आयुष्यभर विशिष्ट हेतूंनी प्रेरित होऊन काम करत राहणाऱ्या व्यक्ती समाजातून हळूहळू हरवत चालल्या आहेत. प्रलोभने फेर धरून आकर्षित करत असतानाही, त्याकडे ढुंकून न पाहता आपले ईप्सित कार्य तसेच चालू ठेवणारे निदान वैद्यकीय क्षेत्रात तर फारच दुर्मीळ. उत्तम रोगनिदान आणि योग्य औषधयोजना यांसाठी ख्यातनाम झालेले डॉ. रवी बापट यांचे वेगळेपण हेच, की ते निवृत्तीनंतरही आज रोज मुंबईच्या केईएम रुग्णालयात जातात. आपल्या कामाबद्दलची ही उत्कटता आता जवळजवळ नाहीशी होत चालली आहे. प्रत्येक रुग्णासाठी डॉक्टर हेच सर्वस्व असते. आपले सारे आयुष्य त्याच्या हाती आहे, ही हतबलता असली, तरी योग्य त्या डॉक्टरबद्दल तेवढाच आत्मविश्वासही असतो. डॉ. बापट यांनी तो कमावला आणि टिकवला. लौकिक अर्थाने वैद्यकीय क्षेत्रात ज्याला व्यावहारिक यश म्हणतात, ते मिळवणे त्यांना अजिबात अशक्य नव्हते. परंतु त्याकडे पाठ फिरवण्यासाठी एक प्रकारची स्थितप्रज्ञता लागते. ती त्यांच्याकडे पुरेपूर आहे. आयुष्याची वाटचाल विचारपूर्वक करताना, सामाजिक बांधिलकीचा विचार प्राधान्याने करणाऱ्या डॉ. बापट यांनी संशोधनाच्या क्षेत्रातही भरीव कामगिरी केली. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा आपल्या मित्रांसोबत अधिक संपन्न होण्यात त्यांना रस आहे. इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीत बापट यांना विविध प्रकारच्या माणसांचे सान्निध्य लाभले. त्यातील काही त्यांच्या अंतर्गत वर्तुळातही सामावले गेले. गदिमांपासून पु. ल. देशपांडे, सी. रामचंद्र, सुरेश भट, काशिनाथ घाणेकर, दादा कोंडके असा त्यांचा गोतावळा. अशा अभिजनांच्या मैफलीत सहभागी होऊन स्वत:ला समृद्ध करण्यात त्यांनी धन्यता मानली. रुग्णसेवा करतानाच संगीत, नाटक, साहित्य या विषयांतील आपली रुची सतत वाढवत नेण्यात त्यांनी रस घेतला. निवृत्तीनंतरच्या काळात हाफकीन जीव औषध निर्माण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आणि महात्मा गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचे कुलगुरुपद त्यांनी भूषवले. सतत कामात राहण्यातच आनंद मानणाऱ्या डॉक्टरांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी या सगळय़ातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तरी केईएमशी असलेले दृढ संबंध तोडायचे नाहीत, असे त्यांचे अंतर्मन सांगत राहिले. आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ते आपला जास्तीत जास्त वेळ केईएम रुग्णालयात व्यतीत करतात. गेल्या काही दशकांत वैद्यकीय क्षेत्र वेगाने बदलत गेले. उपचार पद्धती, नवनवीन संशोधन यांचा वेग प्रचंड राहिला. त्या वेगाशी जुळवून घेत आपले वैद्यकीय ज्ञानही सतत ताजे ठेवण्याचे आव्हान डॉ. बापट यांनी उचलले. सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी रुग्णालयात राहून हे ज्ञान सामान्यातल्या सामान्य रुग्णापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट अपार आहेत. या क्षेत्रात येत असलेल्या नव्या पिढीच्या जडणघडणीचा विचार करून त्यांना रात्री उशिरा किंवा रविवारी दिवसभर शिकवणारे डॉ. रवी बापट हे एक अतिशय विद्यार्थिप्रिय प्राध्यापकही आहेत. आपले ज्ञान मुक्तहस्ताने आणि मोफत वाटण्यातला अपूर्वाईचा आनंद हेच त्यांचे सुखनिधान. एवढे सगळे करताना, लेखक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरीही महत्त्वाची आणि लक्षणीय. ‘वॉर्ड नंबर पाच, केईएम’, ‘स्वास्थ्यवेध’, ‘पोस्टमार्टेम’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय झाली, ती त्यातील प्रांजळपणामुळे. आज, गुरुवारी ऐंशीवा वाढदिवस साजरा करत असलेल्या डॉ. रवी बापट यांना ‘लोकसत्ता’तर्फे शुभेच्छा!

job at barc as a researcher research opportunity at barc
नोकरीची संधी : बीएआरसीत संशोधन संधी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
Manjit Singh Success Story
Success Story : “शेतकरी असावा तर असा…” भाड्याने जमीन घेऊन केली हळदीची शेती; डॉक्टर ऑफ ॲग्रीकल्चर म्हणून झाला लोकप्रिय
Story img Loader