डॉ. जयदेव पंचवाघ brainandspinesurgery60@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभियांत्रिकी, रचनाशास्त्राच्या दृष्टीनं मणक्यातली ‘डिस्क’ अद्भुतच, पण मग अनेकांना ‘स्लीप डिस्क’चा त्रास का?
कमरेच्या मणक्यातील कॅनॉलमधील नसांचा पुंजका आणि त्यावरील दाब याविषयी आपण मागच्या आठवडय़ात चर्चा केली. न्यूरोसर्जरीच्या इतिहासाचं नवं पान उलटण्याआधी मागच्या लेखाशी थोडासा संबंधित असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आज मांडतो.
‘जेनेसिस’ या हिब्रू बायबलमध्ये आलेल्या एका गोष्टीत जेकब आणि देव यांच्यात युद्ध होतं, आणि या युद्धात देव जेकबच्या खुब्याजवळच्या नसेवर (‘साएटिक नव्र्ह’) प्रहार करून त्याला तीव्र वेदना (‘साएटिका’ची) देतो; असा उल्लेख आला आहे. त्यामुळे आजही धार्मिक ज्यू लोक प्राण्यांच्या पायाचं मांस खाण्याआधी ‘साएटिक’ नस काढून टाकतात .
कमरेच्या खालच्या भागापासून एका बाजूचा कुल्ला, मांडीचा मागचा भाग, पोटरी आणि पावलाचा खालचा भाग यात जी कळ पसरते तिला आपण आज ‘साएटिका’ म्हणून ओळखतो. या कळीबरोबरच या भागात मुंग्या व बधिरपणासुद्धा असू शकतो. कुल्याच्या किंवा नितंबाच्या भागाला असलेल्या ‘साएटिक’ अशा फ्रेंच (मूळ ग्रीक) शब्दावरून हा शब्द आला. म्हणजेच साएटिका हे विशिष्ट आजाराचं नाही, तर लक्षणाचं नाव आहे. आज मात्र शक्यतो हा शब्द आपण मणक्यात नसेवर आलेल्या दाबामुळे जी कळ येते तिलाच संबोधण्यासाठी वापरतो. हा दाब येण्याचं नेहमी दिसणारं कारण म्हणजे डिस्क किंवा चकती घसरणं.
न्युरोसर्जरीत म्हणजेच मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेत अत्यंत नाजूक आणि जीवनासाठी अमूल्य अशा भागांवर शस्त्रक्रिया होते हे खर, पण मणक्याच्या रचनेत असा एक भाग आहे जो केवळ अद्भुत आहे, कारण जीवशास्त्र, रसायनशास्त्र, ‘मेकॅनिकल इंजिनीअिरग’, भौतिकशास्त्र.. अशा अनेक शास्त्रांतील संकल्पनांचा अत्यंत अचूक मिलाफ याच्या रचनेत दिसतो. तसं म्हणाल तर हा भाग एका दृष्टीने आपल्या सर्वाच्या ओळखीचा आहे, पण त्याबद्दल बहुतेकांना योग्य माहिती नाही.
हा भाग म्हणजे दोन मणक्यांमधील चकती, गादी किंवा कूर्चा. इंग्रजीत ‘इंटरव्हर्टिब्रल डिस्क’ किंवा नुसतंच ‘डिस्क’
चकती घसरणे, गादी सरकणे, किंवा अगदी ‘स्लीप डिस्क होणे’ यांसारखे शब्द प्रत्येकानेच कधीतरी ऐकलेले आहेत. किंबहुना स्पाँडिलोसिसची
सुरुवात बहुतेक वेळा डिस्कपासूनच होते. प्रत्येकाला वयपरत्वे कमीजास्त प्रमाणात स्पाँडिलोसिस होतोच आणि या विषयासंबंधात अनेक समज-गैरसमज असल्याने डिस्क या विषयाला आणखी महत्त्व येतं.
तर ही डिस्क म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? तसं डिस्कच्या संरचनेचं महत्त्व सर्वच प्राण्यांसाठी आहे पण माणसासाठी ते विशेष आहे. या भूतलावर सदासर्वकाळ दोन पायांवर चालणारा मानव हा एकच प्राणी आहे. याचा अर्थच असा की आपण बसल्यावर, उभे रहिल्यावर किंवा चालताना संपूर्ण शरीराचं वजन पाठीच्या कण्यातून संक्रमित होत असतं. तसंच मानवी शरीर इतक्या विविध प्रकारच्या हलचाली करू शकतं की या कण्यात लवचीकता असणंसुद्धा गरजेचं आहे.
म्हणूनच हा कणा एकसंध असून उपयोगी नाही. नाहीतर पुढे किंवा मागे वाकल्यावर तो काठीसारखा मोडेल. मग नेमकी कशी रचना असावी? ..या प्रश्नाचं उत्तर निसर्गानं ‘डिस्क’च्या रचनेतून दिलं आहे. निसर्गानं कणा एकसंध न ठेवता अनेक मणक्यांचा बनवून प्रत्येक दोन मणक्यांमध्ये डिस्क ठेवली आहे. म्हटलं तर डिस्क हा सांधा आहे, म्हटलं तर एक ‘स्पेसर’ आहे. तुम्ही हवं तर याला ‘शॉक अॅब्सॉर्बर’ म्हणू शकता.. ‘बॉलबेअिरग’सुद्धा म्हणू शकता. एका अर्थाने हा अत्यंत लवचीक उतिबंध (लिगामेंट ) आहे किंवा दोन हाडांमधली कूर्चा आहे. एवढी करय एकाच वेळी सांभाळणारा भाग शरीरात दुसरा नाही.
विविध हलचाली करताना मणक्यांचा एकमेकांवर येणारा दाब (कॉम्प्रेसिव्ह प्रेशर ), छाती किंवा कंबर फिरवताना बसणारा पीळ (टॉर्शन फोर्स) पुढे किंवा बाजूला वाकताना येणारा असमान ताण.. हे सर्व डिस्क सहन करते. न्युरोसर्जरीत डिस्कबद्दल आणखी खोलवर शिकताना खर तर डिस्क का घसरते यापेक्षा ‘इतक्या कमी वेळा का घसरते?’ असा प्रश्न पडावा इतक्या ताणाला तिला रोजच सामोरं जावं लागतं.
प्रत्येक डिस्कचे तीन भाग असतात. मध्यभागी गव्हाच्या दाट खिरीच्या किंवा चिकाच्या घनतेचा न्यूक्लिअस पल्पोजस असतो. अत्यंत चिवट व चिकट गुणधर्माच्या या न्यूक्लिअसमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं तसंच इतर भाग विशिष्ट प्रकारच्या प्रोटीनने व प्रोटीन-स्निग्ध पदार्थाच्या अत्यंत चिवट आणि उच्च ताणक्षमतेच्या तंतूंच्या जाळय़ाने भरलेला असतो.
या न्यूक्लिअसच्या सर्व बाजूंनी वेढणारी अन्यूलस फायब्रोजस ही अनेक पदर एकावर एक गुंडाळून तयार झालेली वर्तुळाकार जाड ‘रिंग’ असते. यात अत्यंत भक्कम असे तंतू असतात. हे ‘फायब्रोकार्टिलेज’चे तंतू प्रत्येक पदरात वेगळय़ा दिशेने रचलेले असतात. त्यामुळे अत्यंत घट्ट वीण न्यूक्लिअसभोवती तयार होते. डिस्कचा तिसरा भाग म्हणजे कूर्चेच्या दोन चकत्या. मणक्याचं हाड व डिस्क यांच्यामध्ये प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे या असतात.
शरीराच्या विविध हलचालींदरम्यान डिस्कमधला दाब जेव्हा वाढतो आणि मणके एकमेकाजवळ येतात तेव्हा न्यूक्लिअस प्रसरण पावतो आणि अन्यूलस सर्व बाजूंनी फुगून त्याला जागा देते पण डिस्कच्या बाहेर पडू देत नाही. आपण पुढे किंवा मागे वाकल्यास अन्यूलस अनुक्रमे मागे किंवा पुढे जातो आणि तोल साधतो. इथे तो बॉलबेअिरगचं काम करत असतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे शरीरातील ज्या भागांना पोषक द्रव्य पोहोचवण्यासाठी रक्तवाहिन्याच नसतात त्यांपैकी डिस्क हा एक भाग (तसा दुसरा भाग म्हणजे डोळय़ातील भिंग) आहे. डिस्कला आवश्यक घटकांचा पुरवठा मणक्यातील हाडांमधून द्राव पाझरून होतो.
दिवसभरच्या शरीराच्या हलचालींमुळे डिस्कवर ताण येऊन त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. रात्रीच्या झोपेनंतर हाडांमधून द्राव पाझरून ते पुन्हा वाढतं. आणि म्हणूनच दिवसभरच्या कामानंतर आपली उंची मोजली तर ती सकाळच्या उंचीच्या तुलनेने कमी भरेल. डिस्कमुळेच आपल्या मणक्याची लांबी म्हणजेच आपली उंची अबाधित राहते.
आता आपण बघू की इतकी भक्कम असलेली चकती का घसरते?
या लेखामागचं प्रयोजनच या प्रश्नाचं उत्तर देणं हे आहे; कारण आजवर अक्षरश: शेकडो लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे. ज्या लोकांमध्ये चकती घसण्याची शक्यता जास्त असते त्यांच्यात चकतीच्या रचनेत कुठे ना कुठे कमी असते. (या रचनेतील दोषाबरोबरच अतिरिक्त भार डिस्कवर पडला तर आणखी वाईट) ही कमी असण्याचं कारण आनुवंशिक असतं. उदाहरणार्थ, न्यूक्लिअसला सर्व बाजूंनी घट्ट धरून ठेवणारी अॅन्यूलसच्या विणीतील काही पदर किंवा तंतू कमकुवत असतील तर डिस्कमधील दाब वाढल्यास तो जेलीसारख्या किंवा अत्यंत दाट खिरीसारख्या घनतेचा न्यूक्लिअस त्या घट्ट विणीच्या अगदी आतल्या तंतूंना फाडून बाहेर पडू पाहतो. अगदी पहिल्या झटक्यातच अॅन्यूलसचे सर्व पदर फाटतातच असं नाही. किंबहुना अगदी आतलेच पदर फाटतात किंवा उसवतात. या उसवलेल्या फटीमधून न्यूक्लिअसचा मऊ भाग विणीच्या तंतूंमधून अॅन्यूलसच्या पदरामध्ये पसरतो. याला इंटरनल हर्निएशन किंवा ‘डिस्कच्या आतल्या आतच झालेली फाटाफाटी’ असं म्हणता येईल. पुन्हा काही कारणाने डिस्कमधील दाब अचानक वाढला ( उदा. खाली वाकून खूप जड वस्तू उचलताना ) तर मग राहिलेली वीणसुद्धा फाटून न्यूक्लिअसचा मऊ ‘गर’ डिस्कच्या बाहेर येतो.
हा आपली जागा सोडून, तटबंदी फोडून बाहेर आलेला डिस्कचा भाग जर मणक्याच्या आतल्या मज्जारज्जू किंवा नसेमध्ये घुसला तर दाबाची लक्षणं दिसू लागतात. गेल्या शतकातल्या आणि विशेषत: मागच्या वीस वर्षांतल्या आपल्या अनुभवांवर आधारित विविध उपचार या आजारासाठी विकसित झाले आहेत. त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे. या उपचारांचा इतिहास कसा बदलत गेला ही रोचक कहाणी आहे आणि जागेअभावी मी ती पुढच्या लेखात लिहीन.
हा विषय विस्ताराने लिहिण्याचं कारण म्हणजे आयुष्यात कंबरदुखी किंवा मानदुखी झाली नाही अशी व्यक्ती विरळा. स्पाँडिलोसिसच्या प्रक्रियेची सुरुवातसुद्धा डिस्कपासून होते आणि आजच्या काळात वाढत्या प्रमाणात येणारं बैठं काम या आजाराची तीव्रता आणि शक्यता वाढवत आहेत. यातच भर म्हणजे विविध क्षेत्रांतील विविध लोक मणक्याच्या आजारांवर छातीठोक मतं व्यक्त करतात. पु. ल. म्हणाले होते तसं , ‘याला वयाची व शिक्षणाची अट नाही’.
तसंही भारतात सर्व मतांचा आदर केला जातो. या पार्श्वभूमीवर शास्त्रीय आधारावर सिद्ध झालेल्या गोष्टी सर्वासमोर, कळेल अशा भाषेत मांडणं मला नेहमीच गरजेचं वाटतं. पुढील लेखात ही विचारशंृखला सुरू राहील.
(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.