तब्बल पाच हजार १०० तास हवाई उड्डाण आणि त्यातील जवळपास निम्मा कालावधी मिराज २००० सारख्या लढाऊ विमानाचे सारथ्य. सर्वाधिक उड्डाण तासांचा अनुभव ही एअर मार्शल रघुनाथ नंबियार यांची ओळख. वेगवेगळ्या ४२ प्रकारच्या विमानांचे सारथ्य त्यांनी केले आहे. कारगिल युद्धातील नायक म्हणून परिचित असणाऱ्या नंबियार यांच्यावर हवाई दलाच्या पश्चिम मुख्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या मुख्यालयाच्या अखत्यारीतील हवाई तळ महत्त्वाचे मानले जातात. या मुख्यालयाचे नेतृत्व करताना त्यांना ३८ वर्षांच्या सेवेतील अनुभव कामी येईल.
परीक्षणासाठी विमानाचे चाचणी उड्डाण करावे लागते. जोखमीच्या कामाचे कौशल्यदेखील त्यांच्याकडे आहे. चाचणी परीक्षण वैमानिक सोसायटीचे ते सदस्य आहेत. दसॉ एव्हिएशनने भारतासाठी तयार केलेल्या पहिल्या राफेल विमानाचे चाचणी उड्डाण त्यांनी केले होते. राफेलची क्षमता पाहून भारतीय हवाई दलासाठी ते परिस्थिती बदलविणारे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राफेलच्या मुद्दय़ावरून देशात राजकीय पातळीवर गदारोळ उडाल्यावर हवाई सामर्थ्यांसाठी राफेलची गरज मांडून हवाई दलास कुठल्याही किमतीत ते हवे, अशी ठोस भूमिका नांबियार यांनी मांडली.
आजवर हवाई दलाच्या अनेक विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून प्रशिक्षण पूर्ण करून जून १९८१ मध्ये ते लढाऊ वैमानिक म्हणून कार्यरत झाले. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्क्वॉड्रन एक’चे नेतृत्व त्यांनी केले. ग्वाल्हेर येथील केंद्राचे मुख्य कार्यवाही अधिकारी, मुख्य संचालक (स्पेस अॅप्लिकेशन), जामनगर केंद्राचे एअर कमांडिंग ऑफिसर, हवाई संरक्षण (पश्चिम मुख्यालय), प्रशिक्षण, हवाई दलाचे उपप्रमुख, दक्षिणी मुख्यालयाचे प्रमुख आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. कारगिल युद्धात घुसखोरांवर अचूक मारा करण्यासाठी मिराज विमानांचा वापर झाला होता. देशाची हवाई सीमा न ओलांडता डोंगरदऱ्यांतील घुसखोरांवर बॉम्बवर्षांव करण्यात आला. या युद्धात नंबियार यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव वायुसेना पदकाने करण्यात आला. तसेच हलक्या वजनाच्या विमानाच्या परीक्षण चाचणीबद्दल वायुसेना पदकासह विशिष्ट सेवा पदक आणि परमविशिष्ट सेवा पदकानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. देशातील सध्याचे वातावरण लक्षात घेता नंबियार यांची संवेदनशील पदावर नियुक्ती होणे महत्त्वाचे मानले जाते.