नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी लढय़ाचे वादातीत प्रणेते मानले जाते. परंतु अशा नेत्यांच्या संघर्षांचे आणि कष्टोत्तर यशाचे गमक समर्थ अशा दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये दडलेले असते. आर्चबिशप डेस्मंड टुटू हे मंडेला यांच्या मागील दुसऱ्या फळीमध्ये अग्रणी होते. या डेस्मंड टुटू यांचे रविवारी नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ‘ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर त्यांच्याशी शत्रुत्व घेण्याची काही गरजच उरत नाही,’ अशी भूमिका महात्मा गांधी यांनी स्वातंर्त्यलढय़ाच्या उत्तरार्धात घेतली होती. याच सूडबुद्धीविरोधी तत्त्वाचा अंगीकार टुटू यांनी केला. दक्षिण आफ्रिकेतील मूठभर गोऱ्या सत्ताधीशांच्या वर्णद्वेष्टय़ा धोरणांच्या विरोधात त्यांनी प्रखर लढा दिला. पण आपला संघर्ष हा वर्णद्वेषी वृत्तीविरोधात आहे, मूठभर गोऱ्यांविरोधात नाही याचे भान त्यांनी राखलेच, शिवाय विविध व्यासपीठांवर तशी भूमिकाही घेतली. वांशिक, वर्णीय संघर्षांमध्ये अशी नेमस्त भूमिका घेणारे चटकन लोकप्रिय होत नाहीत. काही वेळा त्यांच्या हेतूंविषयीदेखील शंका घेतल्या जातात. डेस्मंड टुटू हे धर्मोपदेशक होते. ते ‘गोऱ्या मिशनऱ्यांची’ भाषा तर बोलत नाहीत ना अशी शंका दक्षिण आफ्रिकेतील बहुसंख्य गौरेतर समाजातील काहींनी व्यक्त केलीच. परंतु महात्मा गांधींप्रमाणेच डेस्मंड टुटू यांनीही तळागाळापर्यंत लढा झिरपवण्यासाठी धर्मातील मानवतावादी तत्त्वांचा आधार घेतला. दक्षिण आफ्रिकेतील चर्च परिषदेचे अध्यक्ष आणि नंतर केपटाऊन अँग्लिकन चर्चचे आर्चबिशप या भूमिकेतून त्यांनी वर्णद्वेषी लढय़ाला चर्चचे पाठबळ दिले. पापक्षालनाची संधी आणि न्यायदानात सूडबुद्धी आणू न देणे ही तत्त्वे डेस्मंड टुटू यांनी कटाक्षाने पाळली. ‘ट्रूथ अँड रीकन्सिलिएशन कमिशन’च्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी गोऱ्यांच्या अत्याचारांच्या कहाण्या जनतेसमोर सविस्तरपणे आणल्या. परंतु त्याचबरोबर गुन्हे कबूल करण्यासाठी पुढे आलेल्यांना माफीही देऊ केली. दोन समुदायांतील प्रदीर्घ आणि प्रखर संघर्षांनंतर एक समूह सत्तेवर येतो, त्या वेळी संघर्षांच्या जखमा ओल्या असतात. अशा वेळी अविश्वास, विद्वेषाचे वातावरण चिरंतन ठेवायचे की जखमांवर फुंकर घालून राष्ट्रउभारणीसाठी दोन्ही समुदायांना उद्युक्त करायचे?  डेस्मंड टुटू यांनी दुसरा पर्याय निवडला, त्यामुळे ते द्रष्टे ठरतात. सन १९८४मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. तरी त्यांच्या जीवितकार्याचा परमावधी दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची सत्ता आल्यानंतरच्या पहिल्या दशकात दिसून आला. वाक्चातुर्याला विनोदबुद्धीची जोड दिल्यामुळे त्यांची भाषणे अतिशय परिणामकारक ठरत. नेल्सन मंडेला यांच्या उत्तराधिकाऱ्यांनाही प्रसंगी खडे बोल सुनावण्यास ते कचरले नाहीत. गोऱ्या अभिजनांची जागा गौरेतर मूठभर अभिजनांनी घेऊन जनतेच्या पदरात काहीच पडणार नाही हे टुटू नेहमीच सुनावत राहिले.

Story img Loader