‘‘इस्लाम’ शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे शांती आणि दुसरा आहे ईश्वरशरणता. जो ईश्वराला शरण जाईल तो सत्कार्य करेल, सदाचारी असेल. भक्तीबरोबर सदाचार असणारच.’ – विनोबा ( सर्व धर्म प्रभूचे पाय )

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोबांनी समन्वयाच्या प्रवासात सेमेटिक धर्मांनाही कवेत घेतले. त्यातूनच कुराणसार, ख्रिस्त-धर्मसार आदी साहित्य निर्माण झाले.

‘गीता प्रवचने’ आणि ‘गीताई  चिंतनिका’ यामध्ये येशू, महंमद, बुद्ध अशा प्रेषितांचे, कुराण, बायबल, धम्मपद आदी धर्मग्रंथांचे उल्लेख मिळतात. या उल्लेखांच्या मागचे विनोबांचे चिंतन ठाऊक असेल तर गीताईच्या अध्ययनासाठी ते पूरक ठरते.

विनोबा आणि इस्लाम हे दोन शब्द उच्चारले की त्यांच्या ‘कुराण-सार’ची आठवण अपरिहार्यपणे होते. तथापि या दोहोंचा संबंध कुराण-सारच्या पलीकडे आहे.

विनोबा कुराणाच्या अध्ययनाकडे वळले त्यामागची कथा सांगितली जाते. एका मुस्लीम मुलामुळे त्यांनी कुराणाचे अध्ययन सुरू केले. आश्रमामध्ये काम करताना तो प्रार्थनेत सहभागी असे. आपल्यालाही प्रार्थना करता यावी आणि विनोबांनी आपल्याला कुराण शिकवावे अशी इच्छा, त्याने एक दिवस बोलून दाखवली. विनोबा तयार झाले, पण तोवर त्यांनी कुराणाचा इंग्लिश अनुवादच वाचला होता. या मुलाला कुराण शिकवण्यासाठी मराठी आणि अन्य भारतीय भाषांमधील अनुवाद त्यांनी पाहिले. यानंतर आपल्या शिरस्त्याप्रमाणे अभ्यास सुरू केला. पवनारमधील एक उलेमा, रेडिओवर प्रसारित होणारे कुराणपठण, शब्दकोश, अरबी भाषेचे उच्चारण आणि आवश्यक व्याकरण, कुराणावरची महत्त्वाची भाष्ये, अशी चौफेर अभ्यास मोहीम उघडून, २५ वर्षांनी म्हणजे १९६२ मध्ये ‘रूहुल्-कुर्आन’ची रचना त्यांनी केली.

कुराणाचे सार मांडणारे विनोबा, केवळ त्याचे अभ्यासक नव्हे तर उपासकही होते. सामान्य उलेमांनी चकित व्हावे असे त्यांचे कुराणपठण चाले. कुराण त्यांना जवळपास तोंडपाठ होते. काही आयता म्हणताना तर त्यांना अश्रू अनावर होत.

कुराणात सांगितले आहे, जगात ‘दीन’ एक आहे तर ‘मज़हब’ अनेक आहेत. सत्याच्या मार्गाने चालणे हा दीन (धर्म) आहे तर सत्याला अनुकूल जीवनासाठीचे विविध मार्ग म्हणजे मज़हब आहेत. अवघे मानव ‘उम्मत’ (समाज) म्हणून एक आहेत. भेद दिसतात ते चालीरीती आणि प्रथा-परंपरांमुळे, त्यांना विशेष महत्त्व देण्याची गरज नाही.

आपण कुराणातील गूढ अनुभव घेतले आहेत असे विनोबा म्हणत. त्यामुळेच कुराणातील अवघ्या चार तत्त्वांमध्ये त्यांना इस्लामचीच नव्हे तर सर्व धर्मांची समानता दिसली. ही चार तत्त्वे अशी –

जे लोक – (१) अल्लाला मानतात, (२) दया करतात, (३) एकमेकांना सत्यमार्गावर चालण्यात मदत करतात, (४) एकमेकांना धीर राखण्यात मदत करतात, फक्त ते लोक सुरक्षित आहेत.

नेहमीप्रमाणे विनोबांनी ही तत्त्वे आपल्या विचारांच्या अनुकूल केली.

‘सत्य- प्रेम- करुणा म्हणजे इस्लाम,’ असे त्यांना या धर्माचे ‘दर्शन’ झाले. दर्शन घ्यावे लागते. अभ्यास तिथवर जायला मदत करतो इतकेच. विनोबांनी या दोहोंवर अधिकार मिळवला होता.

– अतुल सुलाखे

 jayjagat24 @gmail.com