आयुष्यात प्रत्येकच जण कधी ना कधी नेहमीच्या कामातून निवृत्त होत असतो, पण आपल्या आवडीचे काम, त्यातील कृतार्थतेचे क्षण अनुभवल्यानंतरची निवृत्ती फार थोडय़ा लोकांच्या वाटय़ाला येते. अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेच्या महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन यांची निवृत्ती ही याच प्रकारातली आहे. पेगी यांनी अवकाशात ६६५ दिवस वास्तव्य करण्याचा विक्रम केलेला आहे. महिलांमध्ये सर्वाधिक स्पेस वॉक त्यांनी केले आहेत. १० स्पेसवॉकमध्ये त्यांनी ६० तास २१ मिनिटे एवढा मोठा काळ व्यतीत केला. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात त्यांनी तीन मोहिमा पूर्ण केल्या. २००२ मध्ये त्यांचा पहिला अवकाश स्थानक प्रवास घडला. त्या अवकाशस्थानकात नेमण्यात आलेल्या पहिल्या वैज्ञानिक अधिकारी ठरल्या. नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान त्या अवकाश स्थानकाचे सारथ्य करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या १९८६ मध्ये नासात आल्या, तेथे अनेक भूमिका पार पाडत असताना त्या मीर अवकाश स्थानकातही प्रकल्प वैज्ञानिक बनल्या, अमेरिका-रशिया वैज्ञानिक कार्यकारी गटाच्या त्या सहअध्यक्षही होत्या.
व्हिटसन यांचा जन्म आयोवात माऊंट अयर येथे झाला. आयोवा वेसलन कॉलेजमधून त्या विज्ञानाच्या पदवीधर बनल्या. राइस विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात डॉक्टरेट केल्यानंतर जॉन्सन स्पेस सेंटर येथे त्यांनी संशोधनाचे काम सुरू केले. त्यानंतर कृग इंटरनॅशनल संशोधन गटात त्या काम करीत होत्या. १९९६ मध्ये त्यांची जॉन्सन स्पेस सेंटर येथे अवकाशप्रवासासाठी उमेदवार म्हणून निवड झाली. त्याआधी त्यांनी नासात जैवरसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले होते. सोळाव्या मोहिमेत त्यांनी सुनीता विल्यम्सचा स्पेसवॉकचा विक्रम मोडला. टाइम नियतकालिकाने अलीकडेच त्यांचा गौरव केला. नॅशनल जिऑग्राफिकवरील वन स्ट्रेंज रॉक या कार्यक्रमात त्यांनी अवकाश प्रवासाचे अनुभव सांगितले ते रोमांचक असेच होते. सुरुवातीला त्यांचे गावातील छोटेसे घर त्यांना प्रिय होते. नंतर त्या अनेकदा रशियाला जाऊन आल्या तेव्हा अमेरिका हे त्यांचे घर झाले, जेव्हा त्या अवकाश प्रवासाला जाऊन आल्या तेव्हा त्यांना पृथ्वी हे घर वाटू लागले. त्यांच्या या सगळ्या प्रवासात घराची कल्पना अशी बदलत गेली. सूक्ष्म गुरुत्वात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, तिथे वावरणे त्यांना सवयीचे झाले होते तरी पृथ्वीवरचे सुख कुठेच नाही हे त्या कबूल करतात. अथांग विश्वात कुठे तरी परग्रहवासीय सापडतील असा आशावादही व्यक्त करतात. पेगी व्हिटसन यांनी अमेरिकेच्या अवकाशयात्रींमध्ये दुर्लभ असे स्थान मिळवले आहे यात शंका नाही.