‘क- क- कॉम्पुटरचा’ असे पुस्तक लिहीत असताना आपल्या ८६ वर्षांच्या आईला संगणकासमोर बसवून तिला तिचे आत्मचरित्र लिहायला लावणारे रवींद्र देसाई हे एक वेगळ्या लयीचे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या आईने संगणकावर लिहिलेले हे पुस्तक त्यांनी मोठय़ा आत्मीयतेने ‘आभाळ पेलताना’ या नावाने प्रकाशित केले होते. तिचे हे कर्तृत्व सगळ्यांना सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान विलसत असे, ते केवळ अनुभवण्यासारखे असे. आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन हेच ध्येय बाळगलेल्या देसाई यांनी उपयुक्त साहित्य लिहिले असले, तरीही त्यांचे चिंतन त्यांच्या बोलण्यातून सतत पाझरत असे. मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि त्याला अखंड वाचनाची जोड यामुळे अनेक पुस्तकांच्या संपादनात ते अतिशय महत्त्वाच्या सूचना करीत असत. राजहंस प्रकाशनच्या अनेक पुस्तकांच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता.
झोपडपट्टीतील मुलांसाठी संध्याकाळी स्वतंत्र शाळा चालवण्याचे काम देसाई यांनी आनंदाने केले. या मुलांचे आयुष्य सर्वार्थाने फुलावे, यासाठी पदरमोड करून विविध उपक्रम राबवण्यात ते अधिक खूश असायचे. मितभाषी असले तरीही गप्पांच्या मैफलीत आपल्या नर्मविनोदाने हास्य फुलवणाऱ्या देसाईंना अनेक विषयांमध्ये रस होता. संगणक, माहिती तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार याबरोबरच शेअर बाजार हे त्यांचे विशेष आवडीचे विषय. त्या विषयांवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना वाचकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. सद्य:स्थितीवर भाष्य करणारे त्यांचे स्फुटलेखन अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले. ‘हात पसरू ना कधी’, ‘द्यानबाचा गोबर गॅस’ आणि ‘क- क- कॉम्पुटरचा’ या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट लेखनाची पारितोषिकेही मिळाली. या विषयांवर भाषणे देताना, समोर बसलेल्या विविध वयोगटांच्या प्रेक्षकांशी सहजपणे संवाद साधत ते अवघड विषयही सहजपणे फुलवत असत. या खेळीमेळीच्या शैलीमुळे वक्ते म्हणूनही त्यांचे नाव महाराष्ट्राला परिचित होते.
रवींद्र देसाई यांचा मित्रपरिवार हा एक हेवा वाटण्यासारखा विषय होता. वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेकांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. या सगळ्या मित्रांच्या सुखदु:खाच्या प्रसंगात समरसून जाण्यात त्यांना अधिक आनंद मिळे. लेखनात दंग राहणे आणि वाचनात आनंदी राहणे असे जगणे फार थोडय़ा लोकांच्या वाटय़ाला येते. देसाई हे अशा मोजक्यांपैकी एक होते. त्याचा त्यांना अभिमानही होता. त्यांच्या अचानक निधनाने त्यांचा मित्रपरिवार आणि मराठीतील वाचक एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला मुकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा