मोबाइल,  टीव्ही आदींमध्ये‘इंटिग्रेटेड सर्किट’ असणारच, हे आपण गृहीत धरतो.. बाहेरून आलेला संदेश आणि अंतर्गत कार्यावली यांची सांगड घालण्यासाठी सिलिकॉन या अर्धवाहकाचा वापर करणारे ‘समाकलित मंडल’ – म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट कसे असेल, याची अंधूकशी कल्पनाही ६४ वर्षांपूर्वी कुणाला नव्हती. अशा काळात, १९५७ मध्ये ‘नव्या प्रकारचा ट्रान्झिस्टर तयार करायचाय’ म्हणून ज्या सात तरुणांनी विल्यम शॉकली यांच्या ट्रान्झिस्टर प्रयोगशाळेबाहेर पडून स्वत:ची कंपनी स्थापली, त्यापैकी जे लास्ट हे भौतिकशास्त्रज्ञ. इंटिग्रेटेड सर्किटच्या शोधाचे श्रेय जॅक किल्बी वा रॉबर्ट नॉइस अशांना दिले जाते, पण अर्धवाहकांवर महत्त्वाचे संशोधन करून या सर्किटचा मार्ग खुला करण्याचे श्रेय लास्ट यांचे. ११ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाल्याची वार्ता आठवडाभराने सर्वदूर झाल्यानंतर हळहळ व्यक्त झाली, ती मात्र केवळ एक भौतिकशास्त्रज्ञ गेला म्हणून नव्हे. कलाप्रेमी, कलासंग्राहक, दानी म्हणूनही लास्ट प्रख्यात होते. पेनसिल्व्हानिया राज्यात १९२९ मध्ये त्यांचा जन्म झाला. बालपण दोन महायुद्धांदरम्यान गेले, पण रॉचेस्टर विद्यापीठातून १९५१ मध्ये शास्त्रशाखेची पदवी घेतल्यावर पुढेही शिकून, १९५६ साली ‘मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून त्यांनी भौतिकशास्त्रात पीएच.डी. केली. मूलद्रव्यांची नवी उपयोजने, त्यातही अर्धवाहकांचा वापर हे लास्ट यांचे संशोधनविषय. त्याच बळावर, ‘ट्रान्झिस्टर’च्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे विल्यम शॉकली यांनी त्यांना अर्धवाहक संशोधन-विभागाचे प्रमुखपद दिले. पण जे लास्ट तसेच रॉबर्ट नॉइस, ज्युलिअल ब्लँक, जीन होर्नी, युजीन क्लायन, गॉर्डन मूर, व्हिक्टर ग्रीनिच हे या प्रयोगशाळेतील तरुण ‘नवे करूया’ म्हणत बाहेर पडले. या सात जणांना सी. शेल्डन रॉबर्ट्स यांची साथ मिळाली म्हणून या चमूला ‘विद्रोही अष्टक’ (ट्रेटरस एट) असे नाव पडले. या आठ जणांनी ‘फेअचाइल्ड’ कंपनी स्थापली, तिच्या संशोधनातून सिलिकॉनचा वापर सपाटपृष्ठीय मंडलात कसा करायचा याची ‘प्लॅनार प्रक्रिया’ स्पष्ट झाली आणि पुढल्या वर्षभरात (१९६०) इंटिग्रेटेड सर्किटचे उत्पादन सुरू होऊ शकेल, इतकी भरारी जे लास्ट यांच्या प्रयत्नांमुळे मारता आली. हा तंत्र अमेरिकी संरक्षण खात्याने हेरले आणि ‘टेलिडाइन’ ही निराळी कंपनी स्थापन करून लास्ट यांनी या सर्किटांमध्ये प्रगती केली. पन्नाशीत ही कंपनी सोडून, केवळ साहसवित्त-पुरवठादार म्हणून ते कार्यरत राहिले. पण ते व त्यांच्या मित्रांमुळेच ‘सिलिकॉन व्हॅली’ची स्थापना होऊ शकली होती!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा