ज्या वर्षी आपल्या भारतातून ‘लगान’ हा चित्रपट ऑस्करच्या ज्या परभाषिक गटामध्ये पुरस्कारासाठी झगडत होता, त्याच वर्षी या गटात ‘अॅण्ड युअर मदर्स टू’ हा मेक्सिकन चित्रपटही होता. दोघांच्याही नशिबी ऑस्कर आले नाही, पण त्या मेक्सिकन चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अल्फान्सो क्वारोन गेल्या अठरा वर्षांत १० वेळा ऑस्करच्या नामांकनामध्ये झळकले! २०१३ साली ग्रॅव्हिटीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले. हा मान मिळविणारे दक्षिण अमेरिकी देशातील ते पहिलेच दिग्दर्शक ठरले. ऑस्कर सोहळ्यात केवळ इंग्रजीत नसल्यामुळे यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक ‘रोमा’ या त्यांच्या स्मरणपटाला मिळू शकले नाही. तरीही चित्रपट वर्तुळात ‘रोमा’ ही या वर्षांतील सर्वोत्तम निर्मिती असल्याचे उच्चरवात कबूल केले जाते हेही खरेच. अगदीच सुखवस्तू कुटुंबात १९६१ साली मेक्सिको सिटीत जन्मलेल्या अल्फान्सो यांनी तत्त्वज्ञानात पदवी घेता घेता चित्रपटाचेही प्रशिक्षण घेतले. घरातील कलाप्रोत्साहनामुळे मेक्सिकोतील चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर यांच्याकडे सिनेनिर्मितीचे कौशल्य शिकत त्यांनी पहिला लघुपट बनवला. पुढे मेक्सिकोच्या टीव्ही मालिकांच्या जगतात सहायक दिग्दर्शन करीत त्यांनी चित्रपट निर्मितीकडे होरा वळवला. अमेरिकेत दाखल झाल्यावर त्यांनी ‘अ लिटिल प्रिन्सेस’ हे अभिजात बालपुस्तक आणि चार्लस डिकन्सच्या ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’ वर आधारित चित्रपट दिग्दर्शित केले. ते चालले नाहीत, तेव्हा पुन्हा मेक्सिकोची वाट धरली. कारण एकतर त्यांना बनवायचा असलेला चित्रपट व्यक्तिरेखांइतकाच मेक्सिकोविषयी होता. दुसरे म्हणजे त्यांना ज्या प्रमाणात लैंगिकतेचा वापर करायचा होता, ती अमेरिकेत चालली नसती. आणि तिसरे म्हणजे त्यांना आधीच्या चित्रपटांमध्ये झाला तसा अमेरिकी स्टुडियोचा वरचष्मा नको होता. त्यामुळेच वरवर दिसणाऱ्या सेक्स कॉमेडीच्या तोंडवळ्यात मेक्सिकोमधील आर्थिक स्थित्यंतराच्या आणि विस्थापित होण्याच्या इतिहासाचा दस्तावेज त्यांच्या ‘अॅण्ड युअर मदर्स टू’मध्ये दिसून आला. यानंतरच, हॅरी पॉटरच्या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी क्वारोन यांना ब्रिटनमधून निमंत्रण आले. मग ग्रॅव्हिटी या अंतराळातील भावुक विज्ञानकथेचा विषय घेऊन क्वारोन यांनी पुन्हा एकदा हॉलीवूड गाजविले. संपूर्णपणे अंतराळात तरंगत्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटाचे तरंग २०१३ सालच्या ऑस्करवर सर्वाधिक उमटले होते. मेक्सिको सिटीजवळच ‘रोमा’ नावाच्या वसाहतीत गेलेल्या बालपणातील अतिवैयक्तिक आठवणींच्या मालिका त्यांनी ताज्या चित्रपटामध्ये सादर केल्या आहेत.
अल्फान्सो क्वारोन..
२०१३ साली ग्रॅव्हिटीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-02-2019 at 04:20 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alfonso quaron profile director por roma