वाचकाच्या सजगपणावर विश्वास ठेवणारी कथनशैली पंकज मिश्रा वापरतात, त्यांची ही नवी कादंबरी..
विबुधप्रिया दास
या कादंबरीच्या नायक-निवेदकाबद्दल ‘ही इज जस्ट अ लूजर’ (तो निव्वळ अपयशी/ पराभूत होणारा/ हरणारा आहे) असं कुणी म्हणेल, याची पुसटशीही कल्पना पंकज मिश्रांची ‘रन अॅण्ड हाइड’ ची पहिली वीसेक प्रकरणं वाचताना येत नाही. सुरुवातीला तर नाही म्हणजे नाहीच. कादंबरीचा नायक-निवेदक अरुण हा देवलीसारख्या रेल्वे-अवलंबी गावात, स्टेशनवर खाद्यपदार्थ विकणाऱ्याचा मुलगा आयआयटीपर्यंत पोहोचलेला आहे, मग तो हरणार कसा? पण ‘आमच्यासारख्या मध्यमवर्गीय पोरांना जणू आमच्या स्मरणशक्तीचा आणि एकाग्रतेनं शिकण्याच्या क्षमतेचा शापच असतो, मग आमचे आईबाप आमच्या भावंडांकडे दुर्लक्ष करून, आमच्याचवर आकांक्षा केंद्रित करतात’ असा सूर हा नायक पहिल्याच प्रकरणात एकदा लावतो. ते वाचताना मात्र, शंभरेक रुपयांत मिळणारी सकारात्मक जगण्याची पुस्तकं निराळी आणि पंकज मिश्रांची- ते स्वत: जरी ‘प्रथितयश लेखक’ असले तरी- ही कादंबरी निराळी, याची खूणगाठ पटते. कादंबरीचा नायक स्वत:ची गोष्ट सांगायला सुरुवातीपासूनच, ‘तुला असं वाटेल की..’, ‘कदाचित तुला कल्पना नसेल, पण..’ अशीही वाक्यं वापरतो. पण हा वाचकाशी थेट संवाद नाही. ही अख्खी कादंबरी जणू प्रदीर्घ पत्रासारखी आहे आणि हिंदी सिनेमातल्या ‘फ्लॅशबॅक’मध्ये जशी गाणीबिणी साग्रसंगीत नाचबीच असतात, तशी इथे त्या-त्या जुन्या क्षणी काय घडलं नि काय वाटत होतं याची वर्णनं आहेत. ती कधीकधी किती म्हणजे किती सूक्ष्म आणि किती क्षणिक होतात, हे पुढे पाहूच. पण ही कथनशैली सुरुवातीपासून असल्यामुळे, पत्र जिला लिहिलंय किंवा मनातल्या मनात जिच्याशी संवाद चाललाय तिच्यासाठी जे जे सांगणं महत्त्वाचं आहे, तेच प्रसंग निवडण्याचा अधिकार लेखक स्वत:कडे घेतो.
गोष्ट सुरू होते तेव्हा अरुणसह आयआयटीतले त्याचे सहपाठी असीम आणि बिरेन्द्र यांचीही व्यक्तिमत्त्वं उलगडत जातात. बिरेन्द्र दलित आहे. शिवा नावाचा वरच्या वर्गातला दादा पोरगा या बिरेन्द्रच्या जातीचा, आरक्षणाचा, ‘खालचे’पणाचा उद्धार करतच बिरेन्द्रला ‘रॅगिंग’चा भाग म्हणून शिसारी आणणारं काम करायला लावतो तेव्हा वाचकाला वाटतं की गोष्ट बिरेन्द्रच्या आत्महत्येची तर नसेल? पण बिरेन्द्र आयआयटीनंतर अमेरिकेला जातो आणि शिवाचाच भागीदार होऊन, प्रचंड पैसाही कमावतो. असीम आणि अरुणला मात्र आयआयटीमध्ये असतानाच साहित्याची गोडी लागते, असीम पत्रकार होतो आणि अरुण होतो अनुवादक. आता तिघांपैकी दोघे उरले. गोष्ट आता कुणाची? अरुण स्वत:च्या कुटुंबाबद्दल सांगू लागतो, गावातल्या ज्या नाल्यावर पोट मोकळं करायला जावं लागायचं त्याच नाल्याचा काही भाग दुपारच्या वेळी किती शांत, निवांत वाटायचा.. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी जरी ‘निसर्गसौंदर्य’ वगैरे घराच्या कळकट भिंतीवर वर्षांनुर्वष असलेल्या सीनसीनरीच्या कॅलेंडरवरच पाहिलं असलं तरी आंतरिक निवांततेचा प्रत्यय त्या नाल्यानं दिला, तर गावातल्या देवळाच्या पुजाऱ्यानं नको असताना अरुणच्या नको तिथं स्पर्श करून देवाधर्मावरला अरुणचा बालसुलभ विश्वासही उडवला, घरी आईचे कष्ट आणि वडिलांची गुरगुर यांपुढे आपण काहीही करू शकत नाही याचं भान येत गेलं.. असे तपशील. असलं हे गाव आणि घर सोडून अरुण दिल्लीतच छोटय़ा खोलीत राहातोय. अनुवादाची कामं करतोय. असीमनं पत्रकार म्हणून काश्मिरात धडक मारली, नाव कमावलं, मग एका नियतकालिकाचा संपादक झाला आणि आता तर, शिवा-बिरेन्द्र यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांच्या पाठबळावर स्वत:चंच नियतकालिक चालवतोय असीम.. ते नियतकालिकही साधंसुधं नाही, दरवर्षी ‘फेस्टिव्हल ऑफ आयडियाज’ हा बडय़ा देशी-विदेशी लेखक आणि सेलेब्रिटींना व्यासपीठावर चर्चेसाठी आणणारा महोत्सव वगैरे भरवणारं! असीम हा या टप्प्यावर पोहोचून लब्धप्रतिष्ठित होऊनही अरुणशी त्याची मैत्री कायम आहे, इतकी की अगदी ‘दहा हजार वेळा’ आपण घराबाहेर शरीरसुख मिळवल्याचंही असीम अरुणला सांगतोय.. इथंच वाचकाला शंका येते की असीमचं पात्र हे तरुण तेजपालवरून बेतलंय की काय.
असीमपासून अरुण काहीसा दूर होण्याचं कारण म्हणजे, हिमाचल प्रदेशातल्या कुठल्याशा रानीपूर गावात- शांतपणे राहाण्याचा आणि तिथूनच अमेरिकी प्रकाशकासाठी हिंदीतून इंग्रजीत अनुवादकार्य करण्याचा निर्णय अरुणनं घेतलाय. पंकज मिश्रा हेही १९९२ पासून सिमल्याजवळच्या मशोबरा इथं राहू लागले आणि आता त्यांचं वय ५३ असेल, हेच कादंबरीतल्या अरुणच्याही बाबतीत लागू पडतंय. अरुणचं रानीपूर सिमल्याच्याच जवळ आहे आणि तो इथं येणं आणि देशात हिंदूत्ववादी राजकारणाचं वारं सुरू होणं हेही एकाच वेळी घडलंय. ते वारं आता त्याला लोकांच्या वर्तनातून जाणवतंय. त्याचा घरमालक पंडित आणि ज्योतिषी आहे. पण जातींचा अभिमान तर आधीपासून होताच, म्हणून तर आपली ‘थोडीशी खालची’ जात बदलून वडिलांनी आपली जात ‘ब्राह्मण’ अशी करून घेतली (आणि रानीपूरच्या पंडिताकडे भाडेकरू होण्यात अडचण आली नाही) हे अरुणला माहीत आहे. देवली या खेडेगावी आता तो जातच नाही, पण अखेर गावचं ते घर विकून आईला इथं रानीपुरात आणण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो, कारण काय? त्याच्या वडिलांनी आईला टाकलंय. स्वत:च्या मुलीच्या लग्नानंतर, गावातल्याच दुकानदाराच्या विधवेशी सूत जुळवून ते तिच्याकडे राहायला गेलेत आणि दुकानही सांभाळतात! आईसह सामान आवरताना ‘ते’ हिमालयीन देखाव्याचं कॅलेंडरही तिथंच असतं. वाचकाला गोंजारत, नायकाचे संदर्भ वाचकाला जुळवू देऊन लेखक आईसह नायकाला रानीपुरात आणतो. त्या थंडीत अरुणला आईसाठी सिमल्याहून ओव्हरकोट आणावा लागतो.
ज्यांची आई ओव्हरकोट पहिल्यांदा घातल्यावर अवघडली, पण पुढे वयोमानानुसार गलितगात्र झाल्यावर घरात गाऊनच घालू लागली, अशा पहिल्या भारतीय पिढीचा अरुण हा प्रतिनिधी. किंवा असीमच्या तिखटमीठ लावलेल्या शब्दांत, ‘बैलगाडीतून प्रवास केलाय नि आता स्वत:ची कार आहे’ अशाही पिढीतला एक अरुण. अरुण मात्र रानीपुरात पायीच फिरतो. कधीकधी तिबेट सीमेपर्यंत बसनं जातो आणि मुद्दाम ट्रेकही करतो. दोन महिन्यांची फेलोशिप मिळाल्यावर लंडनला राहावं लागलं, तेव्हाही बसनंच येजा करायचा अरुण. अरुण याही पिढीतल्या साधेपणाचा प्रतिनिधी आहे आणि त्याउलट असीम काय, शिवा किंवा बिरेन्द्र काय.. सारेच ‘भारत उदय’ किंवा ‘शायिनग इंडिया’चे पैसा कमावणारे नि खर्चही करणारे प्रतिनिधी. आपली पिढी आपल्यासारख्यांची नाही, असीम हा तर तिचा अर्कच ठरेल, याची जाणीव अरुणला आहे. पण खेडय़ांमध्ये ही सुबत्ता नाही, तरीही भावनिक राजकारणाचा उन्माद मात्र खेडय़ांत आणि शहरांत सारखाच आहे, हेही अरुणला जाणवतंय. या उन्मादी जगाकडे तो तटस्थ साक्षीभावानं पाहातोय, त्या तटस्थपणात तुटलेपण नाही अद्याप तरी. समाजमाध्यमांचा वापर, ‘समाजमाध्यमांवर आपण सारेच प्रवक्ते’ हे असीमचं म्हणणं, या साऱ्याला अरुणचा साक्षीभाव लागू आहे.
पण ही स्थितीदेखील बदलते. त्याला ‘नायिका’ भेटते, तिचं नाव आलिया असं आहे, हे वाचकाला आदल्या दहा प्रकरणांमधून भरपूरदा वाचून माहीत असतं. तिलाच तर हे सारं मागचं सांगतोय अरुण. पण ती भेटल्यानंतरचंही सगळं पुन्हा तिलाच तपशीलवार सांगतो.. हे फारच फ्लॅशबॅक-तंत्री. पण हे तपशील अरुणच्या बाजूनं आहेत. म्हणजे कसे? तर ‘तुम्ही दोघे दिवाणखान्यात बसले असतानाच मी तुमच्या त्या व्हिलामधली बाथरूम कुठेय विचारलं. तिचाही कायापालटच या ब्रिटिशकालीन व्हिलाप्रमाणे तू करून घेतला होतास. चकचकीत कमोडवर उगाच शिंतोडे नकोत म्हणून मी बसून लघवी करण्याचा निर्णय घेतला. बसल्यावर निघालेले माझ्या पादण्याचे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचले तर नसतील ना?’ इतके तपशील! एरवी मुंबई आणि लंडनला राहणारी आलिया काही दिवस या नूतनीकृत बंगलीत लिखाणासाठी आली आहे. ती पुस्तक लिहितेय बिरेन्द्रबद्दल, तेही बिरेन्द्र आणि शिवा यांच्यावर सध्या अमेरिकेत करचुकवेगिरीचे आरोप होऊ लागल्यानं बिरेन्द्रचं बातमी-मूल्य अचानक वाढलंय, म्हणून. बहुधा हे काम असीममार्फतच तिला मिळालं. पण बिरेन्द्रचा सहपाठी म्हणून असीमची मुलाखत घेणं भागच. असीम इथं येऊन भेटून गेल्यावर अरुणचीही मुलाखत. याच दरम्यान अरुणचा शांतपणा आलियाला भावतो. ती ‘कुठेतरी उबदार ठिकाणी जाऊया’ म्हणते आणि लगेच अरुणही जर्जर आईला कुणा अर्धशिक्षित पोरसवदा कामवालीच्या भरवशावर सोडून आलियासह पाँडिचेरीत येतो आणि भोगासी सादरही होऊन पन्नाशीच्या उंबरठय़ावर, स्मरणीय कामतृप्ती मिळवतो. मुक्काम लांबतो. कामवाली पाच दिवसांत काम सोडून देते, आई सातव्या दिवशी जग सोडते. आता इतक्यात रानीपूरला परतायचंच नाही, आलिया इथूनच लंडनला जायचं म्हणतेय तिच्यासह निघायचं- नाहीतरी व्हिसा आहेच आपला- असं अरुण ठरवतो. मग पुढली प्रकरणं लंडनमध्ये घडतात. आलिया कशी आहे हे आलियालाच सांगण्याच्या मिषानं अरुण वाचकांना सांगू लागतो. तो इथं जरी आलियासह पाटर्य़ाबिटर्य़ाना जात असला तरी स्वत:देखील कमावतोय, स्वत:चे खर्च स्वत: करतोय. भारतीय मानवी हक्कवाल्या ज्येष्ठ वकिलीणबाई आता लंडनला स्थायिक झाल्यात. त्या एकदाच दीर्घकाळ दुपारच्या पार्टीत भेटल्यावरही त्यांचं निरीक्षण आणि त्यांच्या बौद्धिक दिमाखाचं वर्णन अरुण करतो तेव्हा वाचकाला आठवतं की असीमचीही वर्णनं अरुण अशाच प्रकारे करत होता.
अखेर, पाँडिचेरीतल्या पहिल्याच दिवशी अरुण आलियासह समुद्रकिनारी बसला असताना त्यानं माकडवाला आणि दोरीला बांधलेलं त्याचं माकड पाहिल्याचं का नमूद केलं, हे वाचकाला उलगडतं. लंडनमध्ये एका तिबेटी भिख्खूची प्रवचनं ऐकू लागलेला, ‘एम्प्टीनेस’ वगैरे पुस्तकं वाचणारा अरुण पाचसहा दिवसांच्या नियोजनाअंती लंडनहून दिल्ली-सिमलामार्गे थेट तिबेटी मठात म्हणजे ‘गोम्पा’मध्ये पोहोचतो. पंकज मिश्रांनी आजवर आठदहा पुस्तकं लिहिली असली तरी सर्वाधिक मागणी त्यांच्या ‘अॅन एन्ड टु सफिरग ’ या बुद्धविचारावर आधारित पुस्तकाला आहे, हे वाचकांना माहीत हवं! इथंच वाचकाला हेही कळतं की, असीम हे पात्र तरुण तेजपालवरूनच बेतलं असावं. असीमवर आरोप सत्तांतराच्या बरेच नंतर झालेत आणि आरोप करणारी कुणी शिक्षिका निनावी राहिली आहे, पण ‘मी सुद्धा’ म्हणणारी आलिया प्रसिद्धीच्या झोतात आलीय. आलियाचा जुना सहचर म्हणून अरुणचंही नाव बातम्यांत आहे. आलियाशी बोलण्यासाठी अरुणचा मोबाइल सुरू होतो, तिच्या बंद क्रमांकाशी संपर्क अशक्य असतानाच असीमच्या सहकाऱ्याचा फोन येतो आणि तो अरुणला असीम-आलियाच्या संभाषणाची जी ‘साउंड फाइल’ पाठवतो, त्यात अखेरीस ‘ही इज जस्ट अ लूजर’ हे वाक्य येतं, अरुणबद्दलच.
हारजीत या संज्ञेत राहू नये, एका अर्थी सारेच हरणार आहेत. जिंकू पाहणारे बिरेन्द्र, असीमही हरलेच. पण जगणं चुकणार नाही असं सांगणारी ही कादंबरी पंकज मिश्रांच्या ललितेतर पुस्तकांचा अर्क कथेमध्ये मांडणारी आहे. त्यामुळे ती महत्त्वाची. तिची कथनशैली वाचकाच्या सजगपणावर विश्वास ठेवणारी आहे, म्हणून ती वाचनीय. बाकी कुणाला त्यात काही राजकीय आशय सापडला, तर तो योगायोग मानावा!