कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशिअल इंटलिजन्स या विषयावर विशेषत: भारतीय भाषांमध्ये लिहिताना पहिलेपणाचा फायदा मिळतो! कृत्रिम प्रज्ञाविषयक संशोधन मुळात कधी सुरू झाले याचा इतिहास सांगण्यापासून ते कृत्रिम प्रज्ञेचे उपयोग किती विविधांगी असू शकतात याच्या वर्णनांपर्यंत आणि मग , कृत्रिम प्रज्ञेच्या वापराचे धोकेही कसे आणि कोणते असू शकतात याची उजळणी करून मानव आणि कृत्रिम प्रज्ञा यांचे संबंध कसे असावेत याविषयीच्या चिंतनापर्यंत सर्व मजकूर समजा एखाद्याच मोठय़ा लेखात लिहिला, तरीसुद्धा ‘या लेखातून कितीतरी नवी माहिती मिळाली/ विचारांना दिशा मिळाली’ या छापाची पत्रे येतात! इंग्रजीत कुणी अशाच प्रकारच्या संक्षिप्त लिखाणाला एवढी भरभरून दाद देत असेल, तर मात्र संबंधितांना पामेला मॅक्कॉर्डक माहीत नाहीत, अशी खूणगाठ बांधावी लागेल. पामेला यांनी कृत्रिम प्रज्ञाविषयक संशोधनाचा आढावा घेणारे पहिले इंग्रजी पुस्तक १९७९ मध्ये लिहिले होते! पामेला मॅक्कॉर्डक यांच्या निधनानंतर पंधरवडा उलटत असताना तरी, त्यांची ओळख करून घ्यावीच लागेल. १९७९ मध्ये प्रकाशित झालेल्या त्या पुस्तकाचे नाव होते ‘मशीन्स हू थिंक’! ‘विचार करणाऱ्या यंत्रां’चे काहीसे काव्यात्म आकर्षण मुळात इंग्रजी वाङ्मय शिकलेल्या- शिकवणाऱ्या पामेला यांना वयाची पस्तिशी उलटल्यावर वाटले आणि त्यांनी या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांच्या मुलाखतींचा सपाटा सुरू केला. तांत्रिक बाबी समजून घेणे जरा अडचणीचे होते, पण संशोधकांच्या प्रयत्नांची वर्णने त्यांनी केली. ‘ते सांगत, मी लिहून घेई’ अशी कबुली पामेला यांनीच २०१९ सालच्या, ‘धिस कुड बी इम्पर्ॉटट- माय लाइफ अॅण्ड टाइम्स विथ आर्टिफिशिअल इंटलिजेन्शिया’ या पुस्तकात दिली आहे. हे आत्मपर आणि चिंतनपर पुस्तक, कृत्रिम प्रज्ञेचा वापर जबाबदारीनेच व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त करते. पण या चिंतनापर्यंत पोहोचण्यासाठी पामेला यांनी हयात वेचली. मधल्या काळात कला आणि कृत्रिम प्रज्ञा यांच्याविषयीचे ‘आरॉन्स कोड’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते. कुतूहल वाटणे, भारावून जाणे, माहिती घेत राहाणे, सजगपणे शहानिशा करणे आणि धोक्यांचेही चिंतन करणे अशा ज्ञानावस्थांतून पामेलांचा प्रवास झाला. ज्या क्षेत्राशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, त्यातील नवतेचा ठाव घेताना त्यांनी इंग्रजी ललितेतर गद्यात कृत्रिम प्रज्ञा संशोधनाच्या इतिहास-लेखनाचे नवे दालन नकळतपणे खुले केले. त्यांचे समग्र लिखाण सर्वसामान्यांना यापुढील काळात ‘कालबा’ वाटेलही; पण अभ्यासकांसाठी तो ‘गतकाळाचा दस्तावेज’ ठरेल हे निश्चित.
पामेला मॅक्कॉर्डक
पामेला यांनी कृत्रिम प्रज्ञाविषयक संशोधनाचा आढावा घेणारे पहिले इंग्रजी पुस्तक १९७९ मध्ये लिहिले होते!
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2021 at 01:41 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American author pamela mccorduck profile zws