जतीन देसाई
पाकिस्तान तसंच श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांना अटक करण्याचं प्रमाण अलीकडे प्रचंड संख्येने वाढलं आहे.
खोल समुद्रात दूरवर मासे पकडण्यासाठी जाणाऱ्या भारतीय मच्छीमारांसमोरील संकटाची तीव्रता आता वाढली आहे. या महिन्यात आतापर्यंत पाकिस्तानने ७० हून अधिक भारतीय मच्छीमार आणि त्यांच्या १४ बोटी पकडल्या आहेत. श्रीलंकेने भारताच्या जवळपास ६० मच्छीमारांची धरपकड केली आहे. या बोटी गुजरात आणि तमिळनाडूच्या असल्या तरी त्यात मासे पकडायला जाणारे मच्छीमार, काही प्रमाणात का होईना, देशाच्या वेगवेगळय़ा भागांतीलदेखील असतात. ६२५ पेक्षा जास्त भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. भारताच्या तुरुंगात ८० हून अधिक पाकिस्तानी मच्छीमार आहेत. एवढेच नव्हे तर एखाद्या मच्छीमारांचा तुरुंगात मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह घरी पोहोचायलादेखील साधारण दीड महिना लागतो. या एकूण परिस्थितीमुळे गुजरातच्या सौराष्ट्रातील मच्छीमार समाजात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
सौराष्ट्राच्या ओखा, पोरबंदर, वेरावळ येथून निघणाऱ्या मच्छीमार बोटीला जवळ मासे मिळत नसल्याने आंतरराष्ट्रीय समुद्र सीमारेषेच्या (आयएमबीएल) जवळ जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. २१ ते २५ दिवस पुरेल एवढे इंधन, बर्फ, पाणी, खाण्याच्या वस्तू इत्यादी घेऊन या बोटी समुद्रात जातात. समुद्रातल्या प्रदूषणामुळे त्यांना खूप दूर जावं लागतं. एका बोटीत साधारण सहा ते सात खलाशी असतात. या सगळय़ा बोटींत जीपीएस असले तरी बऱ्याच वेळा प्रचंड वाऱ्यामुळे किंवा प्रवाहामुळे त्यांची बोट आयएमबीएलच्या (इंटरनॅशनल मेरिटाइम बाउंड्री लाइन) पुढे सरकते. काही वेळा तर पाकिस्तानच्या मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीचे (एमएसए) जवान आपल्या हद्दीत येऊन आपली बोट पकडतात, असे अनेक मच्छीमार मला नेहमी सांगतात. एकदा पकडला गेल्यानंतर त्याला साधारण दीड ते दोन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात राहावं लागतं. पाकिस्तानचे मच्छीमार बहुतेक वेळा सर क्रीकजवळ असलेल्या हरामी नालाकडे पकडले जातात. त्या परिसरावर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं (बीएसएफ) लक्ष असतं. पाकिस्तानच्या मच्छीमारांच्या बोटी भारतीय मच्छीमारांच्या बोटींपेक्षा लहान असतात.
जयंती सोलंकी नावाच्या भारतीय मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात १४ डिसेंबरला मृत्यू झाला आणि ३१ जानेवारीला त्याचा मृतदेह त्याच्या गुजरातच्या घरी पोहोचला. आता ३ फेब्रुवारीला नानू रमेश नावाचा दुसरा मच्छीमार कराचीच्या तुरुंगात मृत्युमुखी पडला. त्याचा मृतदेहदेखील एक महिन्याच्या आत त्याच्या गावात पोहोचण्याची शक्यता नाही. नानू रमेशला २०१८ मध्ये पकडण्यात आलं होतं. १६ जानेवारी २०१९ ला त्याची शिक्षा पूर्ण झाली होती, तरीही तो पाकिस्तानच्या तुरुंगात होता. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडण्यात आलं असतं तर कदाचित आज तो जिवंत असता. अलीकडे झालेल्या या दोन मच्छीमारांच्या मृत्यूंमुळे आणि मोठय़ा प्रमाणात करण्यात येत असलेल्या अटकसत्रामुळे मच्छीमार समाजात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. मच्छीमार समाजातील महिलांचे मला नेहमी फोन येतात आणि त्या एकच प्रश्न विचारतात की पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले त्यांचे नातेवाईक कधी सुटतील? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. जानेवारीत पाकिस्तानने २० भारतीय मच्छीमारांना सोडले पण त्याहून कितीतरी अधिक त्यानंतर पकडले. त्यांचं हे पकडणं आणि सोडणं हे सतत सुरू असतं.
भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी पत्रव्यवहारात मच्छीमार चुकून पाण्याची सीमा ओलांडतात, असं नेहमी म्हणतात. मग मुद्दा उपस्थित होतो की ते चुकून सीमा ओलांडत असतील तर त्यांना दीड-दोन वर्षे तुरुंगात ठेवण्याचे कारण काय? एकदा मच्छीमार पकडला गेला की त्यानंतर त्याचा घरातल्या लोकांशी किंवा नातेवाईकांशी संपर्कदेखील होत नाही. त्यांनी पाच पत्रं पाठवली तर त्यातील दोन किंवा तीन गावी पोहोचतात. चुकून पाण्याची सीमा ओलांडल्याबद्दल पकडण्याऐवजी संबंधित मच्छीमारांना अटक न करण्याचे धोरण द्विपक्षीय चर्चेतून स्वीकारलं गेलं पाहिजे. खरंतर कैद्यांना भेटण्याचा त्यांच्या नातेवाईकांना अधिकार आहे. संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) तसं म्हटलं आहे. पण पाकिस्तानात असलेल्या भारताच्या आणि भारतात असलेल्या पाकिस्तानच्या कैद्यांसाठी ते अशक्य आहे. करोना आणि इतर कारणांमुळे गुजरात येथील मच्छीमार समाज सतत चिंतेत असतो. पाकिस्तानच्या मच्छीमार समाजालाही भारताच्या तुरुंगात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांबद्दल तेवढीच चिंता असते. अशा परिस्थितीत दोन्ही राष्ट्रांनी वेगळा विचार करण्याची गरज आहे. प्रत्यक्ष भेट शक्य नसेल तर ऑनलाइन भेटीचा विचार केला पाहिजे. असं झाल्यास दुसऱ्या देशाच्या तुरुंगात असलेल्या आपल्या नातेवाईकांना त्यांना पाहता येईल व त्यांच्याशी बोलता येईल. यामुळे लोकांची चिंतादेखील कमी होईल.
पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून आलेले मच्छीमार म्हणतात की कुठलाही आजार असला तरी तिथे एकाच प्रकारच्या गोळय़ा आणि इंजेक्शन दिले जातात. कदाचित या कारणामुळेदेखील आजारपण वाढून एखाद्याचा मृत्यू होत असेल. दोन्ही देशांनी आपापल्या कैद्यांना पाहण्यासाठी डॉक्टरांची टीम पाठवण्याची एकमेकांना परवानगी आणि त्यासाठी व्हिसा दिला पाहिजे.
एका भारतीय बोटीची किंमत साधारण ५० लाख रुपयांहून अधिक असते. पाकिस्तानने एकूण १२५० हून अधिक बोटी पकडलेल्या असल्यामुळे सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरील मच्छीमार गावांची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट झाली आहे. धरपकडीची शक्यता असली तरी मच्छीमार समाजातील लोक आणि मच्छीमारी रोजगार म्हणून पाहणारे इतर लोक इतर पर्याय नसल्यामुळे मासे पकडण्यासाठी इंटरनॅशनल मेरिटाइम बाउंड्री लाइनच्या जवळ जातात. बऱ्याच वर्षांपूर्वी कराचीजवळच्या मलीर येथील तुरुंगात मी गेलो होतो. तेव्हा ३० अल्पवयीन भारतीय कैद्यांना भेटण्याची संधी मला मिळाली होती. त्यांच्याशी गुजरातीत संवाद झाला. ‘यापुढे आम्ही मासे पकडण्यासाठी समुद्रात जाणार नाही’, असे त्या मुलांनी सांगितले. पुढच्या दोन-तीन महिन्यांत ते सुटले. काही महिन्यांनंतर या मुलांची त्यांच्या गावी भेट झाली आणि आश्चर्य म्हणजे परत ते समुद्रात जायची तयारी करत होते. त्याबद्दल त्यांना विचारता ते म्हणाले की दुसरा कुठला रोजगार उपलब्ध नाही आणि घर चालविण्यासाठी दर महिन्याला आईवडिलांना पैसे दिले पाहिजेत म्हणून परत पकडले जाण्याची शक्यता असली तरी आम्हाला जावं लागतं आहे.
भारत आणि श्रीलंकेतल्या मच्छीमारांची स्थितीदेखील वाईट आहे. ८ फेब्रुवारीला श्रीलंकेच्या नौदलाने १६ भारतीय मच्छीमारांना पकडून त्यांच्या तीन बोटी ताब्यात घेतल्या. रामेश्वरमचे मच्छीमार १२ फेब्रुवारी रोजी कच्छादिवू आणि धनुषकोडी येथे मासे पकडत असताना श्रीलंकेने त्यांच्या बोटींसह त्यांना पकडले. त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात श्रीलंकन नौदलाने ६८ भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या पाण्यात मासे पकडत असल्याच्या आरोपाखाली पकडलं होतं. श्रीलंकन नेव्ही बऱ्याचदा पाल्कच्या सामुद्रधुनीजवळ भारतीय मच्छीमारांना पकडते. जानेवारीच्या शेवटी नागपट्टिनम भागातील २१ मच्छीमार आणि त्यांच्या दोन बोटी श्रीलंकेने पकडल्या होत्या. त्याच्या काही दिवस आधी श्रीलंकेच्या न्यायालयाने ५६ भारतीय मच्छीमारांना सोडण्याचा आदेश दिला होता. श्रीलंकेच्या नेव्हीने बऱ्याचदा भारतीय मच्छीमार बोटींवर गोळय़ा चालवल्या आहेत. पाकिस्तानच्या एमएसएने नोव्हेंबर महिन्यात केलेल्या गोळीबारात पालघरजवळच्या वडराई गावाचा मच्छीमार श्रीधर चामरेचा मृत्यू झाला होता.
मच्छीमारांसमोरील ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारला विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री जी. एल. पायरीस यांच्या दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीस दिल्लीत झालेल्या चर्चेत इतर मुद्दय़ांबरोबरच मच्छीमारांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. या संदर्भात तात्काळ पावलं उचलण्याचा निर्णय घेतला गेला. भारत-पाकिस्तानात कुठल्याही स्वरूपाची औपचारिक चर्चा होत नाही, ही सर्वात मोठी अडचण आहे. औपचारिक चर्चा बंद असतानादेखील भारतीय तटरक्षक दल आणि पाकिस्तानच्या एमएसएची वर्षांत एकदा बैठक होत असते. त्यामध्ये अटकेच्या प्रश्नाकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. दोन्ही देशांतील मच्छीमार गरीब आहेत. मच्छीमार पकडला गेला की त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. या संकटातून त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे.
लेखक ज्येष्ठ पत्रकार असून भारतीय उपखंडातील शांततेसाठी काम करणाऱ्या लोकसंघटनात सक्रिय आहेत.
jatindesai123@gmail.com