युक्रेनवर युद्ध लादले गेल्यापासून तेथील भारतीय विद्यार्थी सुटकेसाठी धडपडत आहेत. कथा, कादंबऱ्या, चित्रपटांतून पाहिलेल्या युद्धकथांचा प्रत्यक्ष अनुभव घेत जीव मुठीत घेऊन युक्रेनची सीमा ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांचा आटापिटा सुरू आहे. अंग गोठवणाऱ्या थंडीत, उणे तापमानात दहा, पंधरा किलोमीटरची पायपीट करून सुरक्षित जागी जाण्यासाठी प्रयत्नही काही जणांना करावे लागले. नागपूरच्या वैष्णवी आणि स्वप्निल यांनी निरनिराळय़ा शहरांतून केलेला प्रवास कसा होता?
वैष्णवी वानखेडे
द्वितीय वर्ष एमबीबीएस, टर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी
युक्रेनवर रशिया हल्ला करणार असल्याची कुणकुण विद्यार्थ्यांना लागली होती. युक्रेनमध्ये सुमारे २५ हजार भारतीय विद्यार्थी शिकायला असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतात परत जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, विमान उपलब्ध नव्हते किंवा महागडय़ा तिकिटांमुळे विद्यार्थ्यांना परत येता आले नाही. त्यानंतर रशियाने युक्रेनच्या प्रीव्हाटबँक आणि ओश्चाडबँक या मोठय़ा बँकांवर सायबर हल्ला केला. त्यामुळे या दोन्ही बँकांचे सर्व व्यवहार एक दिवस ठप्प होते. आम्हा विद्यार्थ्यांचीही आता मायदेशी परत जाण्यासाठी धावपळ सुरू झाली. २२ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता आम्ही झोपेतून जागे झालो तेव्हा आकाशात पूर्वेकडे धुराचे लोट दिसले. नंतर बातम्यांमधून रशियाने कीव्ह, खारकीव्हमध्ये बॉम्बहल्ला केल्याची माहिती मिळाली. तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा धावपळ सुरू झाली. एटीएममधून पैसे काढून ठेवा आणि आठवडाभर पुरेल इतके खाण्याचे साहित्य घेऊन ठेवण्याच्या सूचना घरून देण्यात आल्या. २३ फेब्रुवारीला आम्ही येथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कामरान खान (झारखंड), प्रणागकुमार (केरळ) आणि मयांक शर्मा (उत्तराखंड) आणि मी असे चौघेजण टर्नोपिल रेल्वे स्थानकावर जायचे आणि २४ फेबुवारीच्या पहाटे तीन वाजताच्या उझरोदकडे जाणाऱ्या गाडीचे तिकीट काढायचे, असे ठरले. उझरोद हे स्लोव्हाकिया व युक्रेन या देशांच्या सीमेशी त्यातल्या त्यात जवळचे सर्वात मोठे शहर, पण इथून अर्धा-पाऊण तासावर चोप नावाचे स्टेशन आहे ते हंगेरीच्या जवळ पडते.
आम्ही वसतिगृहातून २३ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता टर्नोपिल रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघालो. बाहेर सर्वत्र अंधार पसरलेला होता. दोन किमीपर्यंत पायी जात असताना आठ युक्रेनियन सैनिकांनी रस्त्यात थांबविले. आमची चौकशी करून पुढे त्यांनीच आम्हाला रेल्वे स्थानकापर्यंत सोडून दिले. पण, गाडी उशिरा आल्याने युक्रेनच्या नागरिकांची स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. शेवटी सकाळी सहा वाजता आम्ही गाडीत बसलो आणि तेथून उझरोदला पोहोचलो. हा प्रवास आठ-नऊ तासांचा होता. यानंतर आम्ही तेथून चोप रेल्वे स्थानकावर गेलो. चोप येथून थेट हंगेरी देशात रेल्वेगाडी जाते. मात्र, ही गाडी मिळवण्यासाठी आम्हाला वीस तास रांगेत उभे राहावे लागले. मगच आम्ही चोप रेल्वेने हंगेरीच्या सीमेपर्यंत पोहचलो. तेथे भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना वसतिगृहात ठेवले. दुसऱ्या दिवशी विमानाने आम्हाला दिल्ली व नंतर नागपूपर्यंत सोडले.
हा संपूर्ण प्रवास फार संघर्षांचा होता. आताही युक्रेन बेचिराख होत असल्याच्याच बातम्या येत आहेत. पण आशा आहे की, युक्रेन पूर्वपदावर येईल आणि एमबीबीएस द्वितीय वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना पुन्हा युक्रेनमध्ये जाता येईल.
स्वप्निल देवगडे
एमबीबीएस प्रथम वर्ष, उझरोद नॅशनल युनिव्हर्सिटी
कीव्ह शहरापासून जवळपास सहासातशे किलोमीटर अंतरावर असलेल्या उझरोद नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये मी शिक्षणासाठी गेलो. यंदा पहिल्याच वर्षांत प्रवेश घेतल्याने हा संपूर्ण अनुभव नवीन होता. कीव्ह शहरावर रशियाने हल्ला करताच आम्हा सर्व विद्यार्थ्यांची भारतात परत जाण्याची गडबड सुरू झाली. विद्यापीठाने आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत केली. वसतिगृहामध्ये राहण्याची सुविधा असल्याने जेवण्याची चिंता नव्हती. मात्र, घरी परतण्याचे वेध लागले होते. कधी आणि कसे जाणार या चिंतेने सर्व विद्यार्थी व्यथित होते.
शेवटी युक्रेनमधील भारतीय दुतावासाने गूगल अर्ज तयार करून भारतात परत जाण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करायला सांगितले. हा अर्ज केल्यानंतर आम्हाला आमच्या विद्यापीठापासून जवळ असणाऱ्या हंगेरीच्या सीमेवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने आमच्यासाठी बसची सुविधा करून हंगेरीपर्यंत नेले. त्यानंतर हंगेरी येथील भारतीय दूतावासाने आम्हाला हंगेरी येथील बुदापेस्ट विमानतळावर पोहोचवले. तेथे भारतीय विद्यार्थ्यांना परत नेण्यासाठी विमानाची सुविधा होती. या विमानाने आम्ही दिल्लीपर्यंत परत आलो.
दिल्लीमध्ये आल्यावर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सदनमध्ये राहण्याची सोय केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने सर्व विद्यार्थ्यांसाठी विमानाची सुविधा उपलब्ध करून त्यांना नागपूर व अन्य शहरांमध्ये सोडून दिले. पण बुदापेस्टपर्यंतचा संपूर्ण प्रवास मुठीत जीव ठेवून करावा लागला.
शब्दांकन – देवेश गोंडाणे