अभ्यासूवृत्ती, संशोधन यांना प्रयत्नांचे, मेहनतीचे पाठबळ देणाऱ्या व्यक्ती अधिक यशस्वी होतात. प्रा. अनिल दत्तात्रय सहस्रबुद्धे हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अध्यक्षपदी त्यांची नुकतीच फेरनिवड झाली. तंत्रशिक्षणाच्या अभ्यासाचा दर्जा सुधारणे, त्या संस्थांमध्ये समन्वय ठेवणे हे या परिषदेचे एक प्रमुख काम. अशा या महत्त्वाच्या संस्थेची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती आहे, त्यामुळे भावी पिढीच्या दृष्टीने हे एक आशादायक चित्र आहे.
सहस्रबुद्धे हे मूळचे कर्नाटकचे. हुबळीतील महाविद्यालयातून त्यांनी तंत्रशिक्षण व अभियांत्रिकीची पदवी १९८० मध्ये घेतली. तेव्हा ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर बेंगळुरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मधून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. १९८३ मध्ये इंडियन इस्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. काही महिन्यांनी ते टाटा कन्सल्टन्सीमध्ये रुजू झाले. एकंदर ३१ वर्षांच्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी शैक्षणिक तसेच संशोधन व महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यानंतर अरुणाचल प्रदेशातील इटानगर, गुवाहाटी त्याचबरोबर पुण्यातील नामांकित अशा ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ येथे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. विविध ठिकाणी काम करताना नावीन्याचा ध्यास हे त्यांच्या कामाचे सूत्र राहिले. त्यांच्या कामाची दखल घेऊन विविध तज्ज्ञ समित्यांवरही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यात प्रामुख्याने संशोधनाचे पायाभूत स्तरावर काम करणारी संस्था असेल किंवा विद्यापीठ अनुदान आयोगासारख्या महत्त्वपूर्ण संस्थांचा समावेश आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाबाबतचे योगदान तसेच उद्योगप्रवणतेला चालना देणारे उपक्रम राबविल्याबद्दल ‘प्राज’ उद्योगाकडून त्यांना गौरवण्यात आले आहे. अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारणे त्याचबरोबर या क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालणे हे महत्त्वाचे आव्हान सहस्रबुद्धे यांच्यापुढे आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध खासगी महाविद्यालयांत हजारो जागा रिक्त राहत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडली वा बंद पडण्याच्या मार्गवर आहेत. यासाठी विविध क्षेत्रांतील कंपन्यांना कशा प्रकारचे मनुष्यबळ हवे आहे याचा विचार करून नवनवीन अभ्यासक्रम व विषय सुरू करण्यावर आता भर द्यावा लागणार आहे.