सध्याच्या काळात ऊर्जा समस्येवर सौरऊर्जेचा तोडगा सांगितला जात असला तरी त्यात साधनसामग्रीच्या किमती, लागणारी जागा व सौरघटांची कार्यक्षमता यासारखी अनेक आव्हाने आहेत. त्यावर तंत्रज्ञानावर आधारित उत्तरे शोधण्याचे काम करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स या संस्थेतील प्रा. मार्टिन ग्रीन. त्यांना अलीकडेच प्रतिष्ठेचा जागतिक ऊर्जा पुरस्कार जाहीर झाला असून तो ८ लाख २० हजार डॉलर्सचा आहे. प्रकाशीय सौर विद्युतघटावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे व क्रांतिकारी ठरले आहे. हा पुरस्कार पटकावणारे ते पहिलेच ऑस्ट्रेलियन.
ग्रीन यांचा जन्म ब्रिस्बेनचा. क्वीन्सलँड विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातून पीएचडी केली. त्यांच्या नावावर अनेक शोधनिबंध व पेटंट्स आहेत. प्रोफेसर ग्रीन हे ‘ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड फोटोव्होल्टॅइकस’ या संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी सौर प्रकाशीय विद्युतघटांची कार्यक्षमता मोठय़ा प्रमाणावर वाढवली तर आहेच, शिवाय त्यांनी शोधलेले तंत्रज्ञान कमी खर्चीक आहे. १४ देशांच्या ४४ स्पर्धकांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. नोबेलनंतर महत्त्वाचे मानले जाणारे हे पारितोषिक असून इलन मस्क हेही या स्पर्धेत होते. त्यांना मागे टाकून ग्रीन यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. मोनोक्रिस्टलाइन व पॉलिक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर सेलची निर्मिती हा ग्रीन यांचा विशेष संशोधन विषय. प्रकाशीय सौर विद्युतघटांच्या किमती दिवसेंदिवस कमी होत आहेत ते ग्रीन यांच्यासारख्या संशोधकांच्या परिश्रमाचे फळ आहे. एखाद्या सौरघटाची सूर्यप्रकाशाचे विद्युतऊर्जेत रूपांतर करण्याची जी क्षमता असते ती फार महत्त्वाची असते. ग्रीन यांनी १९८९ मध्ये २० टक्के, तर इ.स. २०१४ मध्ये ४० टक्के क्षमता यात प्राप्त केली होती. त्यांनी पीईआरसी सोलर सेलचा शोध लावला असून २०१७ अखेरीस सिलिकॉन सेलच्या उत्पादनात या प्रकारच्या सेलचे (विद्युतघट) प्रमाण अधिक आहे. शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात त्यांनी गेली तीस वर्षे केलेले काम हे फार उल्लेखनीय आहे यात शंका नाही. सौरघटांची क्षमता वाढवतानाच त्यांनी सौरऊर्जा सामान्यांच्या आवाक्यात आणण्याचे काम केले आहे. लेसर डोपिंग केलेले सौरघट तयार करून त्यांनी ते सौरपट्टय़ामध्ये वापरले. पेरोव्हस्काइट या प्रकाशीय घटांची निर्मिती करताना त्यांनी संमिश्रांचा वापर केला. कार्ल बोअर सौरऊर्जा पदक, सोलर वर्ल्ड आइनस्टाइन अवॉर्ड असे अनेक मानसन्मान त्यांना लाभले. त्यांचे संशोधन हे एकूणच भविष्यातील ऊर्जेच्या गरजा ओळखून केलेले आहे, त्यामुळे त्याचा जागतिक परिणाम खूप मोठा आहे.