‘गर्म हवा’, ‘अर्थ’, ‘गमन’, ‘मण्डी’ हे गाजलेले कलात्मक चित्रपट, तिकीटबारीवर १९७० व ८० च्या दशकात यश मिळवणारे ‘शोले’, ‘काला पत्थर’, ‘नूरी’, ‘त्रिशूल’, ‘डिस्को डान्सर’ हे एका पिढीच्या आठवणींत सतत राहणारे चित्रपट, किंवा ‘साथ साथ’, ‘शौकीन’ असे वेगळ्या वाटेचे हलकेफुलके चित्रपट.. गीता सिद्धार्थ यांच्या भूमिका या सर्व चित्रपटांत होत्या. यापैकी ‘गर्म हवा’ (१९७४) मधील ‘अमीना मिर्झा’च्या भूमिकेसाठी तर त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.. तरीही गीता सिद्धार्थ यांचे निधन झाल्याची वार्ता रविवारी फारच कमीजणांपर्यंत पोहोचली. चित्रपटक्षेत्रातील दर्दीच तेवढे हळहळले.
हे आणि असे अनेक (देशप्रेमी, कसम पैदा करने वाले की, एक चादर मैली सी.) चित्रपट गीता सिद्धार्थ यांच्यासाठी ओळखले जात नाहीत हे खरे, पण वाटय़ाला आलेल्या सहभूमिका गीता सिद्धार्थ यांनी समरसून, अभिनयाची समज दाखवून केल्या होत्या. म्हणूनच आज त्या कुणाला ‘त्रिशूलमधली संजीव कुमारची बायको’ म्हणून आठवतात, तर कुणाला ‘शौकीनमधल्या उत्पल दत्तला दरमहा न चुकता घरभाडे आणि चहा देणारी महिला’ म्हणून. पण एका मराठी चित्रपटातही गीता सिद्धार्थ यांची भूमिका होती.. कादंबरीवरून नाटक आणि नाटकापासून चित्रपट असा प्रवास केलेल्या त्या चित्रपटाचे नाव ‘गारंबीचा बापू’ आणि गीता सिद्धार्थ यांची भूमिका होती राधाची!
गारंबीत इंग्रजी वर्तमानपत्र वाचू शकणारी एकमेव स्त्री राधा, बापू जिच्यावर भाळतो आणि जिच्यामुळे गाव बापूबद्दल कुचाळक्या करू लागतो ती ‘आख्यायिका असलेली बाई’ राधा. ही भूमिका स्वत: मराठीत बोलून गीता यांनी केली. काहीशी आडमाप देहयष्टी, गोल चेहरा, ठसठशीत जिवणी आणि अत्यंत बोलके डोळे याहीपेक्षा महत्त्वाचे, बुद्धिपुरस्सर अभिनयाचे अंग त्यांच्याकडे होते. त्यामुळेच त्यांचा अभिनय संयत असे. भूमिकेची गरज त्या चटकन ओळखत. दूरदर्शनचे वृत्तनिवेदक आणि पुढे ‘सुरभि’ कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेले सिद्धार्थ काक हे त्यांचे पती; म्हणून त्या गीता ‘सिद्धार्थ’!
सामाजिक कार्यातही गीता यांना रस होता. गरीब बालकांसाठी संस्थात्मक कार्याला त्यांनी वेळोवेळी मदत केली आणि मिळवून दिली होती. प्रजासत्ताकदिनी ‘वीर बालक पुरस्कार’ पात्र ठरणारी मुले निवडण्यासह अनेकपरींचे कार्य करणाऱ्या ‘भारतीय बाल कल्याण परिषदे’चे अध्यक्षपद गेले दशकभर त्यांच्याकडे होते. मात्र, या पुरस्कार निवडीचे अधिकार पंतप्रधान कार्यालयाने यंदाच (२०१९) काढून स्वत:कडे घेतल्याने हे काम करणाऱ्या त्या अखेरच्या अध्यक्ष ठरल्या.