विजय तेंडुलकर
तिचे गाणे प्रत्येकाला वेगळे वाटते.. कुणाला ते टिपूर चांदणे वाटते.. कुणाला आपलीच प्रतिमा दाखवणारा बिलोरी आरसा.. कुणाला त्यात आदिम वेदनेची झलक दिसते.. कुणासाठी ते नक्षत्रांचे देणे असते..
एक मुलगी गाते,
रोज गाते.
एकसारखी ती गातेच आहे.
थांबत नाही.
वेळूचे बन असते ना, त्यात वेडे वारे सुटले म्हणजे कसे भणभणत, गुणगुणत, कुजबुजत आणि कधी नुसतेच वणवणत राहते-थकले, भागले, तशी ही गात राहिली आहे, असे माझ्या मानात नेहमी येते.
मध्यरात्री हळूच जाग यावी आणि हे वारे कसल्याशा ओल्या वेदनेने रडत असल्यासारखे मळमळ वाहतानाही मी एकदा ऐकले आहे.
रात्रभर मला काही केल्या झोप येत नव्हती. वाटत होते की हे वेडे वारे कोणती शहाणी, अनिवार वेदना वागवते आहे?
असाच प्रश्न मला या मुलीच्या गाण्याबद्दल पडतो. जरा कुठेशी दिवसाकाठी स्वस्थचित्त आणि स्वयंतुष्ट असावे तर या तटबंद्या फोडीत शुभ्र वस्त्र ल्यायलेल्या कोणी मोठय़ा मोठय़ा दु:खी डोळय़ांच्या जोगिणी वाऱ्यावरून तरंगत माझ्यापुढे येऊन माझी स्वयंतुष्टता जाळू लागतात.
ते तिचे स्वर असतात. वेदनेने आणि विरक्तीने भरलेले. मुबारक है तुम्हे खुशिया, मुझे गमसे मुहब्बत है.. अरे तुझी खुशी तुला लखलाभ, मी माझ्या वेदनेवरच प्रेम करते आहे.. माझी सखी माझी वेदना.
न ऐकण्याचा अट्टाहास लटका पडतो आणि आतडय़ांत तुटू लागते, बेचैनी झडपते.
खुशी पार धुवून जाते.
आणि ही पोर कुठे गडप झालेली असते.
ओले डोळे कोरडे करीत रागावून विचारावेसे वाटते, बाई ग, काय साधलेस?
मग आठवण होते एकदा मध्यरात्री रडताना ऐकलेल्या त्या एकाकी, वेडय़ा, भळभळत्या वाऱ्याची.
ते तरी काय साधते?
ते वाहते, तशी ती गाते.
यानेच माझी समजूत पडते.
एवढय़ाने सगळे थांबत नाही.
कधी उगीच जरासे बैचैन, विमनस्क असावे-एकटेच, तर ही येऊन विचारील, का रडतात? सांगा ना, का?.. तबाही तो हमारे दिल को आयी.. आप क्यू रोये? का तुमचे अश्रू? अहो बरबाद तर माझे काळीज झाले, मग सांगा तुम्ही का रडता? की हे माझेच अश्रू तुमच्या डोळय़ांमध्ये रडताहेत? सांगा ना तुम्ही का रडता? बघा हां.. हे आवरा, नाही तर आम्ही देखील..
खलास! सारा निग्रह खलास! रडविल्याशिवाय ही पोर मुळी स्वस्थ राहणारच नाही!.. सगळय़ा उरल्या सुरल्या स्वास्थ्यात शोक कालवून स्वत: आपल्या हळव्या हळव्या स्वरांचे उसासे काढीत कुठे तरी आली तशी बेपत्ता होईल!
अरे पण का? का हे?
रान आपल्या हुंदक्यांनी भारून निघून जाण्याचा वाऱ्याला काय अधिकार, पोरी?
उत्तर नसते, गाणाऱ्या वाऱ्याचे वेडे वाहणे आपले चालूच राहते.
कधी खूप व्यग्र असावे, कामातून डोके काढण्याला क्षणाचीही उसंत नाही. मेंदूत किडे असतात. नको असताना मुरडत, लचकत, ठुमकत, समेसमेवर जीव घेत हिच्या छुमछुमत्या स्वरांच्या नाचऱ्या गौळणी आल्याच व्यत्यय आणायला!
सखी री पीका नाम नाम न पूछो..
मै कैसे बताऊं, तो कहेते न जाऊ..
नको बताऊस, काही सांगूही नकोस, पण हे जीवघेणे, सगळे गद्य व्यवहार विसरून वेडेखुळे करणारे गाणे आधी बंद कर!
ही दुनिया व्यवहारी आहे. व्यवहार गद्यच असतात. तुझ्या गुंगवून टाकणाऱ्या स्वरांनी काही पोटे भरत नसतात! व्यवहारात माणसाने कसे शहाणे असावे लागते. वेड तुझे तुला ठीक आहे.
वाटता वाटताच सगळे वाटण्याच्या मुठीतून हरवते.
ही निघून गेलेली असते तेव्हा आत लाजऱ्याबुजऱ्या नववधूचे लोभसवाणे, मुग्ध विभ्रम हिच्या अवीट स्वरांना बिलगून चौफेर मांडलेले असतात आणि भोवती परका, नकोसा वाटणारा अपरिहार्य, रूक्ष, नीरस, व्यवहारी पसारा!
असा संताप येतो!
नव्हे, हिचा नव्हे, व्यवहाराचा.
तीच तर गंमत आहे, वाऱ्यावर का कुणी संतापत असते? त्यातून गाणाऱ्या वाऱ्यावर! आणि संतापले ना, तरी ते वेडे कुठे कुणाचा संताप मानते?
येऊन बिलगतेच, गुदगुदल्या करते. कानात कुजबुजते. भोवती गिरक्या घेते. गुणगुणत राहते, मैने रंग ली आज चुनरिया.. सजना तोरे रंगमें.
कसे विरघळायला होते. स्वरांच्या धुंद रंगात ‘चुनरिया’ सारखे चिंब व्हायला होते. थट्टा नव्हे.
तुझ्या रंगात माझ्या राजा, माझी ओढणी मी रंगवून घेतली आहे.. ओढणीच नव्हे, मीच कणाकणांत जशी रंगले आहे.. कणाकणांत.
ओ हो हो! कसला संताप नि काय!
मध्येच चमकून वाटते, मध्यरात्री एकदा रानातून रडत वाहत होते ते हेच धुंद वारे का?
वाऱ्याचा काही नियम नाही, हेच खरे. ते मुक्त!
येईल तिथून आणि येईल तसे येईल.
कधी उलट सुलट, गिरगिरते.
‘ओ सजना बरखा बहार आयी’ ची उल्हसित वर्दी देत ते धावत येईल आणि ‘लग जा गले फिर ये हसीन रात हो न हो’.. ची कातर क्षणभंगुरता, हुरहुर, उदासी गात जाईल.
ही रम्य रात्र.. ही अवीट, हवीहवीशी रात्र.. कुणास ठाऊक, पुन्हा येईल, न येईल..
पुन्हा गाठभेट पुढल्या जन्मी होईल, न होईल.. नको ती आश्वासने देणे, घेणे, ते फसणे, फसवणे.. नकोच.. लग जा गले.. जवळ ये.. खूप जवळ ये.. आताच ये..
तर असे हे वारे, गाणारे वारे. मुक्त. लहरी. बेभरवशाचे. कोवळे, हळवे, तसेच झोंबरे, दाहक. कधी निर्भर, आनंदी आणि कधी उदास, स्फुंदते, गूढ. अद्भुत गंधांनी भारून झपाटून कधी येणारे तर केव्हा बेचैनीने नुसतेच रिते उसासणारे. घुमणारे. क्वचित वादळी, आक्रोशते, कर्कश. कधी हवेहवेसे, तर केव्हा तितकेच नकोसे.
पण वारे येत राहिले आणि रानाला आता त्याची जशी सवय जडली आहे. रानातले वेळू त्याची वाट पाहतात.
आणि जेव्हा ते क्वचित येत नाही ना. तेव्हा आपल्या मुक्या मुखांनी सारे रान दाटून येऊन त्याला आळवीत असते.
हेही मी एकदा अपरात्रीच ऐकले आहे; श्वास आवरून.
तसे या गाणाऱ्या वाऱ्याने, या अप्रतिहतपणे गात राहिलेल्या मुलीचे आमच्या आयुष्यात झाले आहे.
कधी ती येत नाही. फार गरज असते पण तिचे स्वर उमटत नाहीत.
असे अगदी क्वचित होते. होते बाकी.
पण तेव्हा आमच्या आतले रान तिच्यासाठी दाटून येते आणि तिच्यासाठी तिचेच एखादे गाणे गाऊ लागते.
राजाकी आयेगी बरात.. नाहीतर, ओ सजना बरखा बहार.. किंवा
सपनोमें अगर मेरे तुम आओ तो सो जाऊं..
बीती हुई वो यादें.. हसती हुई आती है..
लहरोकें तऱ्हा दिलमें.. आती कहीं जाती है..
यादोंके तऱ्हा तुम भी.. आ जाओ तो सो जाऊं..
सपनो में अगर मेरे..
तुम आओ तो सो जाऊं..
तुम आ ओ तो सो जाऊं.. (शांता शेळके यांनी संपादित केलेल्या ‘लता’ या २५ एप्रिल १९६७ रोजी प्रकाशित झालेल्या पुस्तकातून साभार.)