– अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
विनोबांनी नामस्मरणाच्या समन्वयाचा आरंभ श्रीविष्णुसहस्रनाम आणि अस्माउल् हुस्ना यांच्यापासून सुरू केल्याचे दिसते.
कुराणासोबत विनोबांचे इस्लामच्या अन्य शिकवणुकीचे नियमित चिंतन असे. हिंदू इस्लामचे तत्त्व यात समानता दिसली की त्यांची नोंद करूनच ते पुढे जात.
रामनामाचे महत्त्व नोंदवताना नमाज म्हणजे नम् धातू आहे आणि त्याचा अर्थ नम्र होणे आहे असे ते सांगतात. नामस्मरण आणि नमाज या दोहोंना जोडणारा धागा नम्रतेचा आहे हे त्यांचे प्रतिपादन विचारात पाडते.
या भूमिकेला धरून कुराण-साराप्रमाणेच त्यांनी आणखी महत्त्वाचे कार्य केले. ‘विष्णुसहस्रनाम आणि अस्माउल् हुस्ना’ची तुलना. अस्माउल् हुस्ना म्हणजे अल्लाहची ९९ नामे. सामान्य आणि सश्रद्ध मुस्लीम व्यक्ती हाती जपमाळ घेऊन ही ९९ नावे उच्चारत असते.
श्रीविष्णुसहस्रनामात ही ९९ नावे कशी आढळतात याची उकल विनोबांनी केली. सुदैवाने या नामांवरचे विनोबांचे आणि त्यांच्या अनुयायांचे सखोल चिंतनही उपलब्ध आहे. मुस्लीम व्यक्तीला श्रीविष्णुसहस्रनाम आणि हिंदू व्यक्तीला अस्माउल् हुस्ना सारखेच आदरणीय होतील अशी तरतूद त्यांनी करून ठेवली आहे.
प्रत्येक धर्मातील नामस्मरण हिंदू धर्माला कसे अनुकूल आहे हे विष्णुसहस्रनामाचे आधारे त्यांनी अगदी नेमकेपणाने सांगितले आहे. विविध धर्म परस्परांशी जोडलेले आहेत हे आपण कितीही सांगितले तरी ही समानता अस्तित्वात नाही असा मतप्रवाह दिसतो. तथापि ही भिन्नता नामस्मरणाला लागू होत नाही.
कोणतीही धार्मिक आणि श्रद्धाधारी व्यक्ती देवाचे नाव घेत असते. तसे करताना आपण अन्य धर्माच्या शिकवणीशी जोडले आहोत हे भान असेल तर अस्मिता टोकदार होत नाहीत.
उदा. विष्णुसहस्रनामात ‘एकात्मा’ हे नाव येते. अस्माउल् हुस्नामध्ये त्याला ‘अहुदू’ म्हटले आहे. हे उदाहरण उभय धर्मातील शिकवण कशी सारखी आहे हे सांगते.
विनोबांनी विष्णुसहस्रनामाचे चिंतन करताना सर्व धर्मातील ऐक्य साधल्याचे दिसते. तथापि हे चिंतन एकाच धर्माशी जोडलेले आहे असा आक्षेप घेतला जाऊ शकतो. याला उत्तर म्हणून विनोबांची आणखी एक अजोड कृती आहे. तिचे नाव आहे ‘नाममाला.’
‘ॐ-तत् श्री नारायण तू’ अशी तिची सुरुवात आहे. बऱ्याच शाळांमधे ती म्हटली जाते. कधी तिचा कर्ता माहीत असतो तर कधी नसतो. ही रचना विनोबांची आहे.
नाममालेतील ईश्वराच्या ३६ नावांवर विनोबांनी १९६४ मध्ये प्रवचने दिली. किशोरवयीन मुले तिचे श्रोते होते. त्यांची निवड स्वत: विनोबांनी केली होती.
एक दिवस सायंप्रार्थना संपली आणि समोरच्या मुलांसमोर विनोबांनी नाममालेवर बोलायला सुरुवात केली. आज ही प्रवचने उपलब्ध आहेत. त्यातील साधेपणा, सोपेपणा, उत्स्फूर्तता आणि अपार ईश्वरशरणता काळजाला भिडते.
घरात, शाळेत, धर्मशिक्षणाचा आरंभ नाममालेने करावा. कोणत्याही विशिष्ट प्रार्थना म्हणण्यापेक्षा नाममालेसारखी व्यापक प्रार्थना म्हटली तर ते फार सयुक्तिक ठरेल.