प्रदीप आपटे pradeepapte1687@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इसवीसन आता कवायतीचा कदम उचलून पुढे सरकेल, वर्षभर चाललेले हे सदरही समाप्त होईलपण इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल का?

या सदराचा आरंभ १ जानेवारी २०२१ रोजी झाला. आज ३१ डिसेंबर. असे सांगतात की अल्लादिया खाँ साहेब केसरबाईंना म्हणायचे, ‘अभी तक तूने मेरा पेट खाली नाही किया!’  हा विषय मला हेच सांगतो आहे. विषयाचा पसारा तर फार मोठा आहे. तो ध्यानात घेता तर यात हिमनगाचे टोकसुद्धा नाही.

या सदरातील बऱ्याच विषयांची व्याप्ती फार मोठी होती. त्यातल्या काही कर्तबगार व्यक्तींचे कर्तृत्व सांगायचे तर पुस्तकांचा ऐवज होईल. अनेक पैलू मोठे क्लिष्ट असतात. काही पैलू बहुसंख्य वाचकांनी पहिल्या परिच्छेदात जांभईने दाद देऊन रामराम ठोकावा असे असतात. काही तांत्रिक आणि वैज्ञानिक तपशिलांनी अतीव भारावलेले असतात. त्यांचे एकश्लोकी रामायण लिहिणे दुष्कर असते! वृत्तपत्रीय सदरांत ‘अपुरे पणही नलगे नलगे पस्तावाची पाळी’ अशी चुस्त लांबी साधणे भलते कसरतीचे असते. 

परदेशातून आलेले प्रवासी, व्यापारी, व्यापारी कंपन्यांचे अडत्ये, धर्मप्रचारक याच्या हिंदूस्तानाबद्दल काही पूर्वग्रही धारणा असायच्या. जे परिचित ते सहसा भले वाटते. अपरिचिताबद्दल साशंक भय असते. ज्यू, खिस्ती आणि मुसलमान श्रद्धावानांना मूर्तिपूजकांबद्दल कडवेपणा आणि कडवटपणा अंगी भिनल्यागत असे. प्रत्येकाची हिंदूुस्तानात येण्याची कारणेदेखील निरनिराळी असायची. त्या कारणांचा आणि उदिष्टांचा त्यांच्या आकलनावर प्रभाव पडत असे. भेट देणाऱ्यांचा वकूब, सायासांचा दर्जा आणि जिद्द वेगळी असे. यामध्ये फ्रेंच, डच, जर्मन यांचाही लक्षणीय सहभाग आहे. पण ब्रिटिश संपर्काचा घेर आणि खोली मोठी असल्याने त्यांचे दर्शन यात तोकडे आहे.

युरोपियनांना थंडीचा कडाका ठाऊक होता पण उन्हाची होरपळणारी होळी ठाऊक नव्हती! हाताशी कुठले नकाशे नसत. वाटा आणि दिशा गोंधळात पाडत. सैन्य फिरवायचे, व्यापाऱ्यांनी माल वाहतूक करायची तर त्याचा माग नीट नोंदलेला पाहिजे. त्या गरजेपोटी निराळी चोपडी लिहून छापली गेली. जॉन क्लुनेसने पश्चिम भारतातील फिरस्ती मार्ग आणि गावे वा जागांची सूची करून छापली आहे. (१८२६). रस्त्यांची जमीन कशी आहे, चढ-उतार कुठे कसे आहेत? नद्या, झरे, ओढे, विहिरी कुठे आहेत? सरपण आणि बैल घोडयांना गवत कुठे कितपत मिळते? नदी ओलांडायला सर्वाधिक उथळ उतार कुठे आहे? वसती कुठे कशी आहे? अशा कितीतरी तपशिलांचा हा वाटाडय़ा आहे. सैन्याचे अधिकारी आडवाटेने प्रवास करायचे. जंगलात, वनात छावणीतळ उभे करायचे. वनस्पती आणि वन्यप्राणी पक्षी त्यांच्या नजरेस यायचे. अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांची रीतसर दखल घेणारी नोंद केली आहे. त्यांची चित्रे काढली आहेत. मुद्दाम चित्रे बनवून घेतली आहेत. त्यांच्या बरोबरीच्या हिन्दी सैनिकांनीदेखील त्यांच्या बरोबरीने हा खटाटोप केलेला आढळतो. यातले अनेक जण स्वयंस्फूर्त चौकस निसर्गप्रेमी होते. त्या काळच्या लष्करी गडय़ांनी केलेल्या या नैसर्गिक इतिहास कार्याची झलक बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने प्रकाशित केलेल्या ग्रंथात आढळेल.

कानावर पडणाऱ्या भाषा अगदी निराळय़ा होत्या. त्यातले हेल, उच्चारांची लकब, बोलण्याचा ठसका निराळा होता. परंतु त्यातल्या काहींची जिज्ञासा मोठी चिवट दिसते. रॉबर्ट मॅककेब हा मुलकी अधिकारी आसाम भागात नेमला गेला. त्याची अर्थातच नागा समूहाशी गाठ पडली. त्याच्या अगोदर ब्रायन हॉजसन या अधिकाऱ्याने भारताच्या पूर्व सीमेवरील आदिवासी यावर एक टिपण लिहिले होते. विल्यम हंटरने आर्येतर भाषांचा तौलनिक शब्दकोश तयार केला होता. त्या सगळय़ाचे अध्ययन करीत मॅककेबने अन्गामी नागा भाषेच्या व्याकरणाची रूपरेखा लिहिली. त्याची चिनी भाषेशी तुलना करीत हा विषय हाताळला. त्या भाषेचा छोटा शब्दकोश आणि नमुना वाक्ये आणि वाक्-प्रचार शिकविणारे पुस्तक लिहिले. अशा जिज्ञासेचे आणखी प्रगत विराट रूप म्हणजे भारतीय भाषांचे सर्वेक्षण ( लिंग्विस्टिक सव्‍‌र्हे ऑफ इंडिया,१८९८). जी.ए. ग्रिअरसन हा भाषाविद्वान आयसीएस अधिकारी होता. १८८६ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय भाषा परिषदेत त्याने लिहिले प्रबंधामधले एक वाक्य मोठे उद्बोधक आहे. ‘भारतात गावात बोलली जाणारी भाषा आणि शाळेत किंवा न्यायालयात वापरली जाणारी भाषा कधीच सारखी नसते!’ त्याने अशा सर्वेक्षणाची कल्पना सुचविल्यावर ती सरकारने प्रथम साफ फेटाळली. पण त्याने आपला धोशा जारी ठेवला. सरकारी यंत्रणेच्या अधिकारी आणि नोकरदार वर्गामार्फत हे काम कसे साधता येईल याची त्याने योजना आखून सरकारला पत्करायला भाग पाडले. हे अवाढव्य काम आखले आणि त्याचे सविस्तर अहवाल प्रसिद्ध केले. एकाच भाषेच्या पोटात अनेक बोली आहेत. त्यात साधर्म्य आहे पण कानाला सहजी जाणवणारे उच्चारी वैधर्म्य आहे. ते कसे नोंदवायचे याचे तक्ते आधी दिलेले आहेत. उदा. त्या काळच्या बिहार प्रांतामधली (ज्यात आजच्या उत्तर-प्रदेशाचे जिल्हे येतात) सगळी भाषा म्हटली तर बिहारीच; पण मैथिली (किंवा तिरहुती) ची ढब निराळी आणि मगधी वा भोजपुरीची निराळी! वरपांगी एकाच लिपीरूपाने लिहिलेले अक्षर पण उच्चारी वेगळे! आणि उच्चार घसरला तर अर्थानेही वेगळे! हे भेदाभेद कसे बारकाईने नोंदायचे याची संथा तयार केली. बोली पोटभाषांसह एकूण ३६४ भाषा आपल्या आवाक्यात नोंदलेले हे सर्वेक्षण आहे. त्याचे भाषा समूहानुसार तयार केलेले ११ खंड होते. वसाहती सरकारने केलेले हे सर्वेक्षण नंतर भाषावार प्रांत रचनेच्या समस्येत कामी आलेच! दुसरे असे मोठे सर्वेक्षण १९८४ साली सुरू झाले. ती पाहणी अजून पूर्ण तडीस जायची आहे. त्याची पायाभरणी १८८६ सालच्या ग्रिअरसनच्या निबंधात आहे !

अन्न तर फारच निराळे असे. खाण्यापिण्याच्या बैठकी, भांडी, चवी, वेळा त्यांना अगदीच भिन्न भासत. आरंभी आलेल्यांच्या सोबत त्यांची कुटुंबे नसत. कालांतराने सहकुटुंब येऊन वसती केलेल्यांची संख्या वाढली. अधिकाऱ्यांच्या बायकांना ‘विलायती’ धान्ये, भाज्या, मसाले रांधवणीची भांडी या सगळय़ा निराळय़ा शैली आत्मसात कराव्या लागत. त्यातल्या काही गृहिणींनी येथेच बाजारहाट कशी करावी इथपासून हिंदूुस्तानात मिळणाऱ्या पदार्थामधून कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ करता येणे सोयीचे आहे अशी पुस्तके लिहिली आहेत. केन्नी हर्बर्ट रॉबर्ट ऊर्फ वायव्हेर्न नावाचा एक कर्नल मद्रास येथे अनेक वर्षे होता. तो आपल्या फावल्या वेळेचा छंद म्हणून पाककला आणि पाककृतींचा रियाज करीत असे. त्याने क्युलिनरी जॉटिंग्ज या नावाने एक पुस्तक लिहिले. त्याचे उपशीर्षक आहे ‘परदेशवासी अँग्लो इंडियन जनांसाठी आधुनिक युरोपीय आणि इंग्लिश पद्धतीवर बेतलेले तीस प्रकरणांचे सुधारित पाकशास्त्र आणि हिंदूस्तानातल्या आपल्या पाकगृहांसंबंधीचा निबंध’. भारतातील लोक सरासरीने काय आहार घेतात? गावातल्या वेगवेगळय़ा व्यावसायिक जातीजमातींचे दररोजचे खाणे कशा प्रकारचे असते? त्याचे रूप, आकारमान, शाकाहारी/ मांसाहारी लोकांचा आहार, त्याचे पोषणमूल्य किती असते? याची जाण यावी म्हणून शार्लोत वाइझर नावाची अमेरिकन संशोधक १९२५ साली मैनपुरी जिल्ह्यातल्या करिमपूर नावाच्या गावी कुटुंबकबिल्यासह येऊन राहिली. त्या वेळी पोषणविज्ञान रांगत्या अवस्थेत होते. प्रथिनांच्या प्रमाणानुसार शरीराची ठेवण, सुदृढपणा, मेहनती क्षमता बदलते, आजारांचे रूप बदलते असा होरा तेव्हा ब्रिटिश वैद्यांमध्ये प्रबळ होता. त्याचा लेखी उद्घोष सुरू झाला होता. मॅके नावाच्या वैद्यकाने मैनपुरी जिल्ह्यातील कैद्यांवर तशी मोजमापे घेणे सुरू केले होते.  या जोडप्याची वस्ती करिमपुरातच असे. असह्य उन्हाळय़ाच्या दिवसांत ते मैनपुरीमधल्या बंगल्यात येऊन राहात. उन्हाळा ओसरला की पुन्हा करिमपुरात मुक्काम हलवीत. त्यांनी अशी मुक्कामी वारी लागोपाठ १९३१ पर्यंत म्हणजे सहा वर्षे केली. महिन्यागणिक कोणत्या भाज्या, फळे, धान्ये किती खाल्ली जातात अशा तपशिलांचे जात जमातवार केलेली निरीक्षणे आणि मापे आहेत. आईबाप आणि तीन मुले असतील तर त्यांच्यासाठीची रोजची पोषणमात्रेची गरज किती याचे उष्मांक, प्रथिने, खनिजद्रव्ये असे विभागून अनुमान दिले आहे.

असे किती पैलू आणि समस्या सांगाव्या? आर. ई. एन्थोवेन या अधिकाऱ्याने ‘कास्ट्स अँड ट्राइब्ज इन बॉम्बे प्रोव्हिन्स’ असे सर्वेक्षणी खंड लिहिले. ‘गावगाडा’कर्ते त्रि. ना. आत्रेंची प्रेरणा हीच होती! चाळीस वर्षांपूर्वी प्रथम या विषयातत्या अनेक घडामोडींचा मला थोडाथोडा परिचय झाला. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना याविषयी औत्सुक्य आणि आस्था होती. विदेशी राजवटीचा तिटकारा असणे आणि स्वातंत्र्याचा कैवार असणे हे स्वाभाविक होते. पण आकलनावर त्या दोहोंची राहू केतूसारखी छाया होऊ नये हे पण उमगत होते. इतिहासात काय घडले, हे जाणण्यासाठी निरनिराळय़ा चाव्या असतात. एका चावीने सगळी रहस्ये उमगावी अशी चावी कधी नसते. अशी गुरुकिल्ली आपल्याला गवसल्याचा भास अनेक विचारवंतांनी भोगला आहे. कालांतराने या भासांचे दगड इतिहासाच्या वाटेवर दिसतातच. पश्चातबुद्धीने त्यातले काही मैलाचे वाटतात एवढेच.

व्यक्तीचा किंवा समूहाचा जाणता जागरूक ईप्सित उद्देश एक असतो. पण त्याचे अनेक परिणाम अनीप्सित असतात. ते अनेकदा अधिक खोल आणि व्यापक असतात. त्यांची हजेरी आश्चर्याचा सुप्त झरा असतो. समाजविज्ञानामध्ये अशा अभावित अनीप्सित परिणामांचा जॉन लॉक या लेखकाने नंतर अ‍ॅडम स्मिथने मोठा खल केला. इतिहासकारांना आणि भविष्यातील तरतुदींचे धोरण ठरविणाऱ्यांना हे सतत भान राखावे लागते. इत्यलम्!

(समाप्त)  लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vision of history historical personage famous personalities zws