पेशींचे शरीरातील आचरण व त्यांचे रेणवीय पातळीवर चालणारे कार्य फार महत्त्वाचे असते. त्यात बिघाड झाला की पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोगापासून अनेक रोग होतात त्यामुळे या शाखेतील पायाभूत संशोधन हे महत्त्वाचे असते. यात शाखेत संशोधन करून नोबेल पटकावणारे अमेरिकी जीवशास्त्रज्ञ गुंथर ब्लोबेल यांचे नुकतेच निधन झाले. १९९९ मध्ये त्यांना नोबेल मिळाले होते ते, पेशींच्या अंतर्गत भागांमध्ये प्रथिनांच्या हालचालींशी संबंधित.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतून अमेरिकेत आले. त्यांचा जन्म १९३६ मध्ये वॉल्टर्सडॉर्फ  शहरातला. तेव्हा हे शहर जर्मनीत होते आता ते पोलंडमध्ये निगोस्लावाइस नावाने समाविष्ट आहे. रेड आर्मीच्या आक्रमणानंतर त्यांचे कुटुंबीय ड्रेसडेन मार्गे पळाले. ब्लोबेल यांनी टुबिनगेन विद्यापीठातून एमडी केल्यानंतर अनेक जर्मन रुग्णालयांत आंतरवासीयता केली व नंतर मॅडिसनमधील विस्कॉन्सिन विद्यापीठात आले. रॉकफेलर विद्यापीठातून त्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पेशी जीवशास्त्रातील कारकीर्द सुरूच ठेवली. पेशीतील प्रथिनांच्या हालचालींवर आधारित सिग्नल हायपोथेसिस त्यांनी पेशी जीवशास्त्रज्ञ डेव्हिड डी साबातिनी यांच्याबरोबर काम करताना मांडले. रेणवीय झिपकोड या पेशीतील रेणूंच्या हालचालींच्या संकेतावलीचा उलगडा त्यांनी केला. त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांची कारणमीमांसा करणे शक्य झाले. १९९९ मध्ये त्यांना वैद्यक किंवा शरीरशास्त्राचे नोबेल मिळाले तेव्हा त्यांनी ते पैसे फ्रेंड्स ऑफ ड्रेसडेन या संस्थेला दिले. ‘ड्रेसडेनच्या पुनर्उभारणीसाठी माझी बहीण रूथ ब्लोबेल हिच्या स्मरणार्थ हे सगळे पैसे देताना मला खूप आनंद वाटतो’ असे ते म्हणाले होते. यातून दिसते ती त्यांची दिलदार वृत्ती, मातृभूमीवरचे प्रेम. ब्लोबेल यांना १९९३ मध्ये मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी अल्बर्ट लास्कर पुरस्कार मिळाला होता. १९९७ मध्ये त्यांना विज्ञान संशोधनात न्यूयॉर्कच्या महापौराचा पुरस्कार मिळाला आणि नंतर १९९९ मध्ये नोबेल. १९९२ पर्यंत ते रॉकफेलर प्रोफेसर होते. त्यांच्या संशोधनातून पुढील काळात सिस्टीक फायब्रॉसिस, ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), स्किझोफ्रेनिया (व्यक्तिमत्त्व दुभंग), एड्स, कर्करोग व इतर आनुवंशिक रोगांवर मोठी प्रगती झाली. त्यांच्या तीस वर्षांच्या संशोधनात कुठलाही युरेका क्षण नव्हता. कारण त्यांचे संशोधन हे नवीन गृहीतके, चाचण्या, सिद्धांत यांच्या आधारे पुढे जाणारे होते. १९७४ मध्ये वैद्यकाचे नोबेल पटकावणारे रॉकफेलर विद्यापीठाचे डॉ. जॉर्ज ई. पॅलेड हे त्यांचे गुरू. पॅलेड यांनी पेशींचे अंतर्गत काम, रचना यावर मोठे काम केले होते. आपल्या शरीरारात अब्जावधी प्रथिने पेशीतील खोबण्यांमध्ये तयार होत असतात व तेच आपल्या शरीराची दशा आणि दिशा ठरवतात, यावरून ब्लोबेल यांचे संशोधन खूपच क्रांतिकारी होते यात शंका नाही.

Story img Loader