प्रतापभानू मेहता

देशोदेशी आज ‘पुतिनवाद’ वाढीस लागलेला दिसतो. पुतिनवाद म्हणजे काय, तो कोठे वाढीस लागला आहे आणि त्यामागची कारणे काय आहेत?

आज जगापुढील सर्वात मोठे आव्हान व्लादिमिर पुतिन आहेत, असा समज होऊ शकतो, मात्र प्रत्यक्षात पुतिनवाद हा जगापुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. आज जगात ठिकठिकाणी अस्तित्वात असलेल्या राजकीय प्रवृत्तींचा हा समुच्चय आहे. भारत, फ्रान्स, हंगेरी, इस्रायल, चीन, तुर्कस्तान अगदी अमेरिकासुद्धा या समुच्चयाचे घटक आहेत. हे सर्व स्वत:ची स्वतंत्र ओळख असलेले देश असले, तरीही या देशांतील राजकीय शक्तींच्या प्रवृत्ती या पुतिन यांच्यापेक्षा फार वेगळय़ा नाहीत. जगाला धोका आहे, तो या प्रवृत्तींचा. भविष्यात पुतिन यांचा पाडाव झाला तरीही या प्रवृत्ती कायम राहतील. पुतिन यांच्या तत्त्वांचे प्रशंसक, एवढेच या सर्व देशांना जोडणारे एकमेव सूत्र नाही. अमेरिकेतले डोनाल्ड ट्रम्प, हंगेरीचे व्हिक्टर ऑर्बन, फ्रान्समध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या मारी ल पेन, हे सर्व जण पुतिन यांचे प्रशंसक आहेत. रशियाचे युक्रेनविषयक धोरण आणि तुर्कस्तानचे हितसंबंध यांच्यात मेळ नसला, तरीही रेसेप तय्यिप एर्दोगन हे पुतिन यांची प्रशंसा करत आले आहेत. भारताच्या रशियाविषयक भूमिकांवर नेहमीच शिष्टाचारांचे आवरण असते. तरीही राजकीय, संरक्षण आणि अर्थक्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये रशियाविषयी जी सहवेदनेची लाट उसळल्याचे दिसते, ती जेवढी प्रभावी, तेवढीच उबगवाणी आहे. इस्रायली राजकारण उजवीकडेच झुकलेले असते, याचा संबंध रशियातून आलेल्या स्थलांतरितांशी जोडता येतो. चीनला युक्रेन युद्धाच्या परिणामांची चिंता असली, तरीही त्यांचे आणि पुतिन यांचे लक्ष्य समान आहे. त्यामुळे पुतिन यांनी त्यांची भूमिका बदलावी, अशी चीनची इच्छा नाही.

वरवर पाहता, पुतिनवाद हे रशियाच्या इतिहासातून पुढे आलेले विवक्षित लक्षण भासू शकते. रशियाच्या विघटनामुळे निर्माण झालेली अपमानाची भावना आणि त्या भावनेच्या ठिणग्यांना वारा घालणारी हुकूमशाही वृत्ती यांचा हा परिणाम भासू शकतो. पण पुतिनवादाची मूलभूत तत्त्वे मात्र जगभर ठिकठिकाणी आढळतात. त्यापैकी सर्वात ठळकपणे दिसणारे वैशिष्टय़ म्हणजे पाश्चिमात्य विचारसरणीला असलेला विरोध आणि या विचारसरणीचा बीमोड करण्याची तीव्र इच्छा. वरवर पाहता यात फार काही गैर वाटणारही नाही. पण इथे ‘पश्चिम’ ही केवळ भौगोलिक किंवा सांस्कृतिक संकल्पना म्हणून पाहिली जात नाही. ती एक वैचारिक संकल्पना आहे. या संकल्पनेत उदारमतवाद अपेक्षित आहे. पुतिनवाद्यांनी पाश्चिमात्य विरोध आणि उदारमतवाद विरोधाची सरमिसळ केल्याचे दिसते. तुम्ही पाश्चिमात्यांचे विरोधक असाल, तर उदारमतवादाचेही विरोधक असता आणि तुम्ही उदारमतवाद्यांचा द्वेष करत असाल, तरच तुम्ही पाश्चिमात्यांचे विरोधक ठरता. ट्रम्प, ल पेन, ऑर्बन आणि पुतिन यांच्यात साम्य आहे, ते हे! त्यांना पाश्चिमात्य विचारसरणीलाही उदारमतवादापासून वाचवायचे आहे आणि तिची केवळ सांस्कृतिक किंवा वांशिक ओळख शिल्लक ठेवायची आहे. यातूनच हिंदूत्ववादात पाश्चिमात्य विचारांविषयी असलेला अंतर्गत विरोधाभास स्पष्ट होतो. ते पाश्चिमात्य देशांशी राजकीय संबंध ठेवतीलही, मात्र त्याच वेळी ते पाश्चिमात्यांच्या वर्चस्वालाही तेवढाच ठाम विरोध करतात. त्यांच्या दृष्टीने पाश्चिमात्यांचे वर्चस्व म्हणजे उदारमतवादी विचारांचे वर्चस्व!

‘पाश्चिमात्य’ या संकल्पनेचा उदारमतवादाशी संबंध जोडणे, ही वैचारिक जडणघडणीच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा चुकांपैकी एक चूक आहे. प्रत्यक्षात पाश्चिमात्य केवळ एका ठरावीक काळापुरते उदारमतवादी होते. उदारमतवादाचा पाया हा पाश्चिमात्य संस्कृतीत नव्हे तर मानवी स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेच्या आग्रहात रचला गेला आहे. पण पाश्चिमात्य विचारसरणी आणि उदारमतवादाची सरमिसळ करण्यात आल्यामुळे उदारमतवाद विरोधी वर्गाला वसाहतवाद विरोध आणि म्हणून पाश्चिमात्य विरोधाचा मुखवटा घालण्याची मुभा मिळते. मग उदारमतवाद नाकारणारी मंडळीही राष्ट्रनायक, राष्ट्रवीर वगैरे ठरू शकतात. प्रत्यक्षात, पाश्चिमात्यही वर्णभेद, राजेशाही, शोषणासाठी उत्तरदायी ठरतातच; पण ज्या दृष्टिकोनाविषयी आपण चर्चा करत आहोत, त्यात उदारमतवादाला असलेल्या विरोधाचा संबंध सोयीस्कररीत्या पाश्चिमात्य/ वसाहतवादी विचारांना विरोधाशी जोडण्यात आला आहे. यातून मूल्ये आणि तत्त्वांचा बुरखा पांघरून अधिकार गाजवण्याचा आणि वांशिक श्रेष्ठता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न दिसतो.

या सर्वातील आणखी एक सामायिक सूत्र म्हणजे, इतिहासाचे (भूतकाळाचे) आकर्षण. पीटर द ग्रेट यांच्या काळातील विशाल रशियाची पुनस्र्थापना करणे, हे पुतिन यांचे स्वप्न असेलही, पण अनेकांचे किंवा अल्पसंख्याकांचे वर्तमान उद्ध्वस्त करून आपल्या इतिहासाची पुनस्र्थापना करण्याची ही इच्छा काही नवी नाही. चीनसुद्धा त्यांची ‘मिडल किंग्डम’ ही ओळख पुनस्र्थापित करण्याची मनीषा बाळगतो. भारतातही अल्पसंख्याकांमध्ये दहशत पसरवून मुस्लीमरहित इतिहासाच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न होताना दिसतो. तुर्कस्तानला कायमच नवऑटोमनवादाचे आकर्षण आहे आणि हंगेरीतल्या निवडणूक प्रचारातही ‘ग्रेटर हंगेरी’चा गजर करून, त्या देशाच्या आजच्या कुरतडल्यासारख्या सीमा व्यापक करण्याचा उद्घोष सुरू होता.

आणखी एक साम्य म्हणजे वैरभाव उफाळून येण्याची प्रक्रिया गेल्या तीन दशकांतली आहे. १९८९ नंतरच्या (जागतिकीकरण, सोव्हिएत संघराज्य विभक्त होणे, जर्मनीचे एकीकरण आणि इराक युद्ध आदींची सुरुवात) काळाविषयीची उद्विग्नता यातून व्यक्त होते. रशियात साहजिकच हा विरोध उघड व्यक्त होऊ शकत नाही. आर्थिक सुधारणा आणि जागतिकीकरणाचे ते नवउदारमतवादी युग हा आज टीकेचा विषय ठरला आहे, परंतु ज्या देशांनी या काळात तुलनेने चांगली कामगिरी केली, त्या देशांमध्येही तत्कालीन राजकारणाविषयी उदासीनताच दिसते. आर्थिक सुधारणाही या दुबळय़ा राजकारणावरच आधारित होत्या. ही दुर्बळता दोन प्रकारे प्रतििबबित झाली. एक म्हणजे राज्याच्या भूमिकेचा ऱ्हास होत जाऊन ते आर्थिक विकासासारख्या उद्दिष्टांपुरतेच सीमित राहिले. हा विकासही आर्थिक नियंत्रणे हटवूनच केला जाऊ लागल्याने १९८९ नंतर राज्ययंत्रणा या संकल्पनेने ‘राष्ट्रीय अस्मितेला फुंकर घालत जनतेचे नियमन करणे’ या आदल्या काळातील मुख्य भूमिकेपासून फारकत घेतल्याचे दिसले आणि काहींच्या मते त्यातून मूलभूत राजकीय दुर्बलता प्रतिबिंबित होऊ लागली. स्वातंत्र्याच्या काही विशिष्ट कल्पनांच्या आहारी जात संस्कृती, समाजकारण आणि अर्थकारणावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती बळावली.

१९८९ नंतर लगेच निर्माण झालेल्या राजकीय संचरना आज ढासळताना दिसणे, हा काही अपघात नाही. मॅक्रॉन आधीच सौम्य उजव्या विचारसरणीकडे वळल्याचे फ्रान्समधील निवडणुकांच्या प्रचारात दिसले होते. मॅक्रॉन जिंकले हे ठीक, परंतु त्याहूनही लक्षणीय आहे तो मध्यममार्गी आणि डाव्या विचारांचा पाडाव. १९८९ नंतर ज्या उदारमतवादी डाव्या विचारांचा पगडा निर्माण झाला होता, त्यांचा फ्रान्स, इस्राइल, भारत आणि हंगेरीत झालेला ऱ्हास आश्चर्यजनक आहे. आज ती एखादी पुरातन विचारसरणी भासते.

तिसरे समान सूत्र म्हणजे हिंसेची सवय. आजवरच्या राज्ययंत्रणा वा समाज कधीच अहिंसावादी नव्हते हे खरे आणि काही प्रमाणात हिंसेला संस्थात्मक संदर्भातही स्थान आहे हेही खरे. पण पुतिनवादात मात्र हिंसेचे टांगती तलवार काय ठेवणे हे यशाचे द्योतक मानले जाते. हिंसक प्रकार, हिंसक परिणाम- ते देशांतर्गत असो वा आंतरराष्ट्रीय स्तरावरील- ते कधीही होऊ शकतात, या भीतीचा उपयोग राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी, वांशिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि ‘अपमानाचा वचपा काढण्या’साठी करून घेतला जातो.

या विचारसरणीत आपल्या भूप्रदेशाविषयी, आपल्या वांशिक रचनेविषयी दुरभिमान आहे. परकीयांविषयी आणि मिश्र लोकसंख्येविषयी संशयाची भावना आहे. यातील काहीसे विचित्र वास्तव हे, की या सर्व देशांत जॉर्ज सोरोस यांच्यासारख्यांची बडी गुंतवणूक आहे आणि मग ‘परकीय हस्तक्षेपाचे प्रतीक’ म्हणून जॉर्ज सोरोस यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी याच देशांमध्ये द्वेषभावना दिसते. ‘राष्ट्र प्रथम’ असे वारंवार म्हणणारी ही विचारसरणी नागरी समाज आणि राज्य यांच्यातील परस्पर नातेसंबंध पार पालटून टाकण्याची मनीषा बाळगते. असे नातेसंबंध, ज्यांत नागरी समाजाचे स्वतंत्र अस्तित्व नाकारण्यात आले असून, समाजाने राज्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करणे अपेक्षित आहे. ही विचारसरणी वैविध्य नाकारणारी, मवाळ भूमिकांचा तिरस्कार करणारी, स्वातंत्र्याची हेटाळणी करणारी आणि निष्ठुरतेला यश मानणारी आहे.

या परिस्थितीचा विचार करता, पुतिन यांचा पराभव होईलही, पण पुतिनवाद हा विचारसरणी म्हणून ठिकठिकाणी वाढीस लागला आहे. ही विचारसरणी गोऱ्यांच्या वर्चस्वाशी, फ्रेंचाच्या अंधभक्तीशी, इस्रायलच्या उजव्या वर्चस्ववादाशी, तुर्काच्या ‘ऑटोमन साम्राज्याच्या पुनरोदया’च्या स्वप्नांशी, चिनी आक्रमकतेशी आणि भारतीय जहाल हिंदूत्ववादाशी साम्य दर्शवते. पाश्चिमात्यांचा पाडाव हे जरी त्यांचे उद्दिष्ट असले, तरीही त्यांचा अंत:स्थ हेतू उदारमतवादाचा पाडाव करणे हा आहे.

Story img Loader