तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

वेदांचा- विशेषत:  ऋग्वेदाचा अभ्यास करणारे पश्चिमी व आधुनिक भारतीय पंडित यांच्यामध्ये सोमयोगातील सोमरसाबद्दल- म्हणजे सोमरस हा मद्य आहे की नाही, याबद्दल चर्चा चालते. सोमरस हा सोम नामक वनस्पतीपासून काढलेला रस सोमयोगामध्ये इंद्रादी देवांना अर्पण करण्याचा विधी वेदांमध्ये सांगितला आहे. हा रस सोम नामक वल्ली कुटून त्यातून काढलेला व गाळलेला रस होय, ही गोष्ट तत्संबंधी केलेल्या विधानांवरून व वर्णनांवरून दिसते. हा सोमरस इंद्रादी देवांच्या ठिकाणी मद म्हणजे कैफ वा उत्कट आनंद उत्पन्न करतो असे तेथेही वर्णन आहे. या सोमरसाच्या पानाने इंद्र उत्साहित होतो. एवढेच नव्हे, तर तो उत्साह सुरापानाने उत्पन्न होणाऱ्या उत्साहासारखा उत्कट असतो असेही वर्णन आढळते. मद हा शब्दच सोमरसपानाचा मानसिक परिणाम म्हणून सर्वत्र वापरलेला दिसतो. काही ठिकाणी सोमरसाला ‘सोम्य मधू’ म्हणजे सोमाचे मद्य असेही म्हटले आहे. म्हणून सोमरस हा मद्यासारखा परिणाम करणारा होता असे बहुतेक पंडितांचे मत आहे. परंतु ऋ ग्वेदामध्ये सोम आणि सुरा (धान्याचे पीठ आंबवून गाळलेली दारू) असा भेद केलेला आढळतो. वरुणदेवाची प्रार्थना करताना सूक्तद्रष्टे ऋषी वसिष्ठ म्हणतात की, मनुष्य सावध बुद्धीने पाप करीत नाही; पाप होते ते दैव, सुरा, क्रोध, सूत किंवा अविवेक यांच्यामुळे होते (ऋग्वेद ७.८६.६). एका ठिकाणी वसिष्ठ ऋषी म्हणतात की, इंद्राने सोम खूप प्यायल्यावर त्याच्या हृदयामध्ये सुरेने झिंगलेल्या लोकांप्रमाणे गडबड उडते. (ऋग्वेद ८.२.१२) अश्वीदेवांची स्तुती करीत असताना ‘ऋग्वेदा’त (१.११६.७) म्हटले आहे, की त्यांची जी महान कृत्ये आहेत, त्यांपैकी एक कृत्य असे, की दारूच्या पखालीतून दारू वाहते, त्याप्रमाणे अश्वीदेवांच्या अश्वाच्या खुरांतून वाहणाऱ्या दारूचे शंभर घडे भरतात. उदार यजमानांची प्रशंसा करताना (ऋग्वेद १०.१०७.९) सांगितले आहे, की त्या उदार माणसांनी सुरेचे सार जिंकले आहे. या अश्वीदेवांची एका ठिकाणी (१०.१३१.४-५) प्रशंसा केली आहे, की सोम मिसळलेली सुरा प्यायलेल्या अश्वीदेवांनी इंद्राला नमुची असुराशी युद्ध करताना चांगली मदत केली. अथर्ववेदात (४.३४) अनेक ठिकाणी सुरेबद्दल प्रशंसात्मक उद्गार आले आहेत. (१४.१; १५.९). तेथे एका ठिकाणी (४.३४.६) असे म्हटले आहे, की ज्या स्वर्गात तूप, मध, दही, दूध आणि सुरा यांचे डोह आहेत, अशा स्वर्गात यज्ञकर्ता म्हणजे यजमान राहत असतो. तैतिरीय संहिता (२.प्र.१) आणि शतपथ ब्राह्मण (१.६३) या यजुर्वेदाच्या गं्रथामध्ये देवांचा पुरोहित आणि असुरांचा भाचा असलेल्या विश्वरूप त्वष्ट्राला एक सोमपान करणारे, दुसरे सुरापान करणारे आणि तिसरे अन्न खाणारे अशी तीन शिरे होती.  तेथे पुढे असेही म्हटले आहे, की इंद्राने खूप सोमपान केल्यामुळे तो रोगी झाला, तेव्हा देवांनी सौत्रामणी यज्ञ करून इंद्राला रोगमुक्त केले. या सौत्रामणी यज्ञात सोमाच्या व सुरेच्या आहुती द्यावयाच्या असतात. शिल्लक राहिलेली सुरा सुरापान करणारा ब्राह्मण मिळाल्यास त्याला घ्यायला द्यावी; तसा ब्राह्मण न मिळाल्यास वारुळाच्या मातीवर ती अवशिष्ट सुरा ओतून टाकावी. (तैत्तिरीय ब्राह्मण १.८.६; शतपथ ब्राह्मण ५.५.४). शतपथ ब्राह्मणामध्ये (५.१.५.२८) सोम व सुरा यांची तुलना केली आहे : सोम हा सत्य, समृद्धी आणि ज्योती होय, आणि सुरा ही अमृत, दारिद्य््रा आणि अंध:कार होय. काठक संहितेमध्ये (१२.१२) सुरेबद्दल असे म्हटले आहे की, दारू प्यायल्यावर सून व सासरा, लहान-मोठे एकत्र बसून बडबडत राहतात; म्हणून पाप लागू नये म्हणून ब्राह्मण सुरा पीत नसतो. सुरा हे पाप व मळ आहे; परंतु क्षत्रियाला ब्राह्मणाने सांगावे, की त्याला सुरा प्यायल्याने बाधा होत नाही. कुमारिल भट्टांच्या तंत्रवार्तिकात (१.३.७) सुरा शब्दाचे दोन अर्थ सांगितले आहेत. सीधू वा शीधू (रम) आणि मधापासून तयार केलेली दारू. ऐतरेय ब्राह्मणात (३७.४) राजाभिषेक सांगितला आहे. या अभिषेकात पुरोहिताने राजाच्या हातात सुरापात्र द्यावयाचे असते. याच्या उलट छांदोग्य उपनिषदात (५.११.५) केकय देशाचा राजा अश्वपती म्हणतो, की माझ्या देशात चोर, कृपण, मद्यपी, अग्निहोत्र न करणारा, अशिक्षित, स्त्रियांच्या बाबतीत स्वैर वर्तन करणारा असे लोक नाहीत; मग स्वैर वर्तन करणारी स्त्री कशी असेल? त्याच उपनिषदात (५.१०.९) पाच पातकांमध्ये सुरापानाची गणना केली आहे.

कौटिलीय अर्थशास्त्रात राज्याच्या निरनिराळ्या खात्यांचे निरनिराळे अध्यक्ष व त्यांची कर्तव्ये सांगितली आहेत. त्यांत सुराध्यक्ष म्हणून एक प्रकरण (२.२५) आहे. त्यात राज्यातील मद्यव्यवसाय चालविणाऱ्या सुराध्यक्षाची कर्तव्ये सांगितली आहेत, ती अशी : किल्ले, जनपद (जनवस्ती), सैन्य- शिबिरे यांमध्ये मद्याच्या निर्मितीचा आणि क्रयविक्रयाचा व्यापार चालवावा; तो परंपरेने मद्याचे उत्पादन आणि त्याचा क्रयविक्रय करणाऱ्यांकडून चालावा. परवानगीवाचून अन्य स्थळी जे मद्यव्यापार करतात, त्यांना ६०० रु. (पण) दंड करावा. एका गावातून दुसऱ्या गावात संमतीवाचून मद्य नेणे गुन्हा आहे. कारण अधिकारी, आर्य व गुंड यांच्याकडून अतिक्रम होण्याचे भय असते. पानागार म्हणजे मद्यपानगृह निर्माण करावे; त्याला अनेक दालने असावीत, झोपण्याची शय्यादी साधने असावीत; पात्रे, फुले आणि पाणी ठेवावे. तेथे येऊन कोण कोण राहतात, त्यांच्यावर देखरेख ठेवावी; त्यांच्या मोलाच्या वस्तू चोरीला जाणार नाहीत अशी काळजी घ्यावी; व्यक्तींना काही नियमित प्रमाणात मद्ये घरी नेण्याची परवानगी द्यावी.. इत्यादी नियम सांगितल्यावर मेदक, प्रसन्न, आसव, अरिष्ट, मैरेय, मधू, श्वेतसुरा, सहकारसुरा (आंब्याच्या रसाची), महासुरा राजपेया, इ. मद्यांचे आणि मद्यद्रव्यांचे व त्यांच्यामध्ये करावयाच्या विविध मिश्रणांचे वर्णन केले. पुढे म्हटले आहे की, कुटुंबामध्ये काही धर्मकार्य असल्यास श्वेतसुरा किंवा अन्य प्रकारची सुरा तयार करण्याची परवानगी द्यावी. उत्सव, यात्रा किंवा अन्य सामाजिक समारंभ यांच्यामध्ये सुरापानाची चार दिवसपर्यंत तरतूद असावी; परंतु हे सगळे सुराध्यक्षाच्या संमतीने व्हावे. सुरापानादी महापापे करणाऱ्या ब्राह्मणाला मात्र देशातून हद्दपारीची शिक्षा कौटिलीय अर्थशास्त्रात सांगितली आहे.

Story img Loader