मल्याळम भाषेतील ‘ज्ञानपीठ’विजेते साहित्यिक, पत्रकार, समाजसुधारक, गांधीवादी असे बहुमुखी व्यक्तिमत्त्व असलेले ‘महाकवी’ अक्कित्तम अच्युतन नंबुद्री यांच्या निधनामुळे, खऱ्या अर्थाने मल्याळम साहित्यातील एक युग संपले आहे. त्यांची साहित्यसेवा जवळपास सात दशकांची. गेल्याच वर्षी ९३ वर्षांच्या वयात त्यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या घरीच देण्यात आला. २०१७ सालच्या ‘पद्मश्री’चेही ते मानकरी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अक्कित्तम’ म्हणूनच परिचित असलेल्या नंबुद्री यांचा जन्म पालक्काड जिल्ह्याच्या कुमारनल्लुरचा. त्यांनी संस्कृत, ज्योतिषशास्त्र व संगीत यांचा अभ्यास केला. महाविद्यालय शिक्षण पुरे होण्यापूर्वीच ‘मंगलोदयम’ व ‘योगक्षेम’ या मासिकांत उपसंपादक म्हणून काम केले. नंतर ते ‘उन्नी नंबुद्री’ या मासिकाचे संपादक झाले. हे त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे व्यासपीठ ठरले.

वयाच्या तिसाव्या वर्षी, १९५६ साली अक्कित्तम हे आकाशवाणीच्या कोळिक्कोड केंद्रात संहिता लेखक म्हणून रुजू झाले. १९७५ साली त्यांना त्रिशूर केंद्रावर संपादक म्हणून पदोन्नती मिळाली. १९८५ साली या नोकरीतून निवृत्त होईपर्यंतच्या काळात नंबुद्रींची प्रतिभा बहरत गेली आणि येथेच त्यांच्या साहित्यसेवेला खतपाणी मिळाले.  १९५०च्या पूर्वाधात त्यांच्या साहित्याची मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली जाऊ लागली. मल्याळम साहित्यातील खऱ्या अर्थाने पहिले आधुनिक काव्य मानले गेलेले ‘इरुपत्तम नुट्टादिंडे इतिहासम्’ (विसाव्या शतकाचे महाकाव्य) ही त्यांची सर्वाधिक प्रसिद्ध रचना. या खंडकाव्याने त्यांना १९५२ साली, म्हणजे सव्विसाव्या वर्षी ‘संजयन पुरस्कार’ मिळवून दिला. त्यानंतर काव्यसंग्रह, नाटक, लघुकथा, भाषांतरे, बालसाहित्य, निबंध अशा नानाविध प्रकारांनी त्यांनी साहित्यात योगदान दिले. त्यांच्या पुस्तकांची एकूण संख्या ४३. श्रीमद्भागवताचे त्यांनी मल्याळममध्ये केलेले भाषांतर- ‘श्री महाभागवतम’- तब्बल १४ हजार ६१३ श्लोक असलेला २४०० पानी ग्रंथ आहे!

‘बलिदर्शनम’ने १९७१ साली अक्कित्तम यांना केरळ साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे मानकरी ठरवले. याच काव्यसंग्रहासाठी दोनच वर्षांनी त्यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार व ओडाक्कुळल पुरस्कार असे दोन मोठे सन्मान लाभले. केरळचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार असलेला ‘एळुत्ताचन पुरस्कार’ २०१६ साली मिळाला. अर्थात, कारकीर्दीत अन्य अनेक पुरस्कारांचा त्यांच्यावर जणु वर्षांव होत होता.

समाजसुधारक म्हणूनही नंबुद्री यांचे योगदान होते. केरळमधील नंबुद्री ब्राह्मणांच्या ‘योगक्षेम सभा’ साठी त्यांनी ईएमस नंबुद्रिपाद यांच्यासह काम केले. वेदाभ्यासप्रचार करणाऱ्या ‘अनादि’ नियतकालिकाशी त्यांचा संबंध होता. पारंपरिक नंबुद्री घराण्यात जन्मलेले असूनही ब्राह्मणेतरांत वेदप्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. ते गांधीवादीही होते. आकाशवाणीत तब्बल १८ वर्षे त्यांनी ‘गांधी मार्गम’ या कार्यक्रमाचे संचालन केले. १९४७ साली त्यांनी अस्पृश्यतेविरुद्धच्या सत्याग्रहात भाग घेतला होता.

अक्कित्तम यांना मल्याळम कवितेतील आधुनिकतावादाचे जनक मानले जाते. अनेक दशकांपूर्वी मल्याळम कवितेत ‘अर्थपूर्ण आधुनिकतावाद’ आणण्याचे श्रेय त्यांना आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akkitham achuthan namboothiri profile abn