‘एकंदर ३७ जण ठार’ ही कुणाला बातमीची ओळ वाटेल आणि तशी ती आहेच; पण ही सानंत तंती यांच्या एका कवितेचीही पहिली ओळ आहे! तंती यांच्या बाकीच्या कवितांप्रमाणेच ती कविताही आसामी भाषेतली. आसामचीच. रातोरात घडलेल्या हत्याकांडानंतर पडलेल्या पावसाचे, विझलेल्या आयुष्यांचे हे अल्पाक्षरी चित्रण. त्या ३७ जणांमधले १२ पुरुष होते, बाकी महिला आणि मुले. ‘मुलांच्या डोळ्यांची खोबण, बंदुकीच्या दारूनं भरली असेल’ अशा शब्दांत भीषणतेचा अनुभव देणारी ही कविता, ‘पुरुष होते भूमिहीन, महिला होत्या भुकेल्या पोरांच्या आया, आणि मुलं होती… फुलं’ याची आठवण देऊन संपते.
अशा अनेक कवितांतून आसामच्या मातीतल्या समकालीन दु:खांना वाचा फोडणारे, विद्रोह जागा ठेवणारे कवी सानंत तंती गुरुवारी (२५ नोव्हें.) निवर्तले. ‘काय्लोइर दिन्टो आमार होबो’ (उद्याचा दिवस आमचा असेल!) या २०१७ सालचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ प्राप्त काव्यसंग्रहासह त्यांचे १४ काव्यसंग्रह आणि दिब्यज्योती सरमा यांनी इंग्रजीत अनुवाद केलेला ‘सिलेक्टेड पोएम्स ऑफ सानंत तंती’ हा संग्रह अशी काव्यसंपदा आता मागे उरली आहे.
‘तंती’चा अर्थ विणकर असा होतो. पण अन्य अनेक कारागीरांसह पारंपरिक व्यवसाय हिरावला गेलेले, सर्वहारा झालेले सानंत तंती यांचे वाडवडील आसामातील करीमगंज या (बांगलादेशलगतच्या) जिल्ह््यातील कालीनगर चहामळ्यात उपजीविकेसाठी आले, तेथेच १९५२ साली सानंत यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण झाले. ‘मोठा भाऊ बसंतकुमार पुढे शिकला नाही, पण चांगला वाचक होता. त्याच्यामुळेच मी चौथी-पाचवीत असताना महाश्वेतादेवी, समरेश बसू अशा साहित्यिकांची पुस्तके वाचून काढली…’ असे आयुष्मान दत्ता यांनी घेतलेल्या मुलाखतीत सानंत यांनी सांगितले होते.
सानंत महाविद्यालयीन शिक्षणासाठी मेघालयात -शिलाँगला- गेले, पण आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सुटून तेही शिलाँगजवळच्या चहामळ्यातील कारकून झाले. साहित्यिक वर्तुळाशी त्यांचा परिचय झाला तो शिलाँगमध्ये, हे वर्तुळ नव्या, बंडखोर कवी-लेखकांचे आणि ‘लिटिल मॅगेझिन’ काढणाऱ्यांचे.
तेथून कवितेची ठिणगी सानंत यांनी झेलली आणि १९७१ पासून जोºहाट येथे ‘अखिल आसाम चहामळा कामगार भविष्य निर्वाह निधी मंडळा’तील नोकरी सांभाळूनच ती जपली. या नोकरीमुळेदेखील, चहामळा कामगारांशी त्यांचा संबंध राहिला.
सानंत यांची कविता मातीत रुजलेली जरूर आहे, तिला प्रादेशिक सुगंध आहे; पण १९७०-८०च्या दशकांपासून आसामात फोफावलेल्या अतिरेकी अस्मितावादापासून ती दूर आहे. ‘अॅेसिम्प्टोट जर्नल’ या आंतरराष्ट्रीय वाङ्मयीन नियतकालिकाने तंती यांच्या कवितांचे अनुवाद छापताना, ‘समकाल संवेदनशीलतेने नोंदवताना वंचितांचा कैवार घेऊन बदलासाठी झटणारी, प्रचंड आशावादी कविता’ असे या कवितांचे वर्णन केले होते. २००९ पासून कर्करोगाशी झगडतानाही ‘मी आशावादी आहे’ असे म्हणत, कवितेच्या प्रांतात ते सातत्याने कार्यरत राहिले. त्या आशावादाने आता कुडी सोडली आहे.