अकादमी हा शब्द मराठीत चांगलाच रुळला असून साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, कर्नाटक संगीत अकादमी, संस्कृत अकादमी, विज्ञान अकादमी अशा विविध ठिकाणी तो वापरला जातो. शासन व्यवहारातही तो स्वीकारला गेला आहे. पण मुळात तो शब्द अ‍ॅकेडमी असा असून आपण त्याचे भारतीयीकरण केले आहे. ग्रीक भाषेतील या अ‍ॅकेडमी शब्दाची व्युत्पत्ती मोठी रोचक आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स येथे अ‍ॅकेडमस नावाचा एक राजघराण्यातील माणूस राहत होता. अथेन्सजवळच त्याची एक मोठी बाग होती व तिला अ‍ॅकेडमिया, म्हणजे अ‍ॅकेडमसची बाग असेच म्हणत असत. याच बागेत प्लेटो हा विख्यात ग्रीक तत्त्वज्ञ आपल्या शिष्यांना शिकवत असे, त्यांच्याशी चर्चा करत असे. प्लेटोच्या निधनानंतरही त्या बागेत विद्वानांच्या चर्चा होत राहिल्या. त्यामुळे काळाच्या ओघात अ‍ॅकेडमिया या शब्दाला ज्ञान देणारी, सखोल अभ्यासाला मदत करणारी संस्था असा आज जगभर सर्वत्र अभिप्रेत असलेला अर्थ प्राप्त झाला.     

अव्यवस्थित, बेशिस्त, गबाळग्रंथी कारभार जिथे असतो तिथे अनागोंदी माजली आहे असे आपण म्हणतो. कृ. पां. कुलकर्णी यांच्या ‘‘मराठी व्युत्पत्ति कोश’’ या विख्यात ग्रंथानुसार अनागोंदी (अन = हत्ती, गोंदी  = गल्ली) हा मूळ कानडी शब्द असून कर्नाटकातील अनेगुंडी या गावावरून तो आला आहे. हम्पीपासून पाच किलोमीटरवर असलेले अनेगुंडी हे गाव इतिहासप्रसिद्ध आहे. एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानीही इथे होती. पण मुस्लीम सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केल्यानंतर अनेगुंडीची सगळी रया गेली. अनेक छोटे राजे तिथे अंमल करू लागले. त्यांची आर्थिक स्थिती अगदी खराब होती पण धार्मिक पूजापाठ, सण शक्य तितक्या इतमामात साजरे करायचा ते प्रयत्न करत. जुना लौकिक कायम राखण्यासाठी अशा सणवारांवर आपण खूप खर्च करतो असे ते कागदोपत्री ठेवलेल्या हिशेबांत दाखवत. मग त्यासाठी तेवढे उत्पन्नही दाखवावे लागे. सगळेच आकडे कमालीचे फुगवलेले व बोगस असत. त्यावरून पोकळ जमाखर्चाला व एकूणच पोकळ दिखावा असलेल्या कारभाराला अनागोंदी कारभार म्हटले जाऊ लागले. पुढे त्याचाच अर्थविस्तार होऊन बजबजपुरी असाही अर्थ ‘अनागोंदी’ला प्राप्त झाला.        

– भानू काळे

bhanukale@gmail.com

Story img Loader