रानडय़ांच्या विचारसरणीला उदारमतवाद असे म्हटले जाते. त्यांचा हा उदारमतवाद फक्त मतापुरता मर्यादित नसून तो त्यांच्या स्वभावाचाही भाग बनला होता असे त्यांच्या चरित्रावरून निश्चितपणे म्हणता येते. रानडय़ांचा व्यापक आणि समावेशक विचार समजण्यासाठी चिपळूणकरांचा संदर्भ घ्यावा लागतो.
चारी बाजूंनी तेजोभंग होत असलेल्या ब्राह्मणांना आत्मविश्वास देऊन स्वातंत्र्य लढय़ासाठी उभे करण्याचे काम विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला या सर्वस्वी वाङ्मयीन माध्यमातून केले. त्यांनी त्यासाठी भाषा हेच माध्यम वापरले. मराठी भाषेवर व समकालीन कर्त्यां पुरुषांच्या विचारपद्धतीवर त्यांनी जो प्रभाव पाडला, त्यावरून निदान १९२५- म्हणजे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या निधनापर्यंतच्या कालखंडाला चिपळूणकरयुग म्हणण्यात येते. चिपळूणकरांचे निबंध वाचताना वाचकाची एक किमान भाषिक तयारी असावी लागते व ती तेव्हाच्या काळात ब्राह्मणादी उच्च जातीयांचीच झाली होती. आपण काय लिहीत आहोत आणि कोणासाठी लिहीत आहोत याची चिपळूणकरांना स्वच्छ कल्पना होती. त्यामुळे बहुजन समाजातील मंडळी त्यांच्या लेखनाकडे वळली असती तरच नवल.
अर्थात चिपळूणकरांचे लेखन या सर्वसाधारण वर्गातील लोकांना वाचायला मिळाले नाही म्हणून त्यांचे फार काही बिघडले अशातला भाग नाही. कारण त्यांना त्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्या भाषेत बोलू शकणारा नेता भेटला. या नेत्याचे नाव जोतिराव फुले. जितके भाषिक भान चिपळूणकरांना होते, तितकेच ते फुल्यांनाही होते. आपण कोणासाठी लिहीत आहोत, हे एकदा निश्चित झाले की कसे लिहायचे हे आपोआपच समजते. माळी, कुणबी, महार अशा शूद्रातिशूद्र जातींसाठी आपण लिहीत आहोत असे जोतिरावांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पोवाडय़ाच्या प्रस्तावनेतच जाहीर करून टाकले. इतकेच नव्हे, तर शब्दांची निवड करतानासुद्धा या लोकांना कळतील असे सोपे व सुटसुटीत शब्द मुद्दाम वापरले असेही फुले सांगतात. फुल्यांच्या एकूणच लेखनाचा बाज हा असाच राहिल्याचे दिसून येते. फुल्यांचे इंग्रजी लेखन वाचताना त्यांची भाषिक जाण कोणालाही दिसून यावी आणि ती विचारात घेतली तर त्यांनी ज्या प्रकारची मराठी लिहिली त्यापेक्षा वेगळ्या प्रकारची मराठी ते लिहू शकले असते याबद्दलही काही संशय उरू नये. तथापि त्यांनी लिहिले तसेच लिहावे हा त्यांनी जाणूनबुजून घेतलेला निर्णय होता. त्यांना ज्या लोकांशी संवाद साधायचा होता, ते लोक ज्या प्रकारची भाषा वापरायचे तीच भाषा फुल्यांनी वापरावी हे अगदी स्वाभाविक आणि व्यवहाराला धरून होते. तसेच त्यांच्या भाषेतील व्याकरणदोषांवर बोट ठेवून त्यांच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष करणे हा शास्त्रीबुवांचा पवित्राही अपेक्षितच होता.
जोतिरावांची भूमिका किती सुसंगत होती याचे आणखी एक गमक आहे. आपल्याच भाषेला ‘अशुद्ध’ म्हणून कोणी नाक मुरडत असेल तर त्याची फुल्यांनी पर्वा तर नव्हतीच. पण इतकेच नव्हे तर आपल्याला कोणी ग्रंथकार किंवा साहित्यिक म्हणावे आणि अशा ग्रंथकारांच्या वर्तुळात आपल्याला मानाचे स्थान किंवा पान मिळावे अशी आकांक्षाही त्यांनी कधी ठेवली नाही. न्या. रानडे यांनी भरवलेल्या ग्रंथकारांच्या संमेलनासाठी सन्मानपूर्वक मिळालेल्या निमंत्रणाचा अव्हेर करून त्यांनी या बाबतीतील आपला नि:स्पृह बाणा दाखवून दिला असेच म्हणावे लागते.
अर्थात या संदर्भात चिपळूणकर आणि रानडे यांना एका मापात मोजता येत नाही हेही स्पष्ट केले पाहिजे. संमेलनाचे कर्तेधर्ते जर चिपळूणकर असते तर त्यांनी फुल्यांना मुदलात निमंत्रणच पाठवले नसते. भाषा बिघडवणाऱ्या माणसाला अशा संमेलनात बोलवायचेच कशाला? त्यांना ग्रंथकार म्हणून मान्यता दिली तर त्यांच्या अशुद्ध भाषेला प्रतिष्ठा प्राप्त होऊन भाषा आणखी बिघडण्यास प्रोत्साहन मिळेल, अशा प्रकारचा युक्तिवाद चिपळूणकरांनी केला असावा. रानडे वेगळ्या प्रकारचे गृहस्थ होते. फुले वगैरे सत्यशोधकांची चळवळ सरळसरळ आपल्याच जातीच्या विरोधातील आहे हे समजत असूनही रानडे सत्यशोधक समाजाच्याच झेंडा मिरवणुकीत सामील झाले होते आणि बहुधा फुल्यांच्या तीव्र प्रतिक्रियेचा अंदाज असूनही त्यांनी ग्रंथकारांच्या सभेस फुल्यांना निमंत्रण पाठवायच्या धोका पत्करला!
रानडय़ांच्या विचारसरणीला उदारमतवाद असे म्हटले जाते. परंतु, त्यांचा हा उदारमतवाद फक्त मतापुरता मर्यादित नसून तो त्यांच्या स्वभावाचाही भाग बनला होता असे त्यांच्या चरित्रावरून निश्चितपणे म्हणता येते. समाजाच्या धुरीणत्वाची क्षमता आपल्या जातीकडे असली तर त्याचा अर्थ इतर जातींनी पुढे येण्यासाठी धुरीण जातीच्या लोकांनी काहीच करू नये असा विचार रानडय़ांच्या स्वप्नातही आला नसता. गंगारामभाऊ म्हस्के यांनी मराठा जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काढलेल्या डेक्कन मराठा सोसायटीच्या मागे भक्कमपणे कोणी उभे राहिले असतील तर ते रानडेच.
अर्थात, रानडय़ांची नजर यापलीकडच्या स्तरापर्यंत पोहोचत होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानातील सत्तांच्या स्पर्धेमध्ये हस्तक्षेप करून हिंदुस्थान बळकावण्याचे ठरवल्यावर त्यासाठी तिला लष्करी सामर्थ्यांची गरज भासू लागली. ब्रिटिशांच्या मधून एवढे सैन्य उभारणे केवळ अशक्य होते. एतद्देशीय लढाऊ जातीचे लोक स्थानिक सत्ताधाऱ्यांकडे नोकरी करणे अधिक पसंत करणार हे उघड होते. अशा वेळी ब्रिटिशांनी येथील अस्पृश्य जातींमधील लोकांची भरती करून आपले लष्करी सामथ्र्य वाढवले. बरे, अंगी क्षमता असतानाही केवळ जातिव्यवस्थेतील र्निबधामुळे ज्याची प्रगती खुंटली होती, अशा वर्गाने ब्रिटिशांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ उठवणे अगदीच स्वाभाविक व समर्थनीय होते आणि त्याप्रमाणे घडलेसुद्धा. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध झालेल्या लढाया ब्रिटिशांनी अस्पृश्यांच्या पलटणींच्या जोरावर जिंकल्या. मग ती लढाई अर्काटची असो अथवा कोरेगावची.
पण एकदा हिंदुस्थानची सत्ता हातात आल्यावर ब्रिटिशांनी आपले धोरण बदलले. आता ते प्रस्थापित सत्ताधारी बनल्यामुळे त्यांना येथील पारंपरिक लढाऊ व जातीचे सवर्ण सैनिक मिळणे शक्य झाले. या नव्याने भरती केल्या जाणाऱ्या सवर्ण शिपायांना अस्पृश्य सैनिकांची अडचणच वाटत असणार, हे जातिव्यवस्थेचे कोपरेकंगोरे माहीत असणाऱ्यांना वेगळे सांगायची गरज नाही. या बदलत्या अनुकूल परिस्थितीत ब्रिटिशांनी अस्पृश्यांची लष्करभरती थांबवली. खरे तर त्यांचा हा कृतघ्नपणाच होता. परंतु, सत्ताकारणात कृतज्ञतेला किंमत नसते हेच खरे.
ब्रिटिश लष्करात उपलब्ध होणाऱ्या संधीमुळे सर्वच्या सर्व नसल्या तरी लक्षणीय संख्येतील अस्पृश्यांची स्थिती सुधारू लागली होती. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाऊन लढलेले ब्रिटिश लष्करातील सुभेदार होते एवढे सांगितले तरी पुरे.
ब्रिटिश लष्करातून निवृत्त झालेले असेच एक सुभेदार होते गोपाळबुवा वलंगकर. गोपाळबुवा स्वत: वारकरी सांप्रदायिक व कीर्तनकार होते. ब्रिटिशांनी थांबवलेल्या लष्करभरतीमुळे ते अस्वस्थ झाले. काही तरी करून ही प्रक्रिया परत सुरू व्हावी, असे त्यांना वाटले. याही वेळी त्यांच्या मदतीला आले ते न्यायमूर्ती रानडेच. रानडय़ांनी आणि वलंगकरांनी मिळून ही लष्करभरती परत सुरू करावी असा अर्ज ब्रिटिश सरकारकडे केला. स्वत: बाबासाहेब आंबेडकरांना न्या. रानडे यांच्याविषयी नितांत आदर होता. त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे रानडय़ांनी वलंगकरांना केलेली मदत हे होय.
अस्पृश्य समाजासाठी या मुद्दय़ाचे महत्त्व किती होते हे परत बाबासाहेबांच्याच आधारे सांगता येईल. बाबासाहेबांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून अनेक वेळा सरकारने थांबवलेली ही सैन्यभरती परत सुरू करावी, या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे. इतकेच नव्हे तर ब्रिटिशांच्या ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या कृतघ्न व्यवहारवादी वृत्तीवर टीकाही केली आहे. ही टीका करताना बाबासाहेब ब्रिटिशांना वारंवार कोरेगावच्या लढाईची आठवण करून देतात. कोरेगावच्या लढाईत ब्रिटिशांनी मराठय़ांचा पराभव केला. पण ते त्यांना शक्य झाले ते केवळ सैन्यामधील लढाऊ महार वीरांच्या जोरावर. या लढाईत पडलेल्या वीरांची नावे कोरेगावच्या भीमा नदीच्या तीरावरील स्मृतिस्तंभावर कोरली आहेत. त्यांच्यात आधिक्य अर्थातच अस्पृश्य मानल्या गेलेल्या सैनिकांचेच आहे. बाबासाहेबांनी कोरेगावच्या या स्तंभाला अस्पृश्यांच्या इतिहासातील एक मानबिंदू बनवले. आजही प्रतिवर्षी महाराष्ट्रातून आंबेडकरांचे हजारो अनुयायी कोरेगावाला येऊन या वीरांना आदरांजली वाहतात.
मुद्दा चिपळूणकर आणि रानडे हा होता. रानडय़ांचा व्यापक आणि समावेशक विचार समजण्यासाठी चिपळूणकरांचा संदर्भ घ्यावा लागला. सत्यशोधकांच्या झेंडा मिरवणुकीत सामील होणारे रानडे कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठीही आले असते, याविषयी मला शंका नाही. त्यांनी या घटनेकडे व्यापक मानवतावादाच्या परिप्रेक्ष्यातून पाहिले असते. इंग्रजांना मदत करण्याचाच मुद्दा असेल तर शहाण्यासुरत्या प्रस्थापित राघोबादादाने त्यांना आधी निमंत्रण देऊन घरात घेतले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले असते. आणि मग कायमची उपेक्षा आणि अवहेलना वाटय़ाला आलेल्या अस्पृश्यांना दोष का द्यावा, असा प्रश्नही त्यांनी विचारला असता. चिपळूणकरांच्या राष्ट्रीय बाण्यात बहुधा हे बसले नसते.
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’हे सदर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा