कुठलेही गाव, शहर, महानगर या प्रत्येकाला जुना वारसा असतो. त्याच्या खाणाखुणा या तेथील जुन्या इमारती, वाडे व ऐतिहासिक वास्तूंत दिसत असतात. त्यात सामान्य माणसाला वेगळेपण दिसेलच असे नाही. सरकारी धोरणे या वास्तूंना संरक्षण देण्यास अनुकूल अशीच असतात, पण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हा वारसा ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील तो जपला जातोच असे नाही. वास्तुरचनाकाराला मात्र या वास्तूतील सौंदर्य, वारसा, जतन करण्याच्या पद्धती हे सगळे कळावे लागते. भारतातील काही वास्तूंचे अशाच पद्धतीने वास्तुरचना संधारण-शास्त्राच्या माध्यमातून संवर्धन करणाऱ्या ऐश्वर्या टिपणीस यांना नुकताच फ्रेंच सरकारचा ‘शवालिए द ला ऑर्दे दे आर्त ए लेत्र’ (कला-साहित्य क्षेत्रातील उमराव) हा सांस्कृतिक सन्मान जाहीर झाला आहे. भारतातील फ्रेंच वास्तूंचे संवर्धन करण्याच्या कामासाठी त्यांना गौरवण्यात आले. ऐश्वर्या या संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या वास्तूंचे तिचा मूळ पोत कायम ठेवून संवर्धन व जीर्णोद्धार करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. वयाच्या सदतिसाव्या वर्षी त्यांना हा सन्मान मिळाला आहे, त्यामुळे अजून बराच काळ या क्षेत्रात त्यांना कामासाठी संधी आहे. यापूर्वी १९८०च्या दशकात कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांना हा पुरस्कार मिळाला होता, तर वास्तुरचनाशास्त्रात राज रेवाल यांना गौरवण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा