हे वाक्य वाचा- तुम्ही ज्या व्यक्तीला भेटू इच्छिता, तो व्यक्ती सध्या गावाला गेला आहे.
मराठी भाषेत ‘व्यक्ती’ हा शब्द स्त्री लिंगी आहे. (व्यक्ती – नाम, स्त्री लिंगी, एकवचनी, व्यक्ती – अ. व.) म्हणजे व्यक्ती शब्दाचे अनेकवचनही ‘व्यक्ती’ असेच आहे. जसे, मला आतापर्यंत खूप व्यक्ती भेटून गेल्या. त्या मला आवडल्या. सार्वनामिक विशेषण – ती (स्त्री ए. व.) त्या (स्त्री. अ. व.) व्यक्ती शब्द कर्तरी प्रयोगात कर्ता असेल, तर क्रियापदावर त्याचा अधिकार असतो. याचा अर्थ – वाक्यातील क्रियापद कत्र्याच्. लिंग, वचनाप्रमाणे असते. वरील वाक्य असे हवे – तुम्ही ज्या व्यक्तीला भेटू इच्छिता. ती व्यक्ती सध्या गावाला गेली आहे. ‘व्यक्ती’ हा शब्द र्पुंल्लगी वापरणे मराठी भाषेत अत्यंत चुकीचे आहे. एखाद्या पुरुषाच्या संदर्भात ‘व्यक्ती’ हा शब्द योजतानाही तो स्त्री लिंगीच वापरणे योग्य आहे. जसे ‘मी वळून पाहिले, एक व्यक्ती माझ्या पाठीमागे उभी होती. मग लक्षात आले, की ती व्यक्ती म्हणजे माझा मित्रच होता.’ मराठीत नामाच्या लिंग, वचन, पुरुष (प्रथम पुरुष- मी, आम्ही; द्वितीय पुरुष तू, तुम्ही, आपण; तृतीय पुरुष – तो, ती, ते इ.) यांना महत्त्व आहे. मराठी बोलताना व लिहितानाही ‘तो व्यक्ती’ हा प्रयोग करणे म्हणजे मराठी भाषेची आपणच केलेली चिरफाड होय.
आणखी एक वाक्य पाहा – ‘माझा मित्र रमेश त्याच्या कामात इतका व्यस्त आहे, की त्याला भेटणे शक्य होणार नाही,’
कामात व्यस्त हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. हिंदीच्या प्रभावामुळे आपण मराठीतले सोपे शब्द टाळून ‘व्यस्त’ या शब्दाचा चुकीचा वापर करतो. मराठीत कामात व्यग्र, गर्क, मग्न, तल्लीन, गुंग असे अनेक योग्य अर्थाचे शब्द आहेत. ते रूढ आहेत, असे असूनही ‘व्यस्त’ या शब्दाचा मराठीत अगदी वेगळा अर्थ असूनही तो का स्वीकारायचा? मराठीत ‘सम’च्या विरुद्ध व्यस्त, विषम हे आहेत. सम म्हणजे दोनाने भागता येणारी (२, ४, ६, ८ इ.) आणि व्यस्त म्हणजे उलट्या, विपरीत क्रमाचा (३, ५, ७ इ.). असेही वाक्य आढळते – श्रीमंती आणि सुख यांचे प्रमाण व्यस्त असते. व्यस्त या शब्दात पुढील अर्थही अनुस्यूत आहेत. वेगळा, भिन्न, उलट्या, विपरीत क्रमाचा. हे अर्थ नाकारायचे आणि ‘व्यस्त’ शब्दाचा हिंदी भाषेतील गर्क, मग्न आणि मराठीत अगदी वेगळा असलेला अर्थ स्वीकारायचा आणि चुकीची वाक्यरचना करायची, याला अर्थ नाही. मराठी भाषेची अशी दुर्दशा आपण मराठी माणसेच करतो, हे दुर्दैव आहे.
– यास्मिन शेख