धर्म, विद्या आणि प्रशासन यामध्ये इंग्रजी आमदानीतही आपले वर्चस्व अबाधित राखण्यात यशस्वी ठरलेल्या ब्राह्मणांवर चारी बाजूंनी टीकेचा मारा होऊ लागला.  कालांतराने विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेतून  ख्रिस्ती मिशनरी, प्रार्थना समाजिस्ट, सत्यशोधक, जोतिराव फुले आणि मुख्य म्हणजे लोकहितवादी यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. यामुळे ब्राह्मणवर्गात एक क्रांतीच घडून आली, असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही..
व्यवहारात लिहिताना किंवा बोलताना आपण ‘समाज’ हा शब्द वापरत असलो, तरी संपूर्ण समाजाविषयी आपण क्वचितच बोलत असतो. बऱ्याच वेळी आपल्याला समाजाचा एखादा घटक अथवा समूह अभिप्रेत असतो. कधी वर्ग, कधी वंश, कधी जात तर कधी राष्ट्र, तर कधी आणखी काही. त्यामुळे समाजासंबंधीची बरीच विधाने अर्थसंकोच करून त्या त्या गटांपुरती मर्यादित करून घ्यावी लागतात. त्यासाठी आपल्याला त्या विधानांचे विश्लेषण करून त्यांना त्यांच्या विशिष्ट देशकाळाच्या चौकटीत ठेवावे लागते, जसे महात्मा जोतिराव फुले यांच्या शेतक ऱ्यांच्या दु:स्थितीविषयक विधानांना.
शेतक ऱ्यांविषयक उपरोक्त विधाने वरकरणी व्यवसायाशी संबंध व म्हणून वर्गीय वाटत असली, तरी त्यांना त्यांच्या संदर्भ चौकटीत ठेवून त्यांचा जातीय आशय अधोरेखित करता येतो. याच प्रकारचे विश्लेषण इतर विचारवंतांच्या संदर्भातही करता येण्यासारखे आहे.
इ. स. १८१८ साली ब्रिटिशांनी मराठय़ांचे राज्य जिंकून बाजीराव पेशव्याला ब्रह्मावर्त किंवा बिठूर येथे पेन्शनवर पाठवले व सातारा येथील गादीवर छत्रपती प्रतापसिंहांची योजना केली. प्रतापसिंह त्यापूर्वीही छत्रपती होतेच. परंतु, बाजीरावाने त्यांची छत्रपती म्हणून प्रतिष्ठा न राखल्याने ब्रिटिशांनी आपण बंडवाल्या स्वामीद्रोही बाजीरावाची हकालपट्टी करून प्रतापसिंहांची पुन:स्थापना करीत आहोत असा देखावा केला. तो त्यांच्या मुत्सद्देगिरीला साजेसाच होता. शिवाय त्यातून महाराष्ट्रातील ब्राह्मण-मराठा वादही प्रकाशित होत होता. भविष्यकालीन राजकारणात तो प्रभावी ठरणार होता.
मराठय़ांचे जे राज्य ब्रिटिशांनी ताब्यात घेतले, ते महाराष्ट्रातील सर्व जातिजमातींसाठी कमी-अधिक प्रमाणात लाभदायक ठरले होते, यात शंका नाही. सातारकर शाहू महाराजांच्या काळापासून हे राज्य उत्तराभिमुख होऊन त्याचे एका परीने साम्राज्य झाले. ते सांभाळण्यासाठी अनेक माणसांची गरज होती व ती भागवणाऱ्या माणसांना त्याचा फायदाही होत होता. असे असले तरी त्याचे खरे लाभार्थी ब्राह्मण आणि मराठा या दोन जातींमधील लष्करी व मुलकी व्यवसाय करणारे लोक होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हे साम्राज्य बुडाल्यानंतर अधिकारारूढ झालेल्या ब्रिटिशांनी मराठे लढवय्या जातीचे असूनही त्यांना सैन्यात घेणे टाळले. तो धोका त्यांना पत्करायचा नव्हताच. उत्तरेतून व दक्षिणेतून सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या भाडोत्री सैनिकांवर त्यांचे भागण्यासारखे होते. प्रशासन चालवण्यासाठी त्यांना इंग्रजी जाणणारी कारकूनवजा माणसे पाहिजे होती. अर्थात, येथील लोकांसाठी इंग्रजी ही नवी भाषा होती. तेव्हा ती भाषा जे शिकतील त्यांना इंग्रजांच्या शासनात पहिल्यांदा प्रवेश मिळणार हे उघड होते. भारतीय पातळीवर हे भाग्य पहिल्यांदा बंगालीबाबूंना लाभले. तेदेखील १७५७ पासून म्हणजे महाराष्ट्रातील लोकांच्या ६० वर्षे अगोदर. त्याचा परिणाम म्हणून बंगाली लोकांनी इंग्रजांचे अनुकरण करीत ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या इतर देशबांधवांना बऱ्यापैकी मागे टाकले. जातिनिहाय विचार करायचा म्हटले तर या प्रक्रियेत बंगालमधील ब्राह्मण, कायस्थ आणि वैद्य या भद्र जाती आघाडीवर होत्या. लष्करी पेशात ही मंडळी कधीच नव्हती. त्यामुळे ब्रिटिश सैन्यात त्यांचे प्रमाण जवळपास शून्यावर.
महाराष्ट्रात ही प्रक्रिया १८१८ नंतर सुरू झाली. मुंबईत ती आधीच जारी असल्याने तेथील सारस्वत, पाठारे प्रभू, कायस्थ प्रभू वगैरे ब्राह्मणेतर जाती (ब्राह्मण सारस्वतांना पूर्ण ब्राह्मण मानीत नसल्यामुळे एवढय़ापुरता, सोयीसाठी त्यांचा समावेश ब्राह्मणेतरात केला आहे) आघाडीवर होत्या.
मुंबई शहरात ब्राह्मणांचे प्रमाण कमी व तेथील इंग्रजी वातावरणामुळे त्यांचे वर्चस्वही कमी अशी परिस्थिती होती. उर्वरित महाराष्ट्रात मात्र असे नव्हते. त्याचा फायदा ब्राह्मणांना मिळाला असल्यास नवल नाही. शिकू शकणाऱ्या इतर प्रतिस्पर्धी जातींचे प्रमाण कमी आणि राजसत्तेत भागीदार असलेल्या दुसऱ्या भिडूला म्हणजेच मराठय़ांना शिक्षणात स्वारस्य कमी. यामुळे इंग्रजी शिक्षण घेणाऱ्यांत ब्राह्मण अग्रेसर राहिले व त्यांनी इंग्रजांचे प्रशासन व्यापून टाकले. जोतिराव फुले यांच्या ब्राह्मणांवरील टीकेत हा मुद्दा वारंवार डोकावतो.
आपल्याला या वर्चस्वाची चर्चा करायची नाही. धर्म, विद्या आणि प्रशासन यामध्ये इंग्रजी अमदानीतही आपले वर्चस्व अबाधित राखण्यात यशस्वी ठरलेल्या ब्राह्मणांवर चारी बाजूंनी टीकेचा मारा होऊ लागला. त्यात ख्रिस्ती मिशनरी आघाडीवर होते. ब्राह्मण हे हिंदूंचे धर्मगुरू असल्यामुळे ब्राह्मणांना नामोहरम केल्यास इतर हिंदूंचे धर्मातर सोपे होईल, असा मिशनऱ्यांचा हेतू होता.
पण ब्राह्मणांवर जास्तीत जास्त टीका झाली ती एका ब्राह्मणाकडूनच. त्यांचे नाव लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. एका अर्थाने लोकहितवादींनी नंतरच्या फुले-आंबेडकरांचे काम सोपे केले. लोकहितवादींच्या एकूणच ब्राह्मण समीक्षेचा संदर्भ साररूपाने फुले वाङ्मयात येतो तो एका ओळीतून असा-
‘ब्राह्मणाची मति अतिअमंगळ। कथिली गोपाळ देशमुखे।।’
पुढे डॉ. आंबेडकरांनीही लोकहितवादींच्या ‘शतपत्रां’चे पुनर्मुद्रण आपल्या ‘बहिष्कृत भारत’ या पत्रातून केले हे येथे मुद्दाम नमूद करायला हवे.
ब्राह्मणांवर टीका करणारा तिसरा वर्ग म्हणजे जोतिराव आणि त्यांचा सत्यशोधक समाज. या वर्गाने ब्राह्मणांच्या सर्व क्षेत्रीय वर्चस्वावर आक्षेप घेतला आणि कीर्तन, तमाशा, व्याख्यान, पत्रकारिता या सर्व माध्यमांमधून टीकेचा मारा केला. धर्माच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या अवनतीला हेच जबाबदार आहेत, अशी भूमिका घेतली. ही भूमिका खरे तर लोकहितवादींच्या भूमिकेचाच विस्तार होय.
पण हे टीकाप्रकरण येथेच थांबले नाही. न्या. रानडे व डॉ. भांडारकर प्रभृतींच्या प्रार्थना समाजाची ब्राह्मणांवरील टीका सत्यशोधकांइतकी जहाल नसली, तरी ब्राह्मण धर्मातील संकुचितपणा त्यांनाही मान्य नव्हता. त्यामुळे तेही प्रसंगानुसार ब्राह्मणांवर टीका करायची संधी सोडत नव्हते. या चौफेर माऱ्याने हा तेव्हाचा ब्राह्मणवर्ग तेजोभंग होऊन हतोत्साह होत चालला होता. एक गोष्ट खरी, की दरम्यानच्या काळात ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेत मिळालेल्या मोक्याच्या जागांतून होणाऱ्या प्राप्तीमुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारली होती. पगारातून बचत व बचतीतून गुंतवणूक. गुंतवणुकीत सावकारीचा व्यवसायही आला. शिवाय जमिनीच्या मालकीतून कुळांकडून मिळणारे उत्पन्न होतेच. यातूनच या जातीचा आता मध्यमवर्ग होऊ लागला. ब्रिटिशांच्या यंत्रणेचा अनुभव घेतल्याने या वर्गाला आता ब्रिटिश सत्तेच्या शोषणाचे स्वरूप कळू लागले होते. या सत्तेच्या विळख्यातून राष्ट्राची मुक्तता झाल्याशिवाय त्याला गती नाही हे त्याने ओळखले होते. या गोष्टी कळण्याइतका त्या यंत्रणेचा तितका अनुभव व आधुनिक विद्यांचे तेवढे ज्ञान बहुजन समाजाला नव्हते.
थोडक्यात सांगायचे म्हणजे ब्रिटिशांच्याच विरुद्ध काही कृती करण्याच्या व्यवस्थेपर्यंत हा वर्ग आता पोहोचला होता पण-
या सर्व अनुकूल परिस्थितीला छेद देणारी प्रतिकूलता म्हणजे अगोदर उल्लेखिलेला टीकेचा चौफेर मारा. त्यामुळे न्यूनगंड निर्माण होऊन ही मंडळी हतोत्साह, नाउमेद होत होती.
या परिस्थितीतून ब्राह्मणांना बाहेर काढण्याचे व काही कृती करण्यास उद्युक्त करण्याचे श्रेय विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जाते. शास्त्रीबुवांना पूर्वगौरववादी म्हटले जाते हे खरे आहे. पण त्यांचा हा पूर्वगौरववाद चौफेर माऱ्याला तोंड देण्यासाठी उभारलेली बचावयंत्रणा आहे. चिपळूणकरांनी चालवलेल्या निबंधमालेमुळे ब्राह्मणवर्गात एक क्रांतीच घडून आली, असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. मालेतून त्यांनी ब्राह्मणांवर टीका करणारे ख्रिस्ती मिशनरी, प्रार्थना समाजिस्ट, सत्यशोधक, जोतिराव फुले आणि मुख्य म्हणजे लोकहितवादी यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. १८४८ सालापासून लोकहितवादी ब्राह्मणांवर टीका करीत होते. हे लक्षात घेतल्यावर मालेच्या शेवटच्या पर्वातील एवढी पृष्ठे लोकहितवादींवर का खर्ची पडली आहेत, हे समजते.
चिपळूणकरांच्या लेखनात उपरोध असेल, हेत्वाभासही असतील. पण उपरोक्त विरोधकांचा समाचार घेतल्याशिवाय ब्राह्मणवर्गातील गंड दूर होऊन तो कामाला लागणार नव्हता. देशाच्या दु:स्थितीचा व अवनतीचा पाढा विरोधक वाचत होते. चिपळूणकरांनी तसे काही नसल्याचा दावा केला. देशाची स्थिती ठणठणीत आहे. एवढे चढ-उतार कोणत्याही देशात होत असतात, हे त्यांनी ठणकावून सांगितले. इतिहास हा चक्रनेमिक्रमाने चालतो. आज प्रगत असलेली युरोपिअन राष्ट्रे तेव्हा रानटी दशेत होती, तेव्हा आपण वैभवाच्या शिखरावर होतो. आज ते वर आहेत व आपण खाली. पण तेवढय़ाने निराश व्हायचे कारण नाही, असा धीर त्यांनी आपल्या ज्ञातिबांधवांना दिला.
शास्त्रीबुवांनी दिलेली मात्रा चांगलीच लागू पडली व चौफेर माऱ्याने त्रस्त झालेल्या ब्राह्मण वर्गाला आत्मविश्वास प्राप्त झाला. मरगळ झटकून तो उभा राहिला व स्वातंत्र्यलढय़ाच्या पहिल्या पर्वाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला.
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत. 
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर

Story img Loader