इ.स. २००५ मध्ये अमेरिकेतील एका घरात पहाटे साडेपाच वाजता दूरध्वनी खणखणला. पलीकडून एक व्यक्ती स्वीडिश उच्चारात बोलत होती. तुम्हाला भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे, असे या व्यक्तीने सांगितले. अनेक वर्षांपूर्वी केलेले संशोधन हा वैज्ञानिक विसरूनही गेला होता, पण तो फोन म्हणजे थट्टा नव्हती. त्यांना खरोखर नोबेल मिळाले होते. त्यांचे नाव रॉय जे ग्लॉबर. त्यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांना नोबेल मिळाले होते ते ३८ व्या वर्षी (१९६३ मध्ये) लिहिलेल्या द्रव्य व प्रकाश यांच्या आंतरक्रियेवरील शोधनिबंधासाठी! ते सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते. पुंज सिद्धान्ताच्या मदतीने त्यांनी प्रकाशशास्त्राचा वेध घेताना पुंज विद्युतगतिकी या नव्याच शाखेचा पाया घातला. विसाव्या शतकात अनेक वैज्ञानिक द्रव्याच्या स्वरूपाचा वेध घेण्यासाठी प्रयत्नशील होते, त्यात प्रकाशशास्त्राचा वापर करता येईल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण प्रकाशशास्त्रातून द्रव्याचा वेध घेता येईल ही नवीन कल्पना ग्लॉबर यांना सुचली. त्यातून मग १९६० मध्ये लेसरचा शोध लागल्यानंतर सगळे चित्र बदलले.

ग्लॉबर यांनी १९५६ मध्ये ब्रिटिश खगोल वैज्ञानिक रॉबर्ट हानब्युरी ब्राऊन व रिचर्ड ट्विस यांच्यासमवेत दृश्य ताऱ्यांचा कोनीय व्यास मोजण्याचा प्रयोग केला होता. त्यात दोन डिटेक्टर म्हणजे शोधक वापरले होते. ही उपकरणे प्रकाशकण पकडून ती मध्यवर्ती यंत्राकडे मोजमापासाठी पाठवीत असत. त्यानंतर १९६३ मध्ये ग्लॉबर यांनी दी क्वांटम थिअरी ऑफ ऑप्टिकल कोहिरन्स हा शोधनिबंध लिहून प्रकाशाचा पुंज यांत्रिकीच्या मदतीने वेध घेतला. क्वांटम संगणक व क्वांटम क्रिप्टोग्राफी  तसेच लेसर किरणांचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी त्यांच्या संशोधनाचा उपयोग झाला.

ग्लॉबर यांचा जन्म न्यूयॉर्कमधला. त्यांचे वडील विक्रेते, तर आई शाळेत शिक्षिका. लहान असतानाच त्यांना विज्ञान व खगोलशास्त्राची आवड होती. त्यांनी आरसा तयार केला होता. नंतर हेडेन तारांगणातील अनेक व्याख्याने त्यांनी ऐकली. १९४३ मध्ये मॅनहटन प्रकल्पात अणुबॉम्ब स्फोटासाठीची गणिते सोडवण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. अणुशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर यांनी त्यांना नंतर प्रिन्स्टन येथे संशोधनासाठी बोलावले. कालांतराने ते रिचर्ड फेनमन हे रजेवर असताना पॅसाडेनात कॅलटेकमध्ये काम करीत होते. नंतर पुन्हा त्यांनी हार्वर्डमध्ये येऊन अध्यापन सुरू केले. खऱ्या नोबेलआधी ते विनोदी कल्पनांसाठीच्या नोबेल पुरस्कार कार्यक्रमात सहभागी झाले. त्यात त्यांनी मंचावर उडवण्यात आलेली कागदी विमाने साफ करण्याचे कामही केले होते, पण अखेर त्यांना खरोखर नोबेल मिळाले!

Story img Loader