच्या चित्रात दडलेला ‘कॉमन मॅन’ त्याच वेळेला लपतछपत येऊन पोहोचला. तो उत्तेजित, थोडा भयभीत असा वाटला. त्याने फोन केला नव्हता. कारण मोबाइलमधून हेरगिरी केली जाते असं त्याने ऐकलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं आणि म्हटलं, ‘‘तुम्हाला समजलं नाही? अमृतकाळाबद्दल?’’

लेखकाला काही समजलं नाही असं लक्षात आल्यानंतर कॉमन मॅन दबल्या, भयभीत आवाजात पण उत्तेजित होऊन सांगू लागला.. अहो..!.. त्या राहूला काय पाहिजे होतं? अमृताचे दोन थेंब? ते मिळवण्यासाठी त्या बिचाऱ्याने वेषांतर केलं. रूपांतर केलं. छद्मरूप धारण केलं. फसवण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या पंक्तीत जाऊन बसला. तेही पुढे, पुढच्या रांगेत, अग्रभागी. द्यायचे होते दोन थेंब अमृताचे. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही त्याला ओळखलंत. तुम्ही त्याला भर पंक्तीतून उठवलंत. तुम्ही त्याचा अपमान केला. उपहास केला. निर्भर्त्सना केली. तुम्ही त्याला हसलात. पण इतकंच नाही. तुम्ही त्याचा शिरच्छेददेखील केला. नसता केला तर, एकटा एकांडा पण उपद्रवी म्हणून राहिला असता तो! पण शिरच्छेद केल्यामुळे एकाचे दोन झाले-राहू आणि केतू. एकाकडे कुटिल विचार, तर दुसऱ्याकडे अमानुष शक्ती. एकाकडे डोकं, दुसऱ्याकडे निर्बुद्ध शरीर आणि उपद्रवी शक्ती.. राहूचे उपासक आता छद्मरूपाने तुम्हाला छळण्यासाठी वावरत आहेत. हे सगळे बहुरूपी उपासक आहेत. ते दुष्टबुद्धी, क्षुद्रबुद्धी आणि छद्मबुद्धी आहेत, आणि त्यांना सूड उगवायचा आहे. एक म्हणतो आहे, मी काशी. दुसरा म्हणतो, मी मथुरा. तिसरा म्हणतो आहे मी द्वारका, मी अयोध्या, मी.. मी.. मी! हे राहूचे उपासक विविध रूपाने वावरतायत. कधी ते संस्कृतिरक्षक होतात. कधी ते अभिमानी राष्ट्रभक्त होतात. कधी ते ज्योतिषी होतात. कधी ते भाष्यकार होतात. राजकीय विश्लेषक होतात, टोप्या बदलतात. त्यातला एक पुंगीवाला झालेला आहे किंवा बासरीवादक. त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय, की तुमच्या चिंता दूर करू, तुमच्या घरातले उंदीर पुंगी वाजवून आणि मोहित करून दूर घेऊन जाऊ, आणि तुम्ही विश्वास ठेवला आहे. आता मात्र त्या लोककथेप्रमाणेच, समाजातले अनेक तरुण पुंगीवाल्याच्या मागे मोहित होऊन जातायत आणि हा पुंगीवाला त्यांना खाईच्या दिशेने घेऊन जातो आहे.’’

कॉमन मॅन पुढे सांगू लागला, हळुवार आवाजात.. ‘‘नसता केला शिरच्छेद, दिले असते चार थेंब तर ही वेळ आली नसती. आता ‘राहू-केतू’चा उच्छाद सहन करणं इतकंच आपल्या नशिबी आहे. ज्योतिषाचार्याना जाऊन विचारण्याची सोय नाही, कारण ते आधीच विकले गेलेले आहेत. ही तर नियतीचीच इच्छा आहे असं ते तुम्हा नियतीवाल्यांना सांगत आहेत. अमृतकाळ सुरू आहे आणि अमृताच्या चार थेंबांसाठी लढाई सुरू आहे. श्रेयासाठी  लढाई सुरू आहे. राहूचे उपासक सूड घेण्याच्या प्रयत्नात आहेत.’’

कॉमन मॅनचं सांगून झालं असावं. लेखकाने विचारलं, ‘‘मग? एकूण बरं चाललेलं नाही?’’ या प्रश्नावर तो थबकला. मग सांगू लागला.. उद्याची पहाट सुंदर असेल या त्यांच्या आश्वासनावर खरंतर मी विश्वास ठेवायला नको होता, कारण उद्याची पहाट उजाडणारी नसते, उद्याचा दिवस येतच नसतो. कॉमन मॅनला शेरोशायरीची आवड नाही. ज्ञान पण नाही. पण तो स्टाइलने कपाळाला हात लावतो. मथितार्थ काव्यमय. दाग़ नावाच्या कवीच्या कवितेसारखा. तो सुचवतो-

‘गजब किया, तेरे वादे पर ऐतबार किया ।

 तमाम रात क़यामत का इंतज़ार किया।’

लेखक सामान्य माणसाच्या-कॉमन मॅनच्या या हताशेकडे पाहतो आहे.

Story img Loader