आजारावर मात करताना एखादा व्यायाम सांगितल्यानंतर त्यामध्ये झोकून देऊन त्याच सरावाचा फायदा घेत एखाद्या क्रीडाप्रकारात नावलौकिक मिळविणे ही अतिशय अवघड कामगिरी असते. नोएडा येथील २४ वर्षीय गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी हा अशाच मोजक्या युवकांमध्ये मानला जातो. लहानपणी त्याला दम्याचा आजार होता. त्यावर मात करण्यासाठी त्याला चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला. या व्यायामातूनच त्याला पदभ्रमणाची आवड निर्माण झाली. हळूहळू त्याने हिमालयातील गिर्यारोहणासही सुरुवात केली. नुकतीच त्याने कांचनजंगा या आव्हानात्मक शिखरावर चढाई केली आहे. त्याने आजपर्यंत आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंच असलेली सहा शिखरे सर करीत विक्रमी कामगिरी केली आहे.
गिर्यारोहणाच्या कारकीर्दीत अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण गिर्यारोहक आहे. माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवणारा सर्वात लहान भारतीय गिर्यारोहक होण्याची कामगिरी त्याने २०१० मध्ये केली होती. त्या वेळी तो अवघा सोळा वर्षांचा होता. आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंच शिखरांसाठी मोहीम आखणे म्हणजे साक्षात मृत्यूलाच आव्हान देण्यासारखे असते. त्याच्या सुदैवाने त्याचे वडील कॅप्टन संजीव व आई प्रिया यांनी सतत त्याला या मोहिमांकरिता आर्थिक व मानसिक बळ दिले आहे. त्याने एव्हरेस्टवरील यशस्वी मोहिमेनंतर आतापर्यंत मनालसु, ल्होत्से, चो यु, मकालू, कांचनजंगा या सर्व आठ हजार मीटरपेक्षा उंच असलेल्या शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. हे यश मिळविताना त्याने अनेक विक्रमही नोंदविले आहेत. गिर्यारोहणात अतिउंचीवर जाताना श्वासोच्छ्वासची समस्या असते. त्याचप्रमाणे शारीरिक क्षमतेचीही तेथे कसोटी असते. तथापि आत्मविश्वासास चिकाटीची व जिद्दीची जोड दिली, तर कोणतेही लक्ष्य कठीण नाही असेच तो मानत असतो. चो यु शिखरावर त्याला दोन प्रयत्नांनंतर यश मिळाले तर मकालू शिखरासाठी तीन वेळा प्रयत्न करावे लागले. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे असे तो मानत असतो. या मोहिमांकरिता तो नियमित सायकलिंग, धावणे, गिर्यारोहण आदी नियमित सराव करतो. युवकांनी हातात मोबाइल्सवर गेम्स खेळण्याऐवजी पदभ्रमण किंवा गिर्यारोहण करीत निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे असे सतत सांगत असतो.
हिमालयातील पर्यावरणरक्षणाच्या मोहिमेतही त्याचा सक्रिय सहभाग असतो. आतापर्यंत सहा हिमशिखरे पादाक्रांत केली असली, तरी त्याची भूक संपलेली नाही. सतत नव्या मोहिमांचाच तो विचार करतो. या युवा गिर्यारोहकाचे यश निश्चितपणे युवा पिढीसाठी प्रेरणादायक आहे.