अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

साम्ययोगाच्या अंतरंगात जाण्यापूर्वी, विनोबांचे अन्य काही पैलू आणि या दर्शनाशी संबंधित काही व्यक्तींचा परिचय हवा. साधारणपणे विनोबांच्या विद्वत्तेविषयी दुमत नसते मात्र या बुद्धिमत्तेला दुसरी एक बाजू आहे. ती आहे शरीरपरिश्रम. विनोबांची कोणतीही बौद्धिक कृती, किमान आठ तास शरीरपरिश्रम केल्यानंतरच घडल्याचे दिसते.

विनोबा मुळात आध्यात्मिक होते. अशा प्रवृत्तीचे लोक, शारीरिक कष्टांना नेहमीच महत्त्व देतात. विनोबांनीही अगदी लहानपणापासून तसे वर्तन ठेवले.

तरुणवयात त्यांना क्रांतिकारक बनायचे होते. यासाठी शरीर आणि मन सुदृढ हवे म्हणूनही शरीरकष्ट करणे गरजेचे होते. ते त्यांनी केले. अर्थात या शरीर परिश्रमांना व्यापक अर्थ मिळायचा होता. तो गांधीजींच्या सहवासाने मिळाला.

गांधीजींची आणि त्यांची पहिली भेट झाली ती शरीरश्रमापासूनच. अहिंसा आणि अन्य आध्यात्मिक शंका समाधानासाठी विनोबा कोचरब आश्रमात दाखल झाले. गांधीजींना त्यांनी पाहिले तेव्हा बापू भाजी चिरत होते. त्यांनी विनोबांनाही हे काम करायला सांगितले. विनोबांना घरकामाची फारशी सवय नव्हती. गांधीजींनी ही गोष्ट ताडली आणि तसे बोलूनही दाखवले. ही स्थिती अवघ्या वर्षभरात बदलली.

अध्ययनासाठी विनोबांनी आश्रम सोडला आणि ते प्राज्ञपाठशाळेत दाखल झाले. वाईच्या वास्तव्यात, दळणकाम, सूर्यनमस्कार, व्यायाम, पायी भ्रमंती आणि अन्य आश्रमीय व्रतांचे त्यांनी कठोर पालन केले. यासोबत विलक्षण वेगाने अध्ययनही सुरू होते. वर्षभरातील आपल्या कामाची तपशीलवार नोंद असणारे एक पत्र त्यांनी गांधीजींना पाठवले. ते पत्र वाचून बापू थक्क झाले. त्या महात्म्याची प्रतिक्रिया होती,

‘गोरखने मिछदर को हराया। साक्षात् भीम है।’

पुढे आश्रमात परत आल्यावर या शरीरपरिश्रमांना गती आणि दिशा अशी दोहोंची जोड मिळाली. विनोबा इतके कष्ट उपसायचे की लवकरच ते अगदी अशक्त झाले. त्यांची ही अवस्था पाहून गांधीजी त्यांना म्हणाले, ‘माझे तुमच्याकडे लक्ष नाही असे समजू नका. तुम्ही इतके परिश्रम कसे करता?’ देहाइतकेच आत्म्याचेही बळ असते, त्या जोरावर, अशा आशयाचे उत्तर विनोबांनी दिले. आठ दशकांच्या दीर्घ आयुष्यात विनोबांनी पदयात्री, विणकर, मेहतर, शेतकरी, शेतमजूर, दळणकाम आदी अंग मेहनतीची कामे केली. त्या संदर्भात प्रयोगही केले.

भावी जगाची क्षेत्रातील वाटचाल ही शरीर परिश्रम या व्रतावर आधारित हवी असा त्यांचा आग्रह होता. यातील ‘व्रत’ हा शब्द त्यांनी विचारपूर्वक वापरला होता. याचा अर्थ, नाईलाजाने नव्हे तर प्रत्येकाने अंग मेहनतीचे काम केलेच पाहिजे, असा आहे.

कमलनयन बजाज यांनी विनोबांचे वर्णन एका वाक्यात केले आहे. ‘त्यांची प्रज्ञा स्थिर आणि काया चंचल होती.’ कुंदरजी दिवाण त्यांना ‘जंगम विद्यापीठ’ म्हणत. यातील ‘जंगम’शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे ‘विद्यापीठ’ पेक्षा थोडा अधिकच.

तकलीवर सूत कातणारे असे विनोबांचे प्रकाशचित्र प्रसिद्ध आहे. त्याखाली शीर्षक आहे, ‘एक तकली बाकी तकलीफ़।’

Story img Loader