त्या शिकागो विद्यापीठातील इंग्रजीच्या प्राध्यापक. पण त्यांनी समकालीन तत्त्वविचारात स्वत:चे स्थान निर्माण केले, समाज आणि संस्कृती यांचे आजचे कारक घटक कोणते, याचा अभ्यास सजगपणे केला.. या लॉरेन बर्लाट यांचे निधन गेल्या सोमवारी (२८ जून) झाल्यानंतर ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या स्मृतिलेखात ‘अमेरिकन ड्रीम’चा पोकळपणा त्यांनी दाखवून दिल्याचा ठळक उल्लेख होता. तो रास्तच, पण त्यापुढले, अमेरिकीच नव्हे तर मानवी समाजाकडे साकल्याने पाहणारे चिंतन लॉरेन यांनी केले होते. अगदी कमी शब्दांत सांगायचे, तर ‘समाजाचा आदर्शवादच अनेक समाजघटकांना  नकार दिला जाण्याचे कारण ठरतो’ अशी त्यांची मांडणी. समलिंगींचे प्रश्न सडेतोड मांडण्याचा तोंडाळपणा बरेच जण करतात, पण ‘हे प्रश्न समाजात असतात ते का’, याचा सखोल विचार करण्याचे लॉरेन यांनी तरुण वयातच ठरवले आणि पीएच.डी.चा विषयही त्यास अनुरूप असाच घेतला. त्यासाठी ‘प्रश्नां’चा नव्हे, तर प्रश्न निर्माण करणाऱ्या ‘सामाजिक भावविवशते’चा अभ्यास त्यांनी केला. समाजाची भावावृत्ती (मानसशास्त्रातील ‘अ‍ॅफेक्ट’) बदलता येईलही, पण भावविवशता (सेंटिमेंटॅलिटी) बदलत नाही, याचे कारण उन्नत अशा जीवनाचे चित्र नेहमी आदर्शवादी, धीरोदात्त वगैरे असते. मग आदर्शवादालाच टाचणी लागल्याखेरीज समाजाची मानसिकता कशी काय बदलणार? हा विचार कुणाला ‘समाजविघातक’ वाटेल, पण सहानुभूती व प्रेम यांतूनच ही टाचणी लागू शकते, असा मार्गही लॉरेन सुचवतात, त्यामुळे हा विचार तत्त्वचिंतनाच्या पातळीला जातो. पण तो इतका थोडक्यात वाचताना देखील शब्दबंबाळ वाटतो, त्याचे काय? – याचे उत्तर मिळवण्यासाठी, समलिंगींच्या लढय़ाची दिशा अहिंसक आणि समंजसच राहावी यासाठी लॉरेन यांनी केलेल्या प्रत्यक्ष कामाकडेही पाहावे लागते. सहानुभूतिमय प्रेम करायचे तर आधी परस्परांचे ‘बिचारेपणा’ वा अगतिकता मान्य करण्याची धमक समाजात हवी, हे त्यांचे चिंतन लक्षणीय होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा